काम नको पण दररोजचा त्रास आवर...
प्रिन्स चौधरी
मित्रमंडळ चौकातून पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे एक महिन्यापासून सुरू आहे. दिवसभर सुरू राहणाऱ्या या कामाच्या अडथळ्यामुळे येथील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर, कामाच्या आवाजामुळे परिसरात असलेल्या रुग्णालयातील रुग्णांनाही याचा प्रचंड त्रास होत आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता काही प्रमाणात खोदून ठेवण्यात आला आहे. त्याचा त्रास या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना होत आहे. येथे पुरोहित हाॅस्पिटल आहे. या ठिकाणी बाळंतपणासोबतच महिलांच्या आजारावर उपचार केले जातात. कामासंदर्भात सातत्याने होणाऱ्या खोदकामाचा आवाज, वाहतूक कोंडीसोबत येणारे ध्वनिप्रदूषण याचा या हाॅस्पिटलमधील रुग्णांना विशेषत: गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
या मार्गावर काम सुरू असल्यामुळे वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी परिसरातील अरुंद रस्त्याने आपली दुचाकी, चार चाकी वाहने नेण्याला प्राधान्य देत आहेत. ऑटोरिक्षा आणि इतर मालवाहू वाहनेही हेच करत आहेत. त्यामुळे या परिसरातील अरुंद रस्तेदेखील कधी नव्हे ते वाहतूक कोंडी अनुभवत आहेत. साहजिकच येथे राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
जेथे काम सुरू आहे, तेथे रस्ता अरुंद झाला आहे. येथून केवळ दुचाकी जाऊ शकतात. मात्र चार चाकी वाहने तसेच ऑटो रिक्षा जाऊ शकत नाहीत. यामुळे ते डावीकडे वळून तेथील अरुंद रस्त्यांचा वापर करीत आहेत. त्याच वेळी वाहनचालक येथे लावलेल्या बॅरिकेड्सची पर्वा न करता वाहने दामटत असतात. वाहने आणि हाॅर्न त्याचबरोबर कामासाठी आणलेल्या अवजड मशीनचा येथे प्रचंड आवाज असतो.
या संदर्भात ‘सीविक मिरर’ला माहिती देताना पुरोहित हाॅस्पिटलजवळील राजवीर मेडिकल्सचे राजीव पाटील म्हणाले, ‘‘रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण आमचे नियमित ग्राहक आहेत. ते बहुतेक वरिष्ठ नागरिक आहेत. या कामाच्या अडथळ्यामुळे आणि ध्वनिप्रदूषणामुळे त्यांना मेडिकल्समध्ये येताना मोठा त्रास होत आहे. येथील ध्वनिप्रदूषणाचा हाॅस्पिटलमधील रुग्णांना तर प्रचंड त्रास होत आहे. हे काम दिवसाऐवजी रात्री केले तर लोकांचा त्रास नक्कीच कमी होईल.’’
पुरोहित हाॅस्पिटलमध्ये गर्भवती महिला कायम तपासणीसाठी येत असतात. समोरच असलेल्या या रस्त्यावर पसरलेल्या मलब्यावरून त्या घसरून पडल्या तर त्यांना आणि गर्भातील बाळाला दुखापत होण्याची शक्यता आहे. हे लक्षात आल्यावर आम्ही कंत्राटदाराच्या सुपरवायझरला काम लवकर संपवण्यास सांगितले. मात्र, आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काम सुरू असलेल्या अवजड मशिनच्या कंपनांमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होत असून ते यामुळे अस्वस्थ होत आहेत,’’ हेदेखील राजीव पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
ॲकुमेंटिस या औषध कंपनीचे प्रतिनिधी विजय पवार म्हणाले, ‘‘गर्भवती महिलांचे हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात पडत असतात. धूळ आणि अवजड मशिनचा आवाज याचा त्यांना त्रास होतो. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करता कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेड्स लावणे आवश्यक आहे.’’
रस्त्याच्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी होणार, ही गोष्ट आम्ही समजू शकतो. ही जलवाहिनी परिसरातील रहिवाशांची सोय व्हावी, यासाठीच टाकण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी थोडा संयम बाळगायला हवा. जवळच असलेल्या शाळा आणि हाॅस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा पडून असतो. पावसाळ्यात त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. येथे मोठी कचराकुंडी ठेवायला हवी,’’ असे साईदर्शन सोसायटीत राहणाऱ्या धवलकर नामक महिला म्हणाल्या.
स्थानिक रहिवासी नीरज मोहिते म्हणाले, ‘‘जलवाहिनीचे हे काम होणे आवश्यक आहे. ते पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडीचा त्रास होणार आहे. वाहनचालकांच्या सोईसाठी परिसरात कुठेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. समोरच भागवत हाॅलजवळही जलवाहिनीचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते अद्याप संपलेले नाही. पर्वती टेकडीवरून ही वाहिनी खाली येते. ड्रेनेज चेंबर आणि जलवाहिनी आजूबाजूला आहेत. मागील वर्षी जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा झाला होता. नंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली. सध्या आम्हाला एका वर्षापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. हे काम लवकर पूर्ण झाल्यास आमची चिंता मिटेल.’’