आंबिल ओढ्याजवळ जलवाहिनीचाही ‘ओढा’

राष्ट्र सेवा दलाच्या शेजारी आंबिल ओढ्याजवळ असलेल्या सर्व्हे क्रमांक १३३ येथील इंदिरा गांधी नगर वसाहत, ५२ चाळ या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून मागील एक महिन्यापासून दररोज २४ तास पाणीगळती सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 11 Jun 2023
  • 11:19 pm
आंबिल ओढ्याजवळ जलवाहिनीचाही ‘ओढा’

आंबिल ओढ्याजवळ जलवाहिनीचाही ‘ओढा’

एक महिन्यापासून दररोज २४ तास गळती, पुणेकर महापालिकेने लादलेली टंचाई सहन करीत असताना हजारो लिटर पाणी जातेय वाया

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

राष्ट्र सेवा दलाच्या शेजारी आंबिल ओढ्याजवळ असलेल्या सर्व्हे क्रमांक १३३ येथील  इंदिरा गांधी नगर वसाहत, ५२ चाळ या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून मागील एक महिन्यापासून दररोज २४ तास पाणीगळती सुरू आहे.

ही लोखंडी जलवाहिनी दोन पाईपच्या जोडावर फुटली आहे. यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी थेट ओढ्यात वाहून जात आहे.  मात्र दुसरीकडे पाण्याची टंचाई असल्याचे सांगत महापालिकेने पाणी कपात सुरू केली आहे. गळतीविषयी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील त्यांच्याकडून यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

या ठिकाणी सहा महिन्यांपूर्वीही अशीच गळती झाली होती. त्यावेळी पालिका प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर त्यांनी या ठिकाणी वेल्डिंग करत दुरुस्ती केली. परंतु दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने त्याच ठिकाणी पुन्हा गळती सुरू झाली आहे. त्यातून सातत्याने पाणी वाया जात आहे. एका महिन्यापूर्वी गळती सुरू होताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या ही बाब लक्षात आणून दिली होती. लवकरच दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, वेळीच दुरुस्ती न केल्याने जलवाहिनीची गळती वाढत गेली. आता ही गळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्री पाण्याचा दाब जास्त असल्याने त्यातून खूपच दाबाने पाणी बाहेर पडून ओढ्यात वाहून जात आहे.

‘‘शहराची पाण्याची गरज, पावसाचा अंदाज आणि शिल्लक पाणीसाठा याचा अंदाज घेऊन पालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्यासंदर्भात काही निर्णय घेतले. पाण्याची बचत करण्यासाठी आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. दुसरीकडे, या ठिकाणी एका महिन्यापासून पालिकेच्या जलवाहिनीला दिवस-रात्र सातत्याने गळती सुरू असून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यांनी दुरुस्त करण्याच्या आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. घटनास्थळी येऊन नक्की समस्या काय आहे, किती गळती होत आहे, याची पाहणी करण्याचीही तसदीदेखील त्यांनी घेतली नाही, याचे आश्चर्य वाटते,’’ असे इंदिरानगर वसाहतीतील रहिवासी दीपक वाघमारे यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.

‘‘पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील त्यांनी त्यावर काहीच उपाययोजना केल्या नसल्याने मागील एक महिन्यापासून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. दुसरीकडे मात्र कर भरूनही नागरिक निमूटपणे पाणीकपात सोसत आहेत. येथील गळतीकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीबचत करावी,’’ असे  नागरिकांचे म्हणणे आहे.

यावर्षी पाऊस उशिरा येणार आणि त्याचे प्रमाणही कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्याची तातडीने अंमलबजावणीही केली. नागरिक निमूटपणे ही पाणीकपात सहन करत आहेत. काही ठिकाणी तर हजारो रुपये खर्च करून टॅंकरही मागवित आहेत. एकीकडे महापालिका नागरिकांना पाणी बचतीचे सल्ले देत आहे. पुणेकरांचा पाणीवापर मर्यादेपेक्षा जास्त असल्याची टीका करणारी महापालिका प्रत्यक्षात पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर आपल्या कर्तव्यात गंभीर कसूर करताना दिसते.  त्यांनी आता तरी याकडे लक्ष घालून तातडीने जलवाहिनी दुरुस्त करावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी’’ अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जलवाहिनीत पाणी असल्यामुळे नीट काम करता येत नाही. यापूर्वीही येथे गळती झाली होती. त्याचे काम करण्यात आले होते. आता पुन्हा गळती होत असल्याने या गुरुवारी तेथील दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती येथील वाहिनीची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story