ओंकारेश्वर मंदिरालगतच्या आजोबांच्या समाधीचे शिवमंदिरात रूपांतर करण्याच्या प्रयत्नांना केळकरांच्या वारसांचा विरोध

गावात दत्त आले', अशी हाकाटी उठवून एक मोठे दत्तदेवस्थान निर्माण केले जाते आणि त्या माध्यमातून भाविकांची यथेच्छ लूट होते, अशा आशयाची कथा असलेला 'देऊळ' चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. भाविकांच्या श्रद्धेशी खेळून पैशाचा बाजार कसा मांडला जातो, हा प्रकार या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता. असाच काहीसा प्रकार पुण्यात ओंकारेश्वराच्या मागील बाजूच्या नदीपात्रात घडताना दिसून येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Feb 2023
  • 11:05 am
ओंकारेश्वर मंदिरालगतच्या आजोबांच्या समाधीचे शिवमंदिरात  रूपांतर करण्याच्या प्रयत्नांना केळकरांच्या वारसांचा विरोध

ओंकारेश्वर मंदिरालगतच्या आजोबांच्या समाधीचे शिवमंदिरात रूपांतर करण्याच्या प्रयत्नांना केळकरांच्या वारसांचा विरोध

मयूर भावे

mayur.bhave@civicmirror.in

TWEET@mayur_mirror

'गावात दत्त आले', अशी हाकाटी उठवून एक मोठे दत्तदेवस्थान निर्माण केले जाते आणि त्या माध्यमातून भाविकांची यथेच्छ लूट होते, अशा आशयाची कथा असलेला 'देऊळ' चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. भाविकांच्या श्रद्धेशी खेळून पैशाचा बाजार कसा मांडला जातो, हा प्रकार या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता. असाच काहीसा प्रकार पुण्यात ओंकारेश्वराच्या मागील बाजूच्या नदीपात्रात घडताना दिसून येत आहे.

नदीपात्रात ओंकारेश्वराच्या मागील बाजूस एक मोठी शंकराची पिंड दिसते. तिचे मूळ स्वरूप पाहता ती कै. गंगाधर केळकर यांची समाधी आहे. त्यांच्या वंशजांनी ती तेथे बांधली होती. मात्र, आता त्या समाधी परिसरात विविध स्वरूपाचे बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार होताना दिसून येत आहे. केळकर कुटुंबीयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, समाधीचे रूपांतर मंदिरात न करण्याचे आवाहन केले आहे.

नदीपात्रात समाधीचे रूपांतर शंकराच्या मंदिरात करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघडकीस आले आहे. ओंकारेश्वर ओंकारेश्वर मंदिरामागे भिंतीजवळ नदीपात्रात कै. गंगाधर केळकर यांची समाधी आहे. समाधीस्थळ उभारणीचा अप्रतिम नमुना म्हणून या समाधीकडे पाहिले जाऊ शकते. १९२८ मध्ये या समाधीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, सध्या तेथे अतिक्रमण करून समाधीस्थळाचे महादेव मंदिरात रूपांतर करण्याचा प्रकार काही लोकांनी सुरू केला आहे. अशा पद्धतीने अचानक देऊळ बांधून मूळ वास्तू बदलण्याचा आणि त्या मागील भावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सुजाण पुणेकरांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करावा, असे आवाहन कै. गंगाधर केळकर यांचे नातू आणि प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी केले आहे.  

पाच-सहा वर्षांतील अतिक्रमण

डॉ. केळकर यांनी सांगितले की, 'मागील ५-६ वर्षापूर्वीपर्यंत येथे केवळ समाधी होती. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे बांधकाम केलेले नव्हते. काही वर्षांपूर्वी येथे शेड उभारण्यात आली. त्यानंतर महादेवाच्या पिंडीपर्यंत जाता येईल अशा प्रकारचा छोटा लोखंडी जिना आणि त्याला जोडून इतर सांगाडा येथे ठेवण्यात आला. साधारण गेल्या ८-९ महिन्यांत येथे पिंडीच्यासमोर मोठा नंदी ठेवण्यात आला आहे. त्याची बाजारपेठेतील किंमत ५० हजार रुपयांच्या आसपास सहज असेल, असे प्रकार करून या समाधीस्थळाचे रूपांतर आता मंदिरात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मधल्या कोरोनाच्या काळात येथे काही हालचाल दिसत नव्हती. मात्र, आता पुन्हा येथे नव्याने अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक लोक सकाळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडल्यावर किंवा घरी परत जाताना येथे थांबतात आणि दर्शन घेऊन पुढे जातात. शिवपिंडीवर अभिषेक करतात. त्याचे पाणी तेथेच खाली साचताना दिसते. एखाद्या दैवतावर श्रद्धा असणे यात विघातक काही नसले, तरीदेखील नागरिकांना काही गोष्टी माहीत नसल्याचा फायदा घेऊन त्यांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार येथे सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांनी सजगपणे या स्थळाकडे पाहिले पाहिजे. समाधीस्थळ म्हणून त्याचा अवमान होता कामा नये, त्याचप्रमाणे त्याला देवत्व देऊन त्याचे श्रद्धास्थान करण्याचाही प्रयत्न करू नये.'     

समाधीची बांधणी व स्वरूप

नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांचे आजोबा कै. गंगाधर केळकर यांची ही समाधी १९२८ मध्ये बांधण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, 'समाधीस्थळाच्या उभारणीचा अप्रतिम नमुना म्हणून या समाधीस्थळाकडे पाहता येऊ शकते. गंगाधर या शब्दाचा अर्थ भगवान शंकर असा होतो. त्यामुळे या समाधीच्यावर महादेवाची एक मो+ठी कलात्मक पिंड त्याच वेळी बसवण्यात आली होती. मात्र, त्यामुळेच अनेकांना हे शिवमंदिर वाटतं आणि आता त्याला तसे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे काका म्हणजेच राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि माझे वडील, म्हणजेच त्यांचे बंधू भास्कर केळकर यांनी आपल्या कलाप्रेमातून हे समाधीस्थळ उभारले आहे. हे स्थळ म्हणजे त्यांच्या कलाप्रेमाचा नमुना आहे. 

लोकप्रतिनिधींकडून टाळाटाळ

डॉ. केळकर यांनी सांगितले की, 'समाधिस्थळावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याबाबत राजकीय नेते विजय कदम आणि अनिल शिरोळे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशीदेखील संपर्क साधला. मात्र, आश्वासनांच्या पलीकडे फारसे काही हाती लागले नाही. मध्यंतरी कोरोनाच्या काळात या ठिकाणी फार काही घडामोडी घडत नव्हत्या. मात्र, आता गेल्या वर्षभरापासून पुन्हा नवनवीन गोष्टी दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक असून, अशा प्रकारचे अतिक्रमण थांबवणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार सांगूनही तसे होताना दिसत नाही.'

कै. गंगाधर केळकर यांच्याविषयी...

डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले की, 'माझे आजोबा कै. गंगाधर केळकर हे अत्यंत समाजहितदक्ष होते. त्यांनी पोस्टात नोकरी केली. निवृत्तीनंतर ते पुण्यात आले. त्या वेळी त्यांनी आता जेथे केळकर वस्तूसंग्रहालय आहे, ती जागा तेव्हा विकत घेतली. तेथे आधी आमचे घर होते, नंतर संग्रहालय उभारण्यात आले. मात्र, गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना खूप कळकळ होती. ते सर्वतोपरी विद्यार्थ्यांना मदत करीत असत. आपल्या संपत्तीतला काही भाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च व्हावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आमच्याकडे अनेक विद्यार्थी राहायला असत. माझ्या काकांच्या काव्यसंग्रहाला भा. रा. तांबेंनी प्रस्तावना दिली आहे. त्यात त्यांनी आमच्या काकांच्या काव्यज्ञानावर भाष्य केले आहे. प्रचंड विद्वत्ता असूनही ते अत्यंत साधेपणाने जगले. त्यामुळे आज त्यांच्या समाधीस्थळी अशा पद्धतीने काही नवीनच सुरू होणे, हे चुकीचे वाटते.'

केळकर कुटुंबीयांना मनस्ताप

नदीपात्रातील समाधीस्थळी होत असलेले अतिक्रमण होत असल्याच्या गोष्टी वेळोवेळी  केळकर कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्या. त्यांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे दाद मागण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. आता समाधिस्थळाच्या येथे महाशिवरात्री उत्सवाचे फलक लागल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी डॉ. श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी समाधीला भेट दिली. तेथे येणाऱ्या भाविकांना समाधीबद्दल माहिती दिली. या वेळी अरुणा केळकर, सत्यजित केळकर आणि सुधन्वा रानडे उपस्थित होते. समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही त्यांनी उपस्थितांना या वेळी दाखवली. नदीपात्रातील इतरही सर्व थोर पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी  नागरिक आणि पुणे महापालिकेला या वेळी केले.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फलकबाजी

समाीस्थळाला मंदिराचे रूप देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता तेथे महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी फलकबाजीदेखील करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या जागी रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे भाविकांनी लांबून दर्शन घ्यावे, अशी सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे आगामी काळात येथे उत्सव साजरे होऊन त्याची प्रथा पडण्याची शक्यता आहे. हे सर्व खरोखरच शिवमंदिरात होणे स्वागतार्ह आहे. मात्र, समाधीस्थळापाशी अशा प्रकारे काही गोष्ट करणे उचित ठरत नाही. केळकर कुटुंबीयांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story