Pune police : काठी नव्हे, झाडू चालवून पोलीस हिरो, काचांचा खच पडलेला रस्ता पोलिसाने केला झाडून स्वच्छ

पौड रस्त्याजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली एका नागरिकाचे काचेच्या बाटल्यांचे पोते खाली पडून पूर्ण रस्त्यावर काचेचा खच पडला होता. या ठिकाणी सर्वत्र काचा पसरलेल्या असल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा येत होता. अशा वेळी कृष्णा ओंबळे या वाहतूक पोलिसाने झाडू हातात घेत संपूर्ण रस्ता झाडून स्वच्छ करीत जनसेवेचे कर्तव्य निभावले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 12 May 2023
  • 03:18 am
काठी नव्हे, झाडू चालवून पोलीस हिरो, काचांचा खच पडलेला रस्ता पोलिसाने केला झाडून स्वच्छ

काठी नव्हे, झाडू चालवून पोलीस हिरो, काचांचा खच पडलेला रस्ता पोलिसाने केला झाडून स्वच्छ

काचेचा खच पडल्याने येत होता वाहतुकीस अडथळा, कृष्णा ओंबळे यांनी रस्ता केला झाडून स्वच्छ

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पौड रस्त्याजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली एका नागरिकाचे काचेच्या बाटल्यांचे पोते खाली पडून पूर्ण रस्त्यावर काचेचा खच पडला होता. या ठिकाणी सर्वत्र काचा पसरलेल्या असल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा येत होता. अशा वेळी कृष्णा ओंबळे या वाहतूक पोलिसाने झाडू हातात घेत संपूर्ण रस्ता झाडून स्वच्छ करीत जनसेवेचे कर्तव्य निभावले.

पौड रस्ता परिसरात कर्तव्यावर असलेल्या कृष्णा ओंबळे यांनी आपले काम नसतानाही स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावर विखुरलेल्या काचा जमा केल्या आणि रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. त्यांच्या या कामाचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले असून नागरिक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.  

कृष्णा ओंबळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील  रहिवासी आहेत. मागील दहा वर्षांपासून ते पुण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्यावर आहेत. २०१४ मध्ये ते पोलीस सेवेत दाखल झाले. २०१८ पासून ते वाहतूक विभागात कार्यरत आहेत. पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल येथून सोमवारी (दि. ८)  एक नागरिक मद्याच्या रिकाम्या बाटल्या पोत्यांत भरून दुचाकीवरून नेत होता. त्याने गाडीच्या मागे रिकाम्या बाटल्यांची दोन पोती बांधली होती. येथून जात असताना त्यातील एक पोते फाटले आणि त्यातील सगळ्या बाटल्या रस्त्यावर पडल्या. रस्त्याच्या बऱ्याच भागात बाटल्यांच्या काचांचे तुकडे विखुरले होते. त्याचा वाहतुकीस अडथळा येत होता. सकाळी साडेदहाची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ होती. दुचाकीस्वार नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई असल्याने ते रस्त्यावर पसरलेल्या काचांतून वाट काढत जात होते.  

हा प्रकार वाहतूक नियमन करणाऱ्या ओंबळे यांच्या लक्षात आला. या काचांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होऊन नुकसान होण्याची शक्यता होती. तसेच यामुळे अपघातही होऊ शकतो हे लक्षात घेऊन ओंबळे यांनी तातडीने जवळच्या दुकानात जाऊन झाडू आणला. स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावरील काचा जमा केल्या. काचा पसरलेला रस्ता स्वच्छ झाडून त्या एका पोत्यात भरून रस्त्याच्या बाजूला घेतल्या आणि नागरिकांसाठी रस्ता सुरळीत करून दिला.

वाहतूक पोलीस या नात्याने ओंबळे यांचे काम वाहतुकीचे नियमनाचे आहे. हातात झाडू घेऊन रस्ता सफाई करण्याचे त्यांचे काम नसतानाही प्रसंगावधान राखत ओंबळे यांनी केलेल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ‘माणुसकी आणि कर्तव्य इमानेइतबारे बजावून मदत करण्याचे काम पोलीस करत असतात. ते जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात,’ हे ओंबळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story