मालमत्ता करवसुलीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनोखा उपक्रम, देशातील पहिलीच पालिका

सध्या झपाट्याने लोकप्रिय झालेल्या 'मीम्स'ने तरुणाईवर गारुड केले आहे. एखाद्या व्यवसायापासून ते चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी मीम्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. हसत-खेळत, चिमटे काढत व्यक्तीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या 'मीम'चा वापर पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाने थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सुरू केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Feb 2023
  • 09:30 am
मालमत्ता करवसुलीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनोखा उपक्रम, देशातील पहिलीच पालिका

मालमत्ता करवसुलीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनोखा उपक्रम, देशातील पहिलीच पालिका

करवसुलीची नवी थीम... मीम!

विजय चव्हाण

vijay@punemirror.com

TWEET@Cvijaymirror

सध्या झपाट्याने लोकप्रिय झालेल्या 'मीम्स'ने तरुणाईवर गारुड केले आहे. एखाद्या व्यवसायापासून ते चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी मीम्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.  हसत-खेळत, चिमटे काढत व्यक्तीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या 'मीम'चा वापर पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाने थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सुरू केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मूळ कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे या आठवड्यापासून वर्तमानपत्रासह विविध समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. ‘‘या थकबाकीदारांमध्ये निवासी, कंपन्या, संस्था, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. चार वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या मालमत्तांची संख्या १ लाख १८६ असून त्यांच्याकडे ३०५  कोटी ६९  लाख ७५  हजार रुपयांची थकबाकी आहे,’’ अशी माहिती करसंकलन आणि  कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांसाठी करसंकलन विभागाने 'मी थकबाकीदार' या मीम स्पर्धेचे आयोजन केले असून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विविध संस्थांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या भन्नाट उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा केवळ पिंपरी-चिंचवड शहरासाठी मर्यादित न राहता आता पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार करसंकलन विभागाचे  अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. वारंवार आवाहन करूनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातच कर संकलन विभागाने आता थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मीम स्पर्धा आयोजित करून एक अनोखा उपक्रमही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केला आहे. सोशल मीडियावरील बहुतांश वापरकर्ते या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. अतिशय कल्पनात्मक मीम बनवत ते ‘मी थकबाकीदार’ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत."

प्राधिकरण येथील नागरी  कार्यकर्ते विजय पाटील म्हणाले, ‘‘सराईत करबुडव्यांना या योजनेमुळे किती फरक पडेल माहीत नाही; पण  या उपक्रमाची चर्चा आता केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित न राहता, सर्वसामान्य नागरिकांमध्येही सुरू झाली आहे. चारचौघांमध्ये थकबाकीदाराला अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी यासाठीचा हा प्रयत्न अफलातून आहे. नवनवीन कल्पना वापरूनच थकबाकी वसूल होऊ शकेल. अर्थात फौजदारी आणि दंडात्मक कारवाई थंडावता कामा नये.’’

देशातील पहिली महानगरपालिका!

मालमत्ता करवसुलीसाठी मीम स्पर्धेसारखा अनोखा उपक्रम राबवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातीलच पहिली महापालिका असल्याची चर्चाही सोशल मीडियावर आहे. आतापर्यंत करवसुलीसाठी विविध महापालिकांनी थकबाकीदारांच्या दारामध्ये जाऊन बॅण्ड वाजवण्यासारखे उपक्रम केले आहेत. परंतु या पारंपरिक गोष्टींपासून थोडा वेगळा उपक्रम मीम स्पर्धेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबवला आहे. त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

 

मीम्स' विषयी:

आजकाल इंटरनेटवर मीम्सचा वापर करून लोकांना ट्रोल तसेच काही गोष्टींवर टीका टिप्पणी केली जाते. समाजमाध्यमांवर कोणाबद्दल चांगले किंवा वाईट मत मांडायचे असेल तर मीम्सचा वापर केला जातो. शाब्दिक लिखाणापेक्षा चित्र आणि विनोद यांची सांगड घालून बनवलेल्या मीम्सच्या माध्यमातून विचार स्पष्ट होतात. म्हणून मीम्सला लोक अधिक पसंती दर्शवतात आणि हेच मीम्स व्हायरलसुद्धा होतात.

मीम्सचा उपयोग इंटरनेटच्या आधीपासून केला जात आहे. १९०६ मध्ये ब्रिटिश लेखक आणि जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांनी ‘द सेल्फिश जीन’ (The Selfish Gene) पुस्तक लिहिले. या पुस्तकात पहिल्यांदा मीम्स हा शब्द आढळला. इंटरनेट युगाने या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे.  सध्या मीम्सचा वापर कोणालाही बदनाम, ट्रोल करण्यासाठी केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story