Fraud Jobs : नसलेल्या नोकरीच्या आमिषाने लुबाडले

एका संस्थेत सरकारी नोकरी लावण्याच्या बतावणीने इच्छुकांकडून लाखो रुपये उकळले असून ज्या संस्थेत नोकरी लावतो असे सांगितले होते ती संस्थाच अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी राहुल अरविंद खोडके (वय २८, रा. तळेगाव ढमढेरे, मूळ रा. अन्वज, ता. खामगाव, जि. बुलडाणा) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 31 Jul 2023
  • 01:17 am
नसलेल्या नोकरीच्या आमिषाने लुबाडले

नसलेल्या नोकरीच्या आमिषाने लुबाडले

अस्तित्वात नसलेल्या संस्थेत नोकरी लावण्याची केली बतावणी, एकाला अटक, दुसरा फरारी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

एका संस्थेत सरकारी नोकरी लावण्याच्या बतावणीने इच्छुकांकडून लाखो रुपये उकळले असून ज्या संस्थेत नोकरी लावतो असे सांगितले होते ती संस्थाच अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी राहुल अरविंद खोडके (वय २८, रा. तळेगाव ढमढेरे, मूळ रा. अन्वज, ता. खामगाव, जि. बुलडाणा) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहेत.  

शिक्रापूर पोलिसांच्या माहितीनुसार श्रीकृष्ण विभीषण आवाड आणि  डॉ. कल्याण मधुकर घोडके या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य नियंत्रण व शिक्षण संस्थेचे जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र ही संस्था स्थापन केली. तिचे मुख्य कार्यालय शिक्रापूरला होते. या संस्थेची नोंदणी असून शासनाची मान्यता असल्याचे ते बतावणी करत. संस्थेने डिसेंबर २०२२ मध्ये दैनिकात नोकरी भरतीची जाहिरात दिली. त्यानुसार फिर्यादी खोडके यांची आवाड आणि डॉ. घोडके यांनी मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर काही दिवसांनी खोडके यांना बोलावून सरकारी आरोग्यसेवेत नोकरी लावतो अशी बतावणी केली. त्यासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तसेच शासनाचे आदेश व सही शिक्के असलेले काही कागद दाखविले. सरकारी नोकरीच्या आमिषाने  फिर्यादीने तीन लाख रुपये  संस्थेच्या खात्यावर भरले.

फेब्रुवारी २०२३ मध्ये खोडके यांना शासकीय नोकरीत रुजू झाल्याबाबत लेखी पत्रदेखील देण्यात आले. तीन महिने खोडके यांना जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्रात कामाला ठेवले. नंतर गावातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली. काम केल्यानंतर खोडके यांनी संस्थेच्या संचालकांना पगाराबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी सांगितले की,  शासनाने ज्या जागेसाठी भरती केली ती जागा आणि आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता पगार मिळणार नाही. यावर फिर्यादीने भरलेले तीन लाख रुपयांची मागणी केली असता तू दिलेले पैसे आम्ही शासनाकडे जमा केले आहेत असे सांगितले.

यानंतर खोडके नातेवाईकांसह शिक्रापूर कार्यालयात गेले. मात्र कार्यालय बंद असल्याने आवाड आणि घोडके यांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद होते. जेथे संस्थेचे कार्यालय होते तेथे दुसरे कार्यालय असल्याचे लक्षात आल्यावर  फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कल्याण मधुकर घोडके (वय ५३) याला अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवार, ३१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील श्रीकृष्ण विभीषण आवाड हा फरार आहे. दोन्हीही आरोपी तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी अजून किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास सुरू असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story