मेट्रोमुळे पालिकेचे तुकड्या तुकड्यांनी डांबरीकरण

पावसाळापूर्व दुरुस्तीकामांसाठी दिलेली मुदत उलटून गेली तरी शहरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजीची कामे अजून संपलेली नाहीत. कर्वेनगर परिसरातील विठ्ठल मंदिर रस्त्याचे काम मेट्रो आणि महापालिका प्रशासनाच्या वादात अडकले आहे. लाईटच्या कामासाठी दोन महिन्यांपूर्वी येथे खोदकाम केलेले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Thu, 15 Jun 2023
  • 12:44 am
मेट्रोमुळे पालिकेचे  तुकड्या तुकड्यांनी डांबरीकरण

मेट्रोमुळे पालिकेचे तुकड्या तुकड्यांनी डांबरीकरण

कर्वेनगर परिसरात मेट्रोने दोन महिन्यांपूर्वी केले होते खोदकाम, पालिकेच्या पाठपुराव्यानंतरही िवद्युतवािहनीचे काम संथ गतीने, डांबरीकरणही रखडले

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पावसाळापूर्व दुरुस्तीकामांसाठी दिलेली मुदत उलटून गेली तरी शहरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजीची कामे अजून संपलेली नाहीत. कर्वेनगर परिसरातील विठ्ठल मंदिर रस्त्याचे काम मेट्रो आणि महापालिका प्रशासनाच्या वादात अडकले आहे. लाईटच्या कामासाठी दोन महिन्यांपूर्वी येथे खोदकाम केलेले आहे. हे काम मंदगतीने सुरु असल्याने आता पालिकेने हा दोनशे फुटांचा वगळून उर्वरित दीड किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका स्थानिक नागरिकांना बसणार आहे.  

शहरातील अनेक रस्ते दुरुतीसाठी खोदून ठेवले आहेत मात्र दुरुतीचे काम अजूनही सुरूच आहे. एरंडवणा, कर्वेनगर या ठिकाणचे अनेक महत्वाचे आणि वर्दळीचे रस्ते खोदून ठेवले आहेत, मात्र त्यांच्या दुरुतीच्या कामास अद्याप वेग आलेला नाही. कर्वेनगर परिसरातील विठ्ठल मंदिर रस्त्यावर मेट्रोच्या लाईटच्या कामासाठी मागील दोन महिन्यांपूर्वी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र मेट्रोचे हे काम अतिशय मंद गतीने सुरु आहे, त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाला येथील रस्त्याचे काम करता येत नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मेट्रोच्या अर्धवट कामांचा फटका नागरिकांना आणि पालिकेला देखील बसत आहे. मागील अनेक दिवसांपासून येथील काम अर्धवट अवस्थेत आहे. मेट्रो आणि ठेकेदाराच्या वादामुळे ते पडून असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत पालिकेने वारंवार मेट्रोसोबत बैठका घेऊन, नोटीस बजावून याचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे सांगितले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मेट्रोच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालिकेने तेथील दोनशे फुटाचा भाग सोडून बाकी दीड किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण करणार आहे. मेट्रोच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे रस्त्याच्या दोनशे फुटांचे डांबरीकरण करता येणे अशक्य बनले आहे. मेट्रो आणि पालिकेच्या कार्यपद्धतीचा फटका नागरिकांना बसत आहे. येथील सर्व कामे त्वरित पूर्ण करावीत आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. कामे पूर्ण करूनच संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे, या दोनशे फुटांची नंतर तात्पुरती डागडुजी करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपचे प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

कर्वेनगर परिसरातील विठ्ठल मंदिर, समर्थ पथावरील शक्ती ९८ चौकातील रमांबिका मंदिरासमोरील रस्ता, शैलेश पुलाचा रस्ता, राहुल नगर परिसरातील रस्ते विविध प्रकारच्या दुरुस्तीकामासाठी मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून खोदून ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज करून या रस्त्यांवरील दुरुतीकाम लवकर पूर्ण करण्याबाबत विनंती केलेली आहे. मात्र पालिका प्रशासनाने नागरिकांना फक्त आश्वासनेच दिली आहेत. प्रत्यक्षात स्थिती मात्र जैसे थे च आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

समर्थ पथावरील 'शक्ती ९८' चौकात रमांबिका मंदिरासमोर एका खासगी कंपनीने भर चौकात खोदकाम करून अर्धवट अवस्थेत सोडले आहे. बरेच दिवस येथील दुरुतीचे काम त्यांनी बंद केले आहे. येथूनच जवळ असलेल्या प्रतिज्ञा मंगल रस्त्यावर एल अँड टी कंपनीचे जमिनीअंतर्गत केबल टाकण्याचे काम सुरु आहे. तेही अर्धवट आहे. याठिकाणी लांबच लांब खोदकाम केले आहे. शैलेश पुलावरील रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. मात्र त्याकामासाठीचा सर्वत्र राडारोडा पडलेला आहे. येथून जाता येताना प्रचंड धुळ उडते. त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठे लोखंडी पाईप पडून आहेत. या प्रलंबित कामांबाबत खर्डेकर यांनी ११ मे रोजी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले होते. त्यावेळी आयुक्तांनी आणि पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व कामे आठ दिवसांत पूर्ण केले जातील, असे सांगितले होते.  मात्र महिना उलटून गेला तरी खोदकाम आणि रस्ते 'जैसे थे' स्थितीत असल्याचे दिसून येतात. पावसाळ्याचे दिवस सुरु झाले, जून महिना अर्धा संपला तरीही प्रशासनाची रस्ते दुरुस्तीचे कामे अजूनही सुरूच असल्याचे दिसून आले आहे.

मेट्रोच्या संबंधितांना हे काम लवकर करण्याचे सांगितले आहे. त्यांचे काम झाले की तातडीने रस्त्यांचे काम केले जाईल. याशिवाय बाकीच्या ठिकाणचेही कामे लवकरच पूर्ण केले जातील.

-विजय कुलकर्णी,

मुख्य अभियंता, पथ विभाग, 

पुणे महानगरपालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story