विजेच्या कडकडाटात मोबाईल जीवघेणा

देशात दरवर्षी वीज पडून दोन हजारांहून अधिक जणांना प्राण गमवावे लागतात. वीज पडण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असून, त्यात मोबाईलचा देखील समावेश आहे. विजेच्या कडकडाटात मोबाईलवर बोलणे तुमच्यासाठी अधिक घातक ठरू शकते. ही दुर्मीळ घटना असली तरी, याची शक्यता असते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 6 Jun 2023
  • 08:09 am
विजेच्या कडकडाटात मोबाईल जीवघेणा

विजेच्या कडकडाटात मोबाईल जीवघेणा

मोबाईल वापरतानाच वीज अंगावर पडल्याच्या घटनांचा दाखला देत आयएमडीने केली सूचना

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

देशात दरवर्षी वीज पडून दोन हजारांहून अधिक जणांना प्राण गमवावे लागतात. वीज पडण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असून, त्यात मोबाईलचा देखील समावेश आहे. विजेच्या कडकडाटात मोबाईलवर बोलणे तुमच्यासाठी अधिक घातक ठरू शकते. ही दुर्मीळ घटना असली तरी, याची शक्यता असते. त्यामुळे विजेच्या कडकडाटात मोबाईलवर बोलणे टाळा, चार्जिंग सुरू असताना मोबाईलवर बोलू नका आणि विद्युत उपकरणांचा वापर टाळावा अशी सूचना पुण्याच्या हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) केली आहे.

देशात मे ते जुलै या कालावधीत विजा पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही जून महिन्यात विजांचा कडकडाट जास्त होतो. याच कालावधीत वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. लोकसंख्येची घनता, शहरीकरण आणि वीज पडण्यासाठी उपयुक्त भौगोलिक स्थान यावरूनही त्याच्या धोक्याची तीव्रता कमी-अधिक असते. महाराष्ट्रात मराठवाड्यात सर्वाधिक वीज कोसळण्याच्या घटना घडतात. खालोखाल विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. वीज पडून झालेल्या एकूण मृत्यूमध्ये ८६ टक्के मृत्यू घराबाहेर अथवा शेतात काम करताना झाले आहेत.  

पुण्याच्या हवामानशास्त्र विभागाने येत्या मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सूचना केल्या आहेत. त्यात ढगांच्या गडगडाटात झाडाखाली आसरा घेऊ नये, असे सांगताना मोबाईलचा वापर टाळण्याचीही सूचना केली आहे. घरात असताना चार्जिंग सुरू असताना मोबाईल वापरू नये. तसेच, एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरणही हाताळू नये, अशी सूचना केली आहे. मोबाईलबाबत त्यांनी प्रथमच अशी सूचना केली आहे.

आयएमडी पुण्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावणारी वीज भयानक असते. ती कोसळण्यासाठी जवळचा मार्ग निवडते. अशा विजेत लाखो व्होल्टची शक्ती असते. विजेच्या कडकडाटात मोबाईलवर बोलत असल्यास वीज तिकडे आकृष्ट होण्याची शक्यता अधिक असते. अशा घटना अत्यंत दुर्मीळ आहेत. या बाबत शास्त्रीय संशोधन झालेले नाही. मात्र, तसे निरीक्षण आहे. मोबाईलचा वापर करताना वीज अंगावर पडल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून विजेच्या कडकडाटात मोबाईलचा वापर टाळावा. घरात विजेचे उपकरण वापरत असल्यास त्याचाही वापर टाळावा. कारण घरावर वीज पडल्यास ती उपकरणांमार्फत, घरात पोहचू शकते.

आयएमडी पुणे येथील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, विद्युतप्रवाह खेळता असलेल्या उपकरणांमध्ये वीज पडण्याची शक्यता अधिक असते. विमानतळावर बसवलेल्या संवेदनशील उपकरणांबाबतचा आमचा तोच अनुभव आहे. विमानतळावरील धावपट्टीलगतच्या हवामान बदलाची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून देशातील अनेक विमानतळावर १८ फूट उंचीवर अशी उपकरणे बसवली होती. विजेच्या कडकडाटात बंद उपकरणे सुरक्षित राहतात तर

सुरू असलेली उपकरणे वीज पडल्याने नादुरुस्त होत असल्याचा अनुभव आहे. तीच बाब मोबाईलबाबतही आहे. मात्र, विजेला आकृष्ट करणाऱ्या कारणांपैकी ते एक कारण आहे. संबंधित व्यक्तीचे भौगोलिक स्थान, मोबाईलची स्थिती कशी आहे, म्हणजे त्यावेळी त्याचा वापर किती झालाय आणि वीज पडण्याच्या स्थितीत संबंधित व्यक्ती कोठे आहे, यावरही वीज पडण्याची शक्यता कमी अधिक ठरते.

वीज ही तिच्यापासून सर्वात जवळच्या म्हणजे समुद्रसपाटीपासून उंचीवरच्या स्थानावर पडते. वीज पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती असताना एखादी व्यक्ती मोबाईलचा वापर करत असल्यास तिथे वीज पडण्याचा धोका अधिक वाढतो. दुर्दैवाने याच काळात एखादी व्यक्ती मोबाईलवर अधिक वेळ बोलत असल्यास मोबाईल तापतो. असा मोबाईल विजेला आकर्षित करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास विजेच्या कडकडाटात मोबाईल वापरणे म्हणजे घर उघडे ठेऊन चोराला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे खुळे म्हणाले.  

दरवर्षी वीज पडून अडीच हजार व्यक्ती गमावतात प्राण

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशात दरवर्षी दोन हजारांहून अधिक व्यक्ती वीज अंगावर कोसळल्याने मृत्युमुखी पडतात. देशात २०१७ साली २८८५, २०१८ साली २३५७ आणि २०१९ साली २८७६ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला होता, तर २०२१ साली देशात पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तीत ७ हजार १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २८८० जणांचा मृत्यू (४० टक्के) वीज पडून झाला आहे. पुरामुळे ६५६ आणि भूस्खलनात ३८० जणांनी प्राण गमावले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story