Jambhulwadi Lake : भुलीचे औषध बेतले माशांच्या जिवावर

जांभूळवाडी तलावामध्ये मच्छीमारांनी भुलीचे औषध टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले आहेत. या मृत माशांची दुर्गंधी परिसरात पसरली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 15 May 2023
  • 04:54 pm
भुलीचे औषध बेतले माशांच्या जिवावर

भुलीचे औषध बेतले माशांच्या जिवावर

जांभूळवाडी तलावात मृत माशांचा खच, परिसरात दुर्गंधी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

जांभूळवाडी तलावामध्ये मच्छीमारांनी भुलीचे औषध टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले आहेत. या मृत माशांची दुर्गंधी परिसरात पसरली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तलावात मासेमारी करणारे मच्छीमार हे लवकर मासे मिळावे, यासाठी जांभूळवाडी तलावात भुलीचे औषध किंवा पावडर टाकतात. त्यामुळे मासे पाण्यावर तरंगतात. या औषधाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे मासे मृत झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

मृत माशांचे प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये मोठ्या माशांसह छोटे-छोटे शेकडो मासे पाण्यातच तडफडून जीव सोडत होते. अशा माशांचा तलावात खच पडला होता. यापूर्वीही जांभूळवाडी तलावामध्ये असा प्रकार घडला होता. मात्र प्रशासन यावर ठोस कारवाई करत नसल्याने या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.  

‘‘जांभूळवाडी तलावामध्ये मागील काही वर्षांपासून प्रदूषित पाणी सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरातही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जांभूळवाडीचा भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे. मात्र येथील नागरिकांच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही. त्यामुळे तलावाशेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटींचे सांडपाणी तलावात सोडले जात आहे. परिणामी येथील पाणी प्रदूषित होत आहे. त्याचा येथील जलचर प्राण्यांच्या जिवाला धोका पोहचत आहे,’’ अशी माहिती सुधीर कोंढरे यांनी दिली.

यापूर्वीही येथे मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील मच्छीमार मासे पकडण्याआधी माशांना भूल देतात. त्यासाठी तलावातील पाण्यात काही औषधी पावडर टाकली जाते. त्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळेही असा प्रकार घडू शकतो. मासेमारी करणाऱ्यांवर  मत्स्यबीज विभागाचे नियंत्रण आहे. ते तलावामध्ये मत्स्यबीज सोडतात. यातील मासे मोठे झाले की ते पकडून विक्रीसाठी पकडले जातात. त्यासाठी निविदा काढल्या जातात. मात्र मासे पकडायला सोपे जावे, यासाठी पाण्यात भुलीचे औषध टाकले जात असल्याच्या माहितीला पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला.

‘‘या तलावात वारंवार मासे मरत आहेत. शिवाय तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी आणि येथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी,’’ अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तलाव परिसरात वाढलेल्या मानववस्तीतील ड्रेनेजचे पाणी तलावात सोडले जात आहे. त्यावर पाटबंधारे विभाग आणि महापालिकेची उदासिनता दिसून येते आहे. या प्रकरणी पाटबंधारे विभाग आणि महापालिका हे एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकत आहेत. त्यांच्या या धोरणाने तलाव मात्र दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे.

‘‘तलावामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले की पाण्याचा विषारीपणा वाढतो. उन्हाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. त्याचे कारण उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन होते आणि तलावामध्ये नवीन पाणी येत नाही. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. परिणामी पाण्याच्या विषारीपणात वाढ होते. दोन प्रकारे पाण्यातील प्रदूषण होत असते. एक म्हणजे थेट सांडपाणी सोडल्यामुळे. त्याला पॉईंट सोर्स असे म्हणतात. आणि दुसरा नॉन पॉईंट सोर्स. म्हणजे तलावामध्ये पावसाच्या पाण्यामुळे येणारे प्रदूषण. त्यामध्ये रस्त्यावर सांडलेले डिझेल, पेट्रोल, ऑइल, काही विषारी घटक तलावाच्या पाण्यात येत असतात. हे प्रमाण वाढले तर ते सजीवांना अपायकारक ठरू शकते. यामुळेच  मासे मृत पावले आहेत का, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु हे कारण असण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक प्रा. गुरुदास नूलकर यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story