पिंपरी पोलिस स्टेशन
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
वृध्द महिलेचे दुकान विकल्यानंतर त्याचा मोबदला देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वकिलाला अटक करण्यात आली आहे. पिंपरीतील या घटनेप्रकरणी वकिलाची पत्नी आणि अन्य दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲॅड. दिनेश धरमदास लालवाणी (वय ५०, रा. पिंपरी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. त्याची पत्नी सिमरन (वय ४७), शंकर होतचंद आहुजा (६४, रा. उल्हासनगर ठाणे), विनोद झोरीलाल कलोसिया (वय ४०, रा. बोपखेल) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ ते २०२२ या आठ वर्षांत हा सर्व प्रकार घडला.याप्रकरणी रजनी केशव पंजवानी (वय ५८, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पंजवानी यांच्या वडिलांचे पिंपरी बाजारपेठेत एक दुकान होते. हे दुकान त्यांनी मोहनदास चौधरी यांना भाडेतत्वावर दिले होते. पण चौधरी हे भाडे वाढवून देत नव्हते, तसेच दुकानाचा ताबा देत नव्हते. दरम्यान, पंजवानी यांचे वडील सुंदरदास गंडामल लोहानी यांचे निधन झाले. त्यानंतर या दुकानाची मालकी भगवंतीबाई यांच्या नावावर झाली होती. चौधरीजुमानत नसल्याने मदतीसाठी पंजवानी यांच्या आई आणि अन्य भावंडे वकील ललवाणी याच्याकडे गेले होते. तेव्हा दुकानाचा ताबा घेऊन देतो आणि वाद मिटवून देतो, असे सांगत ललवाणी याने हे दुकान परस्पर चौधरी यांना विकले असल्याचा आरोप पंजवानी यांनी केला आहे. मात्र, या खरेदी खतावरील सह्या या पंजवानी यांच्या आई आणि अन्य भावंडांच्या आहेत. त्या अजाणतेपणी घेतल्याचेही पंजवानी यांचे म्हणणे आहे.
वकील ललवानी याचे नातेवाईक आहुजा याच्या नावावर दुकानाचा व्यवहार झाल्याचे दाखवण्यात आले होते. दरम्यान, या दुकानाचा व्यवहार झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून वकील ललवाणी याच्या पत्नीचे नावे काळेवाडी येथे असलेला फ्लॅट पंजवानी यांच्या आईला देतो, असे सांगण्यात आले. त्यासाठी पंजवानी यांच्या आईच्या बँक खात्यावरील अकरा लाख रुपये ललवाणी याच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा करून घेतले.
सिमरन ललवाणी यांच्या नावावरील फ्लॅट पंजवानी यांच्या आई लोहानी यांना देण्यात आला नाही. दरम्यान त्याच्या बँक खात्यावरील पैसेदेखील सिमरन यांच्याकडे गेले आणि फ्लॅट दिला नसल्याने लोहानी आणि कुटुंबीयांनी २०१८ मध्ये तत्कालीन पोलीस उपायुक्तांडे तक्रार केली होती. कारवाईच्या भीतीने ललवाणी याने सिमरन यांच्या नावावरील फ्लॅटचा व्यवहार लोहानी यांच्याबरोबर रद्द झाल्याचे दाखवून त्यापोटी लोहनी यांच्या बँक खात्यावर १६ लाख रुपये जमा केले.
मात्र, काही दिवसांतच कलोसिया याचे बोपखेलमधील दुकान लोहानी यांनी विकत घेतल्याचे दाखवून लोहानी यांच्या बँक खात्यावरील १६ लाख रुपये कलोसिया यांच्या बँक खात्यात वळविण्यात आले. परंतु असा कोणता व्यवहार झाला नव्हता, असे आता तपासात उघड झाले आहे.
कलोसिया याच्या बँक खात्यात लोहानी यांच्या खात्यातून १६ लाख रुपये जमा झाल्यानंतर त्याच दिवशी ते खात्यावरून काढून घेण्यात आले. त्यानंतर यातील १४ लाख रुपये ललवाणी यांना दिले गेले तर दोन लाख रुपये कमिशन म्हणून कलोसिया यांनी घेतल्याचे उघड झाले आहे. अनेक दिवस या सर्व प्रकरणाची चौकशी
केल्यानंतर पिंपरी पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करत ललवाणी याला अटक केली. कोर्टाने ३० जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.