'Kamala Nehru' : 'कमला नेहरू'तील १५ पैकी केवळ पाच डायलेसिस मशीन सुरू

कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटर लायन्स क्लबला चालवण्यास देण्यात आली आहेत. सेंटरमधील पंधरा डायलिसिस मशीनपैकी १० बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेने लायन्स क्लबला नोटीस बजावून पुढील पंधरा दिवसांमध्ये सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, असे सांगितले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Thu, 20 Jul 2023
  • 11:08 pm
'कमला नेहरू'तील १५ पैकी केवळ पाच डायलेसिस मशीन सुरू

'कमला नेहरू'तील १५ पैकी केवळ पाच डायलेसिस मशीन सुरू

पालिकेचे ‘लायन्स क्लब’ला सर्व मशीन सुरू ठेवण्याचे आदेश

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटर लायन्स क्लबला चालवण्यास देण्यात आली आहेत. सेंटरमधील पंधरा डायलिसिस मशीनपैकी १० बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेने लायन्स क्लबला नोटीस बजावून पुढील पंधरा दिवसांमध्ये सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, असे सांगितले होते. पूर्ण क्षमतेने सेंटर सुरू केले नाही, तर करार रद्द करणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले होते. या प्रकरणी लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बंद मशीन सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र बंद करण्याची अथवा करार रद्द करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने २० जून रोजी लायन्स क्लबला नोटीस पाठवली होती. त्यानंतर केवळ तीन मशीन कार्यान्वित करण्यात आल्या. उर्वरित मशीन १५ दिवसांमध्ये सुरू न केल्यास करार रद्द केला जाणार असल्याचे सांगितले होते. आरोग्य विभागातर्फे लायन्स संस्थेला कमला नेहरू रुग्णालयातील सेंटर २०१६ मध्ये चालविण्यास देण्यात आले आहे. त्यांचा पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर पुन्हा पाच वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला आहे. महापालिकेचा एका डायलिसिसचा दर ४०० रुपये आहे. सरकारी दर १,२०० रुपये असल्याने लायन्स क्लबला ४०० रुपयांत उपचार देणे अवघड वाटल्याने सेंटर सातत्याने बंद ठेवण्यात येत होते. याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पालिकेने नोटीस बजावली होती.

या प्रकरणी लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आपली बाजू मांडली आहे. पालिकेने वेळेत शुल्क न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेवा केंद्र बंद करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पन्हाळे यांनी पत्रकाद्वारे संस्थेची बाजू मांडली आहे.

"महानगर पालिकेकडून पाच, सहा महिन्यांची देयके प्रलंबित राहत होती. क्लबने शुल्कांच्या देयकांबाबत वारंवार आरोग्य विभागाशी संपर्क साधलेला आहे. तरीही दखल घेतली जात नव्हती. मात्र, आता थकीत बिले आल्याबरोबर योग्य ती पावले उचलून सेंटर पूर्ववत करण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेला कळविण्यात आले असल्याचे पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. सेवा पूर्ववत झाल्याने रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.  महापालिकेने या योजनेअंतर्गत येणारे रुग्ण पाठवावे अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

कमला नेहरू रुग्णालयातील हे केंद्र   २०१६ पासून  पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत पालिकेसमवेत स्वयंसेवी संस्था म्हणून चालवले जात आहे. शहरी गरीब योजनेअंतर्गत येथे रुग्ण डायलिसिस सेवा घेतात. त्याच्या शुल्काची देयके पालिका लायन्स क्लबला देते. रुग्णांकडून केंद्र पैसे घेत नाही. त्यामुळे पालिकेकडून येणारे पैसे लांबले की, सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते, असे स्पष्टीकरण केंद्राने दिले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story