रस्त्यासाठी रस्त्यावर...

पुढारलेले शहर म्हणून मिरवणाऱ्या पुणे महापालिकेतील रहिवाशांना पाणी, वीज आणि रस्ता या मूलभूत गोष्टींसाठीदेखील रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. भांडूनही त्यावर उपाययोजना केल्या जात नसल्याने संतप्त झालेले कात्रज-कोंढवा रस्त्यावरील थ्री-ज्वेल्स या उच्चभ्रू सोसायटीतील नागरिक रविवारी (दि. ४) रस्त्यावर उतरले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sun, 4 Jun 2023
  • 11:06 pm
रस्त्यासाठी रस्त्यावर...

रस्त्यासाठी रस्त्यावर...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘थ्री ज्वेल्स’ सोसायटी त्रस्त, खड्डापूजन, फलक घेऊन काढला मूक मोर्चा

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पुढारलेले शहर म्हणून मिरवणाऱ्या पुणे महापालिकेतील रहिवाशांना पाणी, वीज आणि रस्ता या मूलभूत गोष्टींसाठीदेखील रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. भांडूनही त्यावर उपाययोजना केल्या जात नसल्याने संतप्त झालेले कात्रज-कोंढवा रस्त्यावरील थ्री-ज्वेल्स या उच्चभ्रू सोसायटीतील नागरिक रविवारी (दि. ४)  रस्त्यावर उतरले.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिर ते येवलेवाडी रस्त्यावर थ्री ज्वेल्स सोसायटी आहे. या सोसायटीत ९०० हून अधिक सदनिका असून, दीड हजारांहून अधिक नागरिक वास्तव्य करीत आहेत. या सोसायटीला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. या सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. अनेकदा तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नाही. हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या तरी रस्त्यावर पाणी साचते. जोराचा पाऊस झाल्यास रस्त्यावरील पाणी चार दिवस हटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता होत नाही की पिण्यासाठी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे, जवळपास दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो. कोणत्याही विकसित शहराचे मापदंड पुरेसा पाणीपुरवठा, चांगला रस्ता आणि अखंडित वीज पुरवठ्यावरून मोजले जातात. या प्राथमिक गरजाही पूर्ण होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्याची पूजा केली. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा द्यावा, वारंवार जाणाऱ्या विजेमुळे होणाऱ्या खोळंब्यातून नागरिकांची सुटका करावी अशा मागणीचे फलक घेऊन नागरिकांनी मूक मोर्चाही काढला.

या परिसरातील दुरवस्थेबाबत गेल्या सात वर्षांपासून प्रशासनासमोर तक्रारी मांडल्या जात आहेत. त्यानंतरही इस्कॉन मंदिर ते येवलेवाडी रस्ता होत नाही. वारंवार होणाऱ्या त्रासाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थ्री ज्वेल्स सोसायटी आणि परिसरातील नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून आराध्यम सोसायटीपर्यंत मूक मोर्चा काढला. यावेळी रहिवाशांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते. ‘रस्ता नाही झाला तर नागरिक पेटून उठतील,’ ‘लाखोंचा कर घाला मनपाच्या खिशात, आमच्या नशिबी मात्र पाणी कपात,’ ‘आमच्यावर ४० टक्के अधिभार लावा, मात्र विजेसाठी व्हेंटिलेटरवर ठेवा’ असे फलक नागरिकांनी हाती घेतले होते. त्यानंतर नागरिकांनी सोसायटीच्या जवळील खड्ड्याचे पूजन करीत प्रशासनाचा निषेध केला. प्रताप पाटील, पांडुरंग भोळे, अमित पुंगालिया, अविनाश हिंगमिरे, अभिजित शहा, विनित अमृतकर, सागर देशपांडे यांच्यासह अनेक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

‘सीविक मिरर’सोबत बोलताना थ्री ज्वेल्स सोसायटीतील रहिवासी अविनाश हिंगमिरे म्हणाले, ‘‘आमच्या सोसायटीत नऊशेहून अधिक सदनिका असून, दीड हजार नागरिक वास्तव्य करतात. शेवटच्या फेजमधील ११२ सदनिकांचे हस्तांतरण सभासदांना झालेले नाही. ते झाल्यावर रहिवाशांची संख्या आणखी वाढणार आहे. आताच पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. सदस्य संख्या वाढल्यानंतर पाण्याची समस्या आणखी गंभीर होणार आहे. या सोसायटीसाठी स्वतंत्र जलवाहिनी द्यावी, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. मात्र, ती अजून मान्य झालेली नाही.’’

‘‘येथील रस्त्यासाठी २२ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अजून काम झालेले नाही. थोडा पाऊस झाला तरी परिसरात गुडघाभर पाणी साचते. जोरदार पाऊस झाल्यानंतर चार दिवस पाण्याचा निचरा होत नाही. सोसायटीच्या गेटसमोरून गेलेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विजेचा जवळपास दररोज लपंडाव सुरू असतो. दिवसांतून तीन-चार वेळा दहा ते पंधरा मिनिटांसाठी वीज जाते. गेल्या आठवड्यात तर चार दिवस कमी दाबाने वीजपुरवठा झाला. त्यामुळे विजेचा दिवा वगळता इतर विजेच्या उपकरणांचा वापर करता आला नाही,’’ अशी व्यथा हिंगमिरे यांनी मांडली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. असे असताना पुण्यासारख्या शहरात नागरिकांना पाणी, वीज आणि चांगल्या रस्त्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. सोसायटीला दररोज ८ ते १० टँकर खरेदी करावे लागतात. त्यासाठी दररोज दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो. महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही.

- अविनाश हिंगमिरे, 

रहिवासी, थ्री ज्वेल्स सोसायटी 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story