राजकीय भूकंपावर मिम्सचे

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर २०१९ साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. रविवारी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 3 Jul 2023
  • 09:08 am
राजकीय भूकंपावर मिम्सचे

राजकीय भूकंपावर मिम्सचे

राजकीय उलथापालथींवर नेटकरी झाले व्यक्त; एकाचवेळी आश्चर्य, टीका अन् विनोदाची उधळण

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर २०१९ साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.  रविवारी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या घटनेवर महाराष्ट्रातील हजारो नेटकऱ्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर या माध्यमातून मिम्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

'निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की, त्यांनी मतदान करण्याच्या वेळी मतदाराच्या बोटाला शाही लावण्याऐवजी चुना लावावा', देवेंद्र फडणवीस यांची एक व्हीडीओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून त्यामध्ये ते म्हणताहेत की, राष्ट्रवादी पक्षासोबत युती होणे शक्यच नाही. आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. अविवाहित राहणे पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही'  त्यात पुढे लगेचच अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपत घेत असल्याचे दिसत आहे.

'अजित पवारांबरोबर गेलेले आमदार नाराज. म्हणे आम्हाला सुरत, गुवाहाटी, गोवा कुठेच नेले नाही, थेट राजभवनात घेऊन गेले'  असा संदेश प्रचंड व्हायरल होत आहे.  एका मिममध्ये किरीट सोमय्या हातात पेपरचे दोन मोठे गठ्ठे घेऊन उभे आहेत. त्याखाली 'या सगळ्यांची होडी करून सोडून देतो' असा मजकूर लिहिलेला दिसतो आहे. एका मिममध्ये देवेंद्र फडणवीस हातात कुऱ्हाड घेऊन जंगलात उभे असून त्याखाली 'पक्षतोड्या' असे लिहिले आहे.  एकामध्ये एकनाथ शिंदे यांचा गंभीर चेहऱ्याचा फोटो असून त्यावर लिहिले आहे की, 'सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'.  तर एकीकडे देवेंद्र फडणवीस एक पुस्तक वाचत असून 'पक्ष कसा फोडावा' हे नाव असलेले पुस्तक त्यांच्या हातात दाखवले आहे.  अण्णा हजारे डोक्याला हात लावून 'कोणाविरुद्ध उपोषण करावे तेच कळत नाही' असे म्हणताना दाखवले आहे. एका मिममध्ये अजित पवार यांचा फोटो लावून 'रिस्क है तो इष्क है' असे म्हणत 'स्कॅम २०२३' असे पोस्टर बनवले आहे. तर एकाने लिहिले आहे, 'महाराष्ट्राचं राजकारण चांदणी चौकासारखं झालंय. कोण कुठे चाललंय तेच कळेना'.

एका मिममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी खुर्चीत शेजारी बसले असून एकमेकांकडे पाहात असल्याचे दाखवले आहे. "आता हे दोघेच उरलेत. हे एकत्र आले की आपण मतदार डोळे मिटायला मोकळे' अशा आशयाचा संदेश त्याखाली लिहिलेला आहे.  महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणतायेत 'मी आता राज्यपाल नाही माझं नाव घ्याल तर डोक्यात दगडच घालील'.  एका मिममध्ये 'भाकरी फिरवता फिरवता अजित दादांनी चूलच उचलून नेली', असे म्हटले आहे.  दुसऱ्या एका मिममध्ये 'अजितदादांनी तवा फिरवून चुलीत पाणी टाकले' असे म्हटले आहे.  समृद्धी महामार्गावरील घडलेल्या घटनेवरील शरद पवार यांनी केलेल्या विधानात थोडा बदल करून एका नेटकऱ्याने म्हटले आहे,  'काका, दादा पण देवेंद्रवासी झाले'.  तर एका नेटकऱ्याने अजित दादा आणि देवेंद्रजी यांना लोकांच्या झोपेचा नेमका काय त्रास होतो? पहाटे सुखाने झोपू देत नाही ना रविवारी दुपारी' अशी टिपण्णी केली आहे. तर एकाने 'आता महाराष्ट्रात बऱ्याच दिवसानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना पावसाळी सुट्टी मिळणार' असल्याचे सांगितले आहे.

शाळेतील मुले दोन्ही हाताने डोके दाबून धरत 'अरे किती वेळा मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री पाठ करायचे' असे दाखवले आहे. एकात एक बातमी दाखवली आहे त्यात सुप्रिया सुळे यांचे मत 'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असे दहा जन्मात होणार नाही' असे म्हटले आहे. त्याखाली अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना दाखवून 'वा दादा वा' असा मजकूर लिहिला आहे. एकात अजित पवार म्हणतात, 'म्हटलं होतं ना सत्ता कोणाचीही असो, उपमुख्यमंत्री मीच होणार' असे नमूद करण्यात आले आहे. एक बैलगाडी घेऊन देवेंद्र फडणवीस चालले आहेत मागे बैलगाडीत भल्या मोठ्या फाईलचा ढीग दाखवला असून 'अजित पवार यांच्या विरोधातील गाडीभर पुरावे धरणात नेऊन टाकण्यासाठी जाताना फडणवीस' असे लिहिले आहे. भाषण करतानाच्या एका छायाचित्रात अजित पवार म्हणतात 'खरं सांगतो भावांनो काकांना यातलं काहीच माहीत नव्हतं'. 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील एका संवादाचा फोटो दाखवत त्यावर 'ईडीग्रस्त नेते अधिकाऱ्यांना म्हणतायेत फाईल क्लियर करायची तयारी ठेवा'. एका फोटोत अभिजित बिचुकले यांचा बोलतानाचा फोटो असून त्यावर लिहलंय 'आतातरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहे की नाही?' असा सवाल उपस्थित केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे ओमप्रकाश तथा बच्चू कडू हे दवाखान्यातील एका खाटेवर बसले आहेत. त्यांच्या डोक्याला पट्टी बांधली असून त्या फोटोवर लिहिले आहे, 'विसरलात ना मला'. एका नेटकऱ्याने अजित पवार याचे शपथ घेतानाचे फोटो टाकत त्यावर म्हटले आहे, 'शपथविधी असा करा की सगळेच जण जागेवरच हादरले पाहिजेत' 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story