पावसाळा तोंडावर,तरी कामे रख़डलेलीच

मेट्रो, पावसाळी गटार आणि नालेसफाईची तुंबलेली कामे, तसेच विकासकामांचा रस्त्यावर पडलेला राडारोडा असे चित्र शहरात जागोजागी दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्यावरच पडून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 3 Jun 2023
  • 12:34 am
पावसाळा तोंडावर,तरी कामे रख़डलेलीच

पावसाळा तोंडावर,तरी कामे रख़डलेलीच

मेट्रो, गटार, नालेसफाईची कामे अर्धवटच; पालिकेच्या संथ गतीच्या धोरणाचा सामान्यांना फटका

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

मेट्रो, पावसाळी गटार आणि नालेसफाईची तुंबलेली कामे, तसेच विकासकामांचा रस्त्यावर पडलेला राडारोडा असे चित्र शहरात जागोजागी दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्यावरच पडून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता पावसाळ्याच्या तोंडावर जी कामे काही महिन्यांत उरकली नाहीत, ती आता आठ-दहा दिवसांत कशी करणार, असा सवाल नागरिक करत आहेत. कामे वेळेत न झाल्यास खड्डे, चिखल, वाहतूक कोंडी अशा दुष्टचक्रास नागरिकांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.    

पावसाळ्यात रस्ते तुंबू नयेत यासाठी वारंवार नाले, पाणी साचणारे चौक आणि रस्त्यांवर लक्ष ठेवण्याचे प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले. पावसामुळे वाहतूककोंडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संयुक्त बैठकीत दिले आहेत. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह महामेट्रो, टाटा मेट्रो, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पीएमपीएमएलचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, या बैठकीनंतरच सायंकाळी शहरात विविध ठिकाणी झालेल्या पावसामुळे पुणेकरांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने शहरातील काही रस्त्यांचा आढावा घेतला. त्यात प्रमुख रस्त्यांवरील विकासकामांच्या खुणा शिल्लक असल्याने मध्यम पावसातदेखील पाणी तुंबण्याची आणि कोंडीची शक्यता दिसत आहे.  

धनकवडीतील पद्मावती येथील निर्मल पार्क सोसायटी ते हिरो होंडा शोरूम जवळ पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. जवळपास दोन महिने उलटूनही त्यावर रस्ता तयार केलेला नाही. सातारा रस्त्याकडून सहकारनगर आणि धनकवडीला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात वाहनचालकांची फारच कसरत होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयासमोर असेच खोदकाम करण्यात आले आहे. नाना पेठ, सोमवार पेठ आणि रविवार पेठ परिसरात पावसाळी गटारातील राडारोडा तसाच पडून आहे. पाऊस झाल्यास हा राडारोडा पुन्हा गटारात जाऊन जलवाहिनी तुंबण्यास मदतच करणार आहे. कर्वेनगर भागातील विकासकामांचा राडारोडा तसाच पडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

गेली काही वर्षे शहरात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कमालीची संथ होते. शहरात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाची सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोणत्या उपयाययोजना कराव्यात यावर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गटारे, नाले सफाईची कामे वेगाने पूर्ण करावीत, गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत अशा सूचना देण्यात आल्या. सफाईत निघालेला राडारोडा तत्काळ उचलण्यासही बजावण्यात आले. यातील बरीचशी कामे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खोळंबली आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे प्रलंबित राहिल्याने ती अल्पावधीत पूर्ण कशी होणार अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.

कर्वेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे म्हणाले, 'कमिन्स कॉलेज रस्त्यावर (पाणंद रस्ता) पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. काही ठिकाणी काम झाल्यानंतर सिमेंटचा थर दिला गेला. मात्र, काम निकृष्ट असल्याने अल्पावधीतच थर निघून गेला आहे, तर काही ठिकाणी कामाचा राडारोडा रस्त्यावरच आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडे अनेकदा तक्रार करूनही राडारोडा उचलण्यात आलेला नाही. आता नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. जोराचा पाऊस झाल्यास चिखल होईल.'

सामाजिक कार्यकर्ते एकनाथ ढोले म्हणाले, 'आरटीओ कार्यालयासमोर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. संगम ब्रिज आणि आरटीओ समोरील रस्ता खोदण्यात आला आहे. काम झाल्यानंतर रस्ता दुरुस्त केलेला नाही. आरटीओ समोरील रेल्वे पुलाखाली दर पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते. या रस्त्यावरून जहांगीर, रुबी हॉल आणि ससून रुग्णालयाकडे रुग्णवाहिका सातत्याने जात असतात. खोदलेल्या रस्त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यात गाडी आपटून एखादा रुग्ण गंभीर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.'  

नाना पेठेतील रहिवासी नीळकंठ मांढरे म्हणाले, 'पावसाळी गटारातील राडारोडा काढण्याचे काम नाना पेठे, रविवार आणि सोमवार पेठेत सुरू आहे. अनेक ठिकाणी गटाराच्या बाहेरच राडारोडा काढून ठेवलेला आहे. काही दिवस तो तसाच पडून आहे. गटारातील उचललेली घाण वेळेत न नेल्यास पावसाने ती पुन्हा गटारातच जाणार आहे. त्यामुळे पावसाळी वाहिनी लवकर तुंबण्याचा धोका कायमच राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ते गाडीतळ दरम्यानच्या पदपथाची दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात दुहेरी कसरत करावी लागणार आहे.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story