धोकाच बाहेर सारा, लटकती मृत्यूच्या तारा

भूमिगत आणि इतर वीजवाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये गेल्या पंधरा महिन्यांत पुणे परिमंडळातील साठहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही शहरात विविध ठिकाणी धोकादायक पद्धतीने विजेच्या वायर लटकलेल्या दिसतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sun, 4 Jun 2023
  • 11:35 pm
धोकाच बाहेर सारा, लटकती मृत्यूच्या तारा

धोकाच बाहेर सारा, लटकती मृत्यूच्या तारा

शाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक केबल, वीज वाहिन्यांच्या बंदोबस्ताची मागणी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

भूमिगत आणि इतर वीजवाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये गेल्या पंधरा महिन्यांत पुणे परिमंडळातील साठहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही शहरात विविध ठिकाणी धोकादायक पद्धतीने विजेच्या वायर लटकलेल्या दिसतात. शहरातील काही शाळांबाहेर धोकादायक अवस्थेतील विजेच्या केबल लटकत असल्याचे 'सीविक मिरर'च्या पाहणीत समोर आले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या धोकादायक केबल आणि वीज वितरण वाहिन्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची गरज व्यक्त 

करण्यात येत आहे.  

महावितरणच्या पुणे परिमंडळात मागच्या वर्षभरात शॉक लागून ५३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही शॉक लागून मृत्यू झाल्याच्या काही घटनांची नोंद शहरात झाली आहे. भुसारी कॉलनीतील ओपन जीममध्ये शॉक लागून अमोल नाकते या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. माणिकबागेत फेब्रुवारी महिन्यात एका कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला होता. शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली असतानाही त्याबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणेच नाही तर शाळा देखील सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलबाहेर उच्चदाब वाहिनीचे जंजाळ दिसून येते. दुरुस्तीचे अर्धवट काम झालेल्या पदपथावर भूमिगत वीजवाहिन्या उघड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी वीजवाहिन्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे, तर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उच्चदाब वाहिनीच्या केबल पदपथावर पडल्या आहेत. या  वायर धोकादायक अवस्थेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर अशा अवस्थेतील वायर अपघाताला कारणीभूत ठरू शकतात.  पर्वती पायथ्याला जनता वसाहतीजवळून गेलेली भूमिगत वीजवाहिनी उघडी पडल्याचे दिसून येत आहे. आरटीओ कार्यालयाजवळील एसएसपीएमएस शाळेच्या बाहेर भूमिगत उच्चदाब वाहिनीचे जंजाळ उघडे पडले आहे. तीच स्थिती कोथरूड गावातील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज माध्यमिक विद्यालयाबाहेर दिसून येत आहे.

याबाबत कोथरूड मधील सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज माध्यमिक विद्यालयाबाहेर पदपथ आहे. तिथे पथदिव्यांच्या वायर उघड्या पडल्या आहेत. पावसाळ्यात त्या खराब होऊन त्यातून वीज प्रवाह उतरण्याचा धोका संभवतो. काही दिवसांपूर्वी सुतारदऱ्यात विजेचा धक्का बसल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर मार्च महिन्यात ओपन जीममध्ये लघुदाब वाहिनीतील विद्युत प्रवाह व्यायामाच्या साहित्यात उतरून तरुणाला प्राण गमवावे लागले आहे. शाळांच्या बाहेरच धोकादायक वायर दिसून येत आहे. येत्या १० जूनपासून शाळा सुरू होत आहेत. त्यापूर्वीच शाळा आणि सार्वजनिक ठिकाणच्या वीजवाहिन्या व्यवस्थित आहेत की नाही याची तपासणी शाळा प्रशासन आणि महावितरण अशा दोघांनी करायला हवी.  

वीजतज्ज्ञ ॲड. सी. जी. आपटे म्हणाले, शाळा अथवा सार्वजनिक ठिकाणची विद्युत वाहिन्यांची वार्षिक पाहणी विद्युत निरीक्षकांनी करणे बंधनकारक आहे. एखादी वाहिनी धोकादायक असेल तर विद्युत निरीक्षक संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावून काम करून घेऊ शकतात.  प्रसंगी संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकारही विद्युत निरीक्षकांना असतात. मात्र, ना पाहणी केली जाते. ना कारवाई केली जाते.  

पावसाळ्यात ही काळजी घ्या...

अतिवृष्टी, वादळी पावसामुळे तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे,  विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू आणि साहित्यामुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी विजेचा वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या विजेच्या तारांवर पडतात. यामध्ये विजेचे खांब वाकतात. वीज तारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये विद्युत प्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा त्या हलवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे नेहमी स्वीच बोर्डपासून बंद करावीत.

विजेच्या तक्रारीसाठी इथे संपर्क करा...

शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story