RTO's computer system : मुद्रांक, आरटीओच्या संगणक प्रणालीत पुन्हा अडथळे

मुद्रांक आणि नोंदणी विभाग तसेच प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) या दोन्ही कार्यालयांची संगणकीय प्रणाली सातत्याने क्रॅश होत असल्याने वारंवार सेवा ठप्प पडत आहे. परिणामी नागरिकांच्या रोषाला आरटीओ आणि मुद्रांक विभागाला सामोरे जावे लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Wed, 17 May 2023
  • 11:36 am
मुद्रांक, आरटीओच्या संगणक प्रणालीत पुन्हा अडथळे

मुद्रांक, आरटीओच्या संगणक प्रणालीत पुन्हा अडथळे

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

मुद्रांक आणि नोंदणी विभाग तसेच प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) या दोन्ही कार्यालयांची संगणकीय प्रणाली सातत्याने क्रॅश होत असल्याने वारंवार सेवा ठप्प पडत आहे. परिणामी नागरिकांच्या रोषाला आरटीओ आणि मुद्रांक विभागाला सामोरे जावे लागत आहे.  

हे दोन्ही विभाग नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सरकारी कार्यालयांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवेसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. मात्र, मुद्रांक विभागातील भाडेकराराचे संकेतस्थळ काम करत नसल्याने मंगळवारी (दि. १६) राज्यभरातून आलेल्या अधिकृत एजंट्सनी पुणे स्टेशन जवळील मुद्रांक विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या आर्थिक वर्षांत २ हजार ८३५ कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला आहे. तर, २०२२-२३ या आर्थिक वर्षांत मुद्रांक विभागाने राज्याला तब्बल ३८ हजार ५९७ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. इतक्या महत्वाच्या या दोन विभागातील संगणक प्रणालीत सध्या सातत्याने अडथळे येत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वस्तू आणि सेवा करानंतर (जीएसटी) सर्वाधिक महसूल देणारा विभाग म्हणून मुद्रांक विभागाकडे पाहिले जाते. मुद्रांक विभागात घर, सदनिका, जमीन खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी, गिफ्ट डीड, कुलमुखत्यार पत्र, घरे आणि सदनिकांचे भाडेकरार केले जातात. तर, वाहन परवाना, वाहनाची नोंदणी, वाहनाचा मालकी बदल, परराज्यातून अथवा जिल्ह्यातून आलेल्या वाहनाला नवा नोंदणी क्रमांक देणे अशी विविध कामे आरटीओ मार्फत केली जातात. नागरिकांसाठी या दोनही सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून भाडेकराराची नोंदणी करताना संकेतस्थळावर अडथळे येत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरभाडेकराराची सेवा देणाऱ्या अधिकृत एजंट्सनी मुद्रांक कार्यालयात मंगळवारी ठिय्या मांडला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story