चिंचवड येथील काळभोरनगरमधील क्रोमा इलेक्ट्रिक रिटेल शोरूममध्ये चोरी
सीविक मिरर ब्यूरो
feedback@civicmirror.in
क्रोमा शोरूममधून एका जोडप्याने अवघ्या सात मिनिटांत पावणे दोन लाखांचा मोबाईल लंपास केला असल्याची माहिती समोर आली आहे. सॅमसंग गॅलॅक्सी फोल्ड ४–१२ जीबी हा तब्बल १ लाख ७७ हजार ९९९ रुपयांचा फोन भरदिवसा चोरीला गेला आहे. चिंचवड येथील काळभोरनगरमधील क्रोमा इलेक्ट्रिक रिटेल शोरूममध्ये ही घटना घडली असून, या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदानंद सुभाष सावंत (वय ३८, रा. चिखली) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (३० जानेवारी) सकाळी ११.२९ ते ११.३६ दरम्यान ही चोरी झाली. त्यामुळे सीसीटीव्ही, इतर सुरक्षा व्यवस्था असताना एवढ्या मोठ्या दुकानातून एवढा महागडा फोन चोरीला गेलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने एक जोडपे शोरूममध्ये आले. त्यानंतर अवघ्या सात मिनिटांत या दोघांनी मोबाईल घेऊन शोरूममधून पोबारा केला. या मोबाईलला इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक लॉक सिस्टिम बसवण्यात आलेली असते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी महागडे मोबाईल डिस्प्लेसाठी ठेवण्यात आलेले असतात त्या ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले असताना ही चोरी झालीच कशी याबाबत सध्या उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
महागडे मोबाईल कुठे डिस्प्ले केले, याची माहिती चोरांना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या दोघांची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक सहायकाच्या मदतीने पिंपरी पोलिसांकडून तपास केला जात आहे. मात्र ही धूम स्टाईल चोरीची चर्चा सध्या रंगली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक आणि युवती इतर सामान्य ग्राहकांप्रमाणेच मोबाईल पाहात असल्याचे दिसते. यातील युवकाने मोबाईल हातात घेतला. काही वेळाने तो युवतीसोबत शोरूममधून बाहेर पडला.