अशी ही बनवाबनवी

महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, नरेंद्र दाभोलकर यांच्या पुरोगामी विचारांचा वसा घेतलेल्या पुणे शहरात काळी जादू करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहराच्या विविध भागात फिरून नागरिकांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांना सुखाची खोटी स्वप्ने विकतात. दैन्य, दारिद्र्य पिडा दूर करण्यासासाठी अंगठी, धागे दोरे, अंगारा अशा वस्तू देऊन आर्थिक फसवणूक करतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Wed, 12 Jul 2023
  • 12:17 am
अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी

खोटी स्वप्ने दाखवत अंगठी, गंडे-दोरे, अंगारा अशा वस्तू विकणाऱ्या टोळ्या अभिनय आणि गर्दीच्या मानसशास्त्राचा उपयोग करून भर रस्त्यात नागरिकांना घालताहेत अशाप्रकारे गंडा...

महेंद्र कोल्हे / नितीन गांगर्डे

mahendra.kolhe/ nitin.gangarde@civicmirror.in

महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, नरेंद्र दाभोलकर यांच्या पुरोगामी विचारांचा वसा घेतलेल्या पुणे शहरात काळी जादू करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहराच्या विविध भागात फिरून नागरिकांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांना सुखाची खोटी स्वप्ने विकतात. दैन्य, दारिद्र्य पिडा दूर करण्यासासाठी अंगठी, धागे दोरे, अंगारा अशा वस्तू देऊन आर्थिक फसवणूक करतात. रेल्वे स्थानकाजवळील जहांगीर रुग्णालयाजवळच्या अलंकार थिएटरच्या पुलावर पाच जणांची एक टोळी अशीच बतावणी करत नागरिकांना लुटत असल्याचे ‘सीविक मिरर’च्या पाहणीत आढळून आले.

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात या काळ्या ‘विद्ये’ चे वर्ग भर रस्त्यावर सुरू आहेत. गंडे, दोरे घातल्याने आणि अंगाऱ्याच्या पुड्या घरात ठेवल्याने सुखाचे दिवस येतील अशी खोटी स्वप्न दाखवली जात आहेत. ते घेण्यासाठी नागरिकांना भरीस घालत पैसे उकळून आर्थिक फसवणूक सुरू आहे. अलंकार पुलावर पाच जणांची टोळी एकत्र जमते. त्यांच्यातील एक जण मोठ्याने चमत्काराची भाषा बोलून त्याच्याकडील धागे घेतल्याने गृहशांती, आर्थिक उन्नती, मनोकामना पूर्ण होतील अशी आश्वासने देतो. तेथे त्याचेच काही लोक इतरांच्या समवेत घोळका करून उभे असतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांची उत्सुकता चाळवली जाते आणि ते देखील घोळक्यात सामील होतात. त्याच टोळीतील लोक पैसे देऊन धागे, दोरे खरेदी करतात. धागे-दोरे घेतल्यावर तुमची पीडा गेली. आता मागे न पाहता पुढे जा असे सांगितले जाते. येथे जमलेले लोक त्यांच्याकडून अशा वस्तू घेऊन मागे न पाहता जातात. काही लोकांकडून पैसे घेतल्यावर ही टोळी येथून पांगते. दुसरीकडे जाऊन पुन्हा हाच खेळ नव्या जोमाने सुरू होतो. जागा नवी, सदस्य तेच, जुनाच खेळ नव्या ठिकाणी पुन्हा सुरू होतो. फसवणारे तेच असतात, फसणारे आता बदलले असतात. 

फसवणूक करणाऱ्या या टोळीने गर्दीचे मानसशास्त्र ओळखलेले असते. अभिनयाची माहिती आणि गर्दीचे मानसशास्त्र जाणलेले हे भामटे आवाजात नाट्यमय चढ-उतार करत नागरिकांना फशी पाडतात. समोरच्याला संभ्रमात करण्याची कला त्यांनी अवगत केलेली असते. कमी त्रासात त्यांचे कमाईचे दुकान चांगलेच तेजीत चालले असते. त्यात शहरात नव्याने आलेले प्रवासी, रस्त्याने येणारे-जाणारे नागरिक त्यांच्यात फसत राहतात.    

मंगळवारी, ११ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता अलंकार थिएटरच्या पुलावर अशीच नागरिकांची फसवणूक झाली. याच टोळीतील एकजण सांगत होता की, काळा धागा घातल्याने तुमच्या समस्या दूर होतील, तुमची प्रगती होईल. त्याच्या अवतीभवती जवळपास सात ते आठ लोक थांबले होते. पाच लोक तर त्याच टोळीचे होते. लोकांना त्याचे म्हणणे पटवून जाळ्यात ओढण्यासाठी ते स्वतःहून भाषण करणाऱ्याला पैसे देत होते.  हे सगळं पाहिल्यानंतर दोन मुलांनी त्याला दोनशे रुपये दिले. बोलणाऱ्याने दोघांपैकी एकाच्या हातात एक छोटी वस्तू  दिली आणि त्याला मूठ बंद करायला सांगितले. आता सरळ पुढे जा, मागे पाहू नको. ते गेल्यावर तेथील पाच जण तेथून लगेच पसार झाले.

‘सीविक मिरर’च्या प्रतिनिधीने या दोन मुलांना गाठले. त्यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले की, आमची फसवणूक झाली. जादूटोणा करून त्यांनी आमच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये उकळले". फसवणूक झालेले ते दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. पैसे गेल्याने त्यांचे डोळे भरून येत होते. आमचे पैसे आम्हाला परत मिळतील का, असे विचारत होते. मात्र तोपर्यंत फसवणूक करणारी टोळी पसार झाली होती. थोड्या वेळाने जागा बदलून हीच टोळी दुसऱ्या बकऱ्याच्या शोधात उभी असल्याचे  ‘सीविक मिरर’च्या  पाहणीत आढळून आले.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना विचारले असता त्यांनी या टोळीविषयी काही माहिती नाही. त्यांचे फोटो मिळाले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story