PMC : पालिका बुजवी झरे, जनता पाण्यासाठी झुरे

नदीपात्र अस्वच्छ असताना तिचा काठ सुशोभित करण्यात व्यस्त असलेल्या महापालिकेने बावधन येथील जिवंत झऱ्यातून होणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात मैलापाणी सोडले असून झऱ्याचे पाणीही आता प्रदूषित झाले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी हा झरा संरक्षित करण्याचा अहवाल राज्याच्या भूजल आणि सर्वेक्षण विभागाने दिला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता झऱ्याच्या उगमस्थानाजवळ प्रदूषण पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 12 May 2023
  • 03:00 am
पालिका बुजवी झरे, जनता पाण्यासाठी झुरे

पालिका बुजवी झरे, जनता पाण्यासाठी झुरे

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

नदीपात्र अस्वच्छ असताना तिचा काठ सुशोभित करण्यात व्यस्त असलेल्या महापालिकेने बावधन येथील जिवंत झऱ्यातून होणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात मैलापाणी सोडले असून झऱ्याचे पाणीही आता प्रदूषित झाले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी हा झरा संरक्षित करण्याचा अहवाल राज्याच्या भूजल आणि सर्वेक्षण विभागाने दिला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता झऱ्याच्या उगमस्थानाजवळ प्रदूषण पोहोचण्याची दाट शक्यता आहे. अगदी मे महिन्यातही पाझर सुरू असलेला झरा खराब झाल्यास शहरातील आणखी एक नैसर्गिक जलस्रोत गमावून बसण्याचा धोका आहे.

जलस्रोत पुनरुज्जीवित करणे, कचरा व्यवस्थापन, मैलापाणी व्यवस्थापन, स्वच्छता अशा विविध कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या ग्रीन सिटी प्लॅटिनम सर्टिफिकेशनने पुणे महापालिकेला गेल्या महिन्यातच गौरवले आहे. जलस्रोत पुनरुज्जीवनासाठी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या महापालिकेला बावधन येथील झऱ्यातील प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांत काही करता आले नाही. बावधनजवळील वैदेही एनक्लेव्ह सोसायटीजवळ हा झरा आहे. मे महिन्यातही हा झरा वाहता राहिला आहे. दररोज सुमारे एक लाख लिटर स्वच्छ पाणी यातून वाहून जाते, असा स्थानिक नागरिकांचा अंदाज आहे. या झऱ्याच्या शेजारून काही फुटांवरच मैलापाणी असलेली खुली वाहिनी जाते. या झऱ्याच्या पाझरापासून अवघ्या शंभर फुटांवर मैलापाणी झऱ्यातील स्वच्छ पाण्यात मिसळते.

केवळ वीस वर्षांपूर्वी बावधनमधील नागरिक या झऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत होते. आज या झऱ्याचा पाझर दूषित होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे राज्याच्या भूजल विभागाने २०१८ साली झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. 

तसेच, झऱ्याच्या संरक्षणासाठी काय करावे आणि पाणी वितरण कसे करावे याचीही सूचना केली होती. सध्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत जाणाऱ्या या पाण्याचा उपयोग वर्षभर करता येऊ शकतो. अशा जलस्रोतांचे महापालिकेने रक्षण केले पाहिजे अशी अपेक्षा बावधनमधील स्टार गेज सोसायटीतील रहिवासी कृणाल घारे यांनी 'सीविक मिरर'कडे व्यक्त केली.

बावधनमधील रहिवासी श्रीमंत जगताप म्हणाले, मी २०१९ सालापासून इथे वास्तव्यास आहे. माझ्या आजूबाजूच्या परिसरात विकत पाणी घ्यावे लागते. त्याचा खर्च प्रचंड असल्याने सोसायटी दरमहा साडेतीन हजार रुपये देखभाल दुरुस्तीसाठी घेते. महापालिकेने पाणी पुरवल्यास हा खर्च निम्म्याने कमी होईल.  

पाणी कपात करणाऱ्या महापालिकेने इकडेही लक्ष द्यावे...

एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने १८ मे पासून शहरात पाणी कपात जाहीर केली आहे. एकीकडे शहरात पाणीकपात केली जात आहे. दुसरीकडे शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अपुरा पाऊस अथवा दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचा पिण्यासाठी अथवा नित्याच्या उपयोगासाठी वापर करणे शक्य आहे. यातील विरोधाभास म्हणजे बावधनमधीलच अनेक सोसायट्यांना महापालिकेचे पाणी अजून पोहोचले नाही. त्यांना महिन्याला लाखो रुपये खर्च करून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याच बावधनमधील स्वच्छ पाण्याचा झरा मात्र प्रदूषणाच्या विळख्यात जात आहे. पाषाण, जांभूळवाडी आणि कात्रज तलाव यापूर्वीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. आपत्कालिन आणि इतर वेळीही या जलस्रोतांचा उपयोग वाढत्या लोकसंख्येची पाण्याची भूक भागवण्यासाठी करता येऊ शकतो. मात्र, मुळा-मुठा नदीप्रमाणे हे स्रोतही खराब झाले आहेत.

बावधनचा झरा संरक्षित करा – भूजल विभाग

राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने २०१८ साली बावधनमधील झऱ्याचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी त्यांनी या झऱ्याचे पाणी वापरास सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. झऱ्याचा परिसर तारेच्या कुंपणाने बंदिस्त करून तिथे सरकारी मालमत्ता असा फलक लावण्यास सांगितले होते. त्याचबरोबर झऱ्यापासून ५० मीटर परिसरात बांधकामास मज्जाव करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर झऱ्याचे पाणी साठवण्यासाठी स्प्रिंग बॉक्स करण्यास बजावले होते. झऱ्याच्या पाण्यात खराब पाणी मिसळू नये याची दक्षता घेण्यासही बजावले होते. या झऱ्याचे पाणी टाकीमध्ये साठवून आजूबाजूच्या परिसराला दैनंदिन वापरासाठी अथवा पिण्यासाठी पुरवता येईल, असेही भूजल विभागाने स्पष्ट केले होते. पिण्यासाठी पाणी वितरित करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून आरओ मशिनद्वारे पुरविण्यास सांगितले होते. भूजल विभागाने १२ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्य सरकारला त्याबाबतचा अहवाल दिला होता. पाण्यातील विरघळलेले घटक, पीएच लेवल, फ्लोराईड, क्लोराईड, सोडियम, लोह, कठीणपणा अशा विविध प्रकारच्या १७ रासायनिक चाचण्या केल्यानंतर भूजल विभागाने पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले होते. या अहवालानंतरही झरा संरक्षित करण्याकडे महापालिकेने लक्ष दिलेले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story