महापालिकेची चिंधीगिरी !

जी-२० परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने परदेशातून आलेले पाहुणे जाताच शहराच्या सजावटीच्या वस्तू तत्काळ हटवण्यात आल्या. मोठ्या कुंड्या तशाच ठेवल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आता शोभिवंत झाडांच्या मोठ्या कुंड्यासुद्धा हटवल्या आहेत.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आता शोभिवंत झाडांच्या मोठ्या कुंड्यासुद्धा हटवल्या आहेत.

जी-२० च्या निमित्ताने पुलावर लावलेल्या मोठ्या कुंड्या कायम ठेवण्याच्या आश्वासनानंतरही हटवल्या

राहुल शिंदे 

rahul.shinde@civicmirror.in

TWEET@rahulsmirror

 

जी-२० परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने परदेशातून आलेले पाहुणे जाताच शहराच्या सजावटीच्या वस्तू तत्काळ हटवण्यात आल्या. मोठ्या कुंड्या तशाच ठेवल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी  मात्र आता शोभिवंत झाडांच्या मोठ्या कुंड्यासुद्धा हटवल्या आहेत.

जी-२० परिषदेसाठीची एक महत्त्वाची बैठक १६ आणि १७ जानेवारीला पुण्यात झाली. या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी सजावट करण्यात आली होती. परिषद आटोपल्यानंतर सजावटीच्या गोष्टी काढण्यात आल्या. रस्त्यावर लावण्यात आलेले विविध ध्वज, शोभिवंत फुलांच्या आणि झाडांच्या लहान कुंड्या, लेझर लाईट-रोषणाईची झाडे , रंगबिरंगी पडदे, एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्यदिव्य बॅनरही काढण्यात आले. यामुळे महापालिकेवर टीका झाली. लहान कुंड्या चोरीला जाण्याची शक्यता असल्याने त्या पुन्हा उद्यानात ठेवल्या. मोठ्या कुंड्या तशाच ठेवल्या जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आता शोभिवंत झाडांच्या या कुंड्यासुद्धा येरवडा येथील तारकेश्वर पुलावरून मंगळवारी (दि. ३१ जानेवारी) हटवण्यात आल्या.

लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचे काम जी-२० परिषदेच्या निमित्ताने अवघ्या काही दिवसांत पूर्ण करण्यात आले. तसेच रखडलेल्या गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन परदेशी पाहुणे येण्यापूर्वी उरकून घेतले. तारकेश्वर पुलावर लहान-मोठ्या फुलांच्या आणि झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. विविध रंगांचे ध्वज उभे करून परिसराची शोभा वाढवण्यात आली. लेझर शोद्वारे परिसराचा माहोल बदलण्यात आला. त्यामुळे नेहमी भकास असलेल्या तारकेश्वर पुलाचा चेहरामोहरा बदलून गेला होता. या पुलावरील सर्व वस्तू हटवण्यात आल्या असल्या तरी तमिळनाडू येथून आणलेली ख्रिस्टेनिया जातीची झाडे मोठ्या कुंड्यात ठेवली होती. परंतु, मंगळवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने ही झाडे उचलून पुन्हा उद्यानात ठेवण्यात आली.

जगभरातील विकसित राष्ट्रांमधील सुमारे ६० जणांच्या स्वागतासाठी पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या विविध विभागांनी तयारीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. शहराच्या प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. पाहुण्यांना दिसू नये, असा भाग पडद्यांनी झाकला. शहरातील बदललेले हे चित्र पुणेकरांना भावले. नेहमी शहर असेच सजवलेले असावे, अशी अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केली. परंतु, काही दिवसांतच शहराला सजवलेला हा साज काढण्यात आला. त्यामुळे पालिका प्रशासनाने पुणेकर नागरिकांची तसेच करदात्यांची फसवणूक केली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

तारकेश्वर पुलावर ठेवण्यात आलेली झाडे ही ख्रिस्टेनिया जातीची आहेत. जास्त काळ उन्हात ठेवल्यास ती सुकून जातात. तसेच त्यांची पानगळ होते. काही दिवसांपूर्वीच ती कुंड्यांमध्ये लावण्यात आली आहेत. अद्याप त्यांची मुळे खोलवर गेली नाहीत. त्यामुळे काही दिवस या कुंड्या सावलीत ठेवल्या जाणार आहेत. त्यांना नवी पालवी फुटल्यावर आणि ती हिरवीगार झाल्यावर या कुंड्या पुन्हा तारकेश्वर पुलावर आणून ठेवल्या जातील.

- अशोक घोरपडे, उद्यान विभाग प्रमुख, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story