नूतन मराठी विद्यालयासमोर भरदुपारी कोयत्याचा थरार

शहरात कोयता गँगने माजवलेली दहशत आणि पोलिसांनी केलेली कारवाई यावरील चर्चा अद्याप शांत झालेली नाही. त्यातच आता मध्यवस्तीतील नूतन मराठी िवद्यालयातील (नूमवि) एका अल्पवयीन मुलाला दुसऱ्या अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. ३१) घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

एका अल्पवयीन मुलाला दुसऱ्या अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

शहरात कोयता गँगने माजवलेली दहशत आणि पोलिसांनी केलेली कारवाई यावरील चर्चा अद्याप शांत झालेली नाही. त्यातच आता मध्यवस्तीतील नूतन मराठी िवद्यालयातील (नूमवि) एका अल्पवयीन मुलाला दुसऱ्या अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. ३१) घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

मागील काही दिवसांपासून शहरात कोयता गँगने दहशत पसरवली. रात्रीच्या वेळी दुकाने, रस्त्यांवरील टपऱ्या तसेच चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच बालसुधारगृहातून कोयता गँगच्या आठ बालगुन्हेगारांनी पलायन केल्याची घटनाही घडली आहे. आता कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलांकडूनही सुरू झाला आहे.

बाजीराव रस्त्यावरील नूमवि शाळेसमोर मुलांच्या दोन गटात दुपारी वाद झाला. त्यानंतर कोयते उगारून दहशत माजविण्यात आली. दोघांनी एका युवकावर कोयत्याने वार केला. कोयते उगारून अप्पा बळवंत चौकातून दोघे पळाले. ज्या मुलावर कोयत्याने वार करण्यात आले, त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, सोमवारीच (ता. ३०) पोलिसांनी याच शाळेत जाऊन या गुन्हेगारीबद्दल विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले होते.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनय आणि विनय ( नावे बदलली आहेत) या १७ वर्षीय मुलांमध्ये बस स्थानकाजवळ वादावादी झाली. जखमी झालेला विद्यार्थी अनय हा बारावीमध्ये शिकत असून तो पद्मावती परिसरात राहतो, तर आरोपी मुलगा विनय हा तुळशीबागेत काम करतो. विनय याच्या मैत्रिणीशी अनय हा शाळेजवळील बस स्थानकाजवळ बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग विनयला आला आणि त्याने अनयवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात अनय जखमी झाला. चौकातच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

शाळेतील विद्यार्थी कोयता घेऊन पाठलाग करत असतील तर ही फारच चिंतेची बाब आहे. त्यातही बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या असताना अभ्यास करणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यार्थी कोयता घेऊन भर गर्दीत पाठलाग करत असतील तर ते पुढे गुन्हेगारच होतील. त्यामुळे संबंधित मुलांच्या पालकांनी व शाळेने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मत शिक्षण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

बाजीराव रस्त्यावरील शाळेतील बारावीचा विद्यार्थी कोयत्याने वार केल्यामुळे जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

- सुनील माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story