आता 'अवघडलेपण' टळणार
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
पुणे जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा कणा मानला जाणाऱ्या ससून रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागाचा कायापालट होणार आहे. गर्भवतींची तपासणीसाठी पहिल्या मजल्यावरील स्त्री-रोग विभागात जाताना होणारी दमछाक थांबणार आहे. गर्भवतींची तपासणी करण्यासाठी स्त्रीरोग विभाग तळ मजल्यावर आणला जाणार आहे. त्याच्या कामास ससून प्रशासनाने सुरूवात केली असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
रुग्णालयातील बाहयरूग्ण विभागात (ओपीडी) दररोज तब्बल ३ हजार रुग्णांची तपासणी केली जाते. कर्करुग्ण, किडनी विकार, हृदयरोग, मेंदू विकार, बालरोग विभाग, क्षयरोग, छातीचे रोग, मूत्र विकार अशा विविध रोगांवर इथे उपचार केले जातात.
रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळावेत, त्यांचा वेळ वाचावा, बिलिंग आणि इतर रिपोर्टसाठी त्यांची होणारी धावपळ कमी व्हावी यासाठी बाह्यरूग्ण विभागाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येत आहे. बाह्यरूग्ण विभागात दररोज सरासरी तीन हजार रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात. त्यामुळे केसपेपर काढण्यापासून ते तपासणीसाठी प्रचंड गर्दी असते. लांबच लांब रांग झाली तरी त्याचे व्यवस्थापन करणे नव्या रचनेत सोपे जाणार आहे. त्याचबरोबर केस पेपर काढण्यासाठी, बिलिंगसाठी आणि पॅथोलॉजी तपासण्यांसाठी विविध विभागात करावी लागणारी धावपळ कमी होणार आहे. या सर्व काऊंटर जवळजवळ करण्यात येणार आहेत. ओपीडीशी संबंधित विविध सेवांचे एकात्मिकरण केले जाईल. त्यामुळे केसपेपर घेऊन रूग्णाला अथवा त्यांच्या नातेवाईकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करावी लागणारी धावपळ थांबणार आहे.
गर्भवती महिलांना तपासणीसाठी मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची दमछाक होत होती. स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग तळमजल्यावर आणला जाणार आहे. त्यामुळे गर्भवतींच्या तपासण्या तळमजल्यावर होतील. नर्सिंग विभागही याच मजल्यावर असेल. या सेवा सुविधा एकाच ठिकाणी आल्याने रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक रेंगाळण्याचा कालावधी कमी होईल. रुग्णांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाल्याने बाह्यरुग्ण विभागात एकाच दिवशी अधिक रुग्णांच्या तपासण्या करणे शक्य होणार आहे.
असे होणार काम...
ससून सर्वोपचार रूग्णालयाच्या मुख्य इमारतीतील बाह्यरुग्ण कक्षाचे क्षेत्रफळ ५७,६१९ चौरसफूट आहे. येथील मुख्य बाह्यरूग्ण कक्ष, सर्जिकल स्टोअर्स, वॉर्डक्रमांक १, १९ आणि १६ चे नूतनीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर रक्तपेढीची सुधारणा केली जाणार आहे. एंटरन्स लॉबीमध्ये ग्रॅनाईट बसवले जाणार आहे. सर्व ओपीडी कक्षांसाठी पार्टीशन वॉल उभारण्यात येणार असून, पीओपी सीलिंग बसविली जाणार आहे. प्रसाधनगृह अद्ययावत केली जातील. आवश्यकतेनुसार प्रसाधनगृहाची संख्याही वाढवली जाणार आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सुसह्य वाटेल असे वातावरण तयार केले जाणार आहे.