परीक्षेत विद्यापीठाची 'कसोटी'

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याच नाही तर राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे नियोजन सुद्धा कोलमडू शकते. येत्या दोन फेब्रुवारी रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे लाक्षणिक संप केला जाणार असून त्यानंतर टप्प्या-टप्प्याने काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक नुकतीच पुणे विद्यापीठात घेण्यात आली.

परीक्षा काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; राज्य शिक्षण मंडळाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

राहुल शिंदे 

rahul.shinde@civicmirror.in

TWEET@rahulsmirror

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याच नाही तर राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे नियोजन सुद्धा कोलमडू शकते. येत्या दोन फेब्रुवारी रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे लाक्षणिक संप केला जाणार असून त्यानंतर टप्प्या-टप्प्याने काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आणि विद्यापीठाशी संलग्न पुणे , अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये व पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालये संयुक्तपणे काम करतात .त्यामुळे इयत्ता बारावीच्या आणि विद्यापीठाच्या परीक्षांचे कामकाज करणारे मनुष्यबळ वेगवेगळे नाही. इयत्ता बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत.  परीक्षेपूर्वीच काही दिवस आधी शिक्षकेतर कर्मचारी कामबंद आंदोलनावर जाणार आहेत. पुणे विद्यापीठाच्या आवारात २८ जानेवारी रोजी राज्यभरातील संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट देण्यापासून राज्य मंडळाकडून प्राप्त होणारे परीक्षेचे साहित्य उतरून घेणे, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी संख्येनिहाय त्यांचे वितरण करणे, परीक्षेनंतर जमा झालेल्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी राज्य मंडळ आणि विद्यापीठाकडे पाठवण्याचे काम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केले जाते. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी नसतील तर परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडू शकते.

 

परीक्षेच्या कामकाजातील शिक्षकेतर कर्मचारी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याला डावलून परीक्षा घेता येणार नाहीत. ऐन परीक्षेच्या कालावधीत शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनावर गेले तर विद्यापीठ, महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

- डॉ.के.सी.मोहिते, प्राचार्य, सी.टी.बोरा कॉलेज

 

राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केवळ खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे येत्या २ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप केला जाईल. त्यानंतर १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध प्रकारे आंदोलन करून २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकेतर संघटनेने घेतला आहे.

- सुनील धिवार, संघटक, 

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story