Live-in woman : ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने जोडीदारास जिवंत पेटवले

मुलीच्या शाळेत प्रवेश घेण्यावरून 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. या वादातून महिलेने आपल्या जोडीदारावर रॉकेल ओतून पेटवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत महिलेचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. तो ५० टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेचा जोडीदार मुकेश सुरेश राजपूत (वय ४२) यांनी महिलेच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 28 Jul 2023
  • 01:17 am
‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने जोडीदारास जिवंत पेटवले

‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने जोडीदारास जिवंत पेटवले

मुलीच्या शाळा प्रवेशावरून दोघांत होत होते सतत भांडण; महिलेसह तिच्या जुन्या मित्रावर गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मुलीच्या शाळेत प्रवेश घेण्यावरून 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. या वादातून महिलेने आपल्या जोडीदारावर रॉकेल ओतून पेटवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत  महिलेचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. तो ५० टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेचा जोडीदार मुकेश सुरेश राजपूत (वय ४२) यांनी महिलेच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली. जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला म्हणून महिलेवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मुकेश सुरेश राजपूत आणि त्यांची जोडीदार उज्ज्वला कांबळे हे दोघे येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये राहतात. त्यांच्या सोबत उज्ज्वला हिच्या पतीपासून झालेला मुलगा सिद्धार्थ (वय २४) आणि फिर्यादी मुकेश आणि उज्वला या दोघांपासून झालेली मुलगी सम्राज्ञी (वय ७) राहात आहेत. मुकेश आणि उज्ज्वला मागील पंधरा वर्षांपासून 'लिव्ह इन' मध्ये राहात आहेत.  मुकेश सकाळी ६ ते ९:३० दरम्यान भाडेतत्त्वावर रिक्षा चालवतात. त्यानंतर दिवसभर रंगारीचे काम करतात. या दोन्ही व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

मागील दोन ते अडीच महिन्यापासून या दोघांत त्यांची मुलगी सम्राज्ञी हिला शाळेत प्रवेश घेण्यावरून वाद चालू होता. २४ जुलै रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास उज्ज्वलाने मुकेश यांना घरी बोलावून घेतले. मुलगी सम्राज्ञीला इयत्ता दुसरीत रामभाऊ मोझे शाळेमध्ये प्रवेश घेण्याबाबत त्यांच्यात बोलणे झाले. त्यावेळी मुकेश यांनी सांगितले की, मी शाळेमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया विषयी माहिती घेतो आणि त्यासाठीचे आवश्यक असलेले अर्ज घेऊन येतो. ही प्रक्रिया झाल्यावर मुकेश यांनी  उज्ज्वलाकडे १८ हजार रुपये वार्षिक फीसाठी मागितले. त्यावर उज्ज्वलाने पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांत पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात उज्ज्वलाने भाजीचा मसाला मुकेश यांच्या अंगावर फेकला. त्यानंतर मुकेश घराबाहेर पडून रात्रभर रिक्षामध्येच राहिले.

२५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे मुकेश दिवसभरातील काम आटोपून संध्याकाळी पुन्हा रिक्षा चालवत होते. पावणेसातच्या दरम्यान ते  रिक्षाचे भाडे घेऊन लुम्बिनी गार्डन महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी सम्राज्ञीने त्यांना आवाज दिला. मुकेश तिला घेऊन जवळच असलेल्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा राजेश जगताप हा घराजवळ येताना त्यांनी पाहिले. घराजवळच उज्ज्वला उभी होती. तिच्याजवळ जात अजून तू त्याचा नाद सोडला नाही का, असा सवाल मुकेश यांनी केला. त्यावर, मी काहीही करेन, तुझा काय संबंध मी काय तुझ्याशी लग्न केले का, असे उत्तर उज्ज्वलाने दिले. यावरून पुन्हा एकदा या जोडप्यात वाद सुरू झाला. त्यावेळी उज्ज्वला कांबळे आणि राजेश जगताप हे दोघे घरात गेले आणि उज्ज्वला घरातील रॉकेलचा पाच लिटरचा कॅन घेऊन बाहेर आली. तिच्यासोबत आलेला राजेश जगताप मुकेश यांच्यासोबत वाद घालू लागला. त्याच्याशी बोलत असताना उज्ज्वला त्यांच्या पाठीमागून आली. मुकेश बेसावध असताना अचानक तिने हातातील कॅन मुकेश यांच्या अंगावर रिता केला. काही कळायच्या आत क्षणार्धात आगही शिलगावली. आगीने भडका घेतला. त्यामुळे ते घाबरून गेले. जिवाच्या आकांताने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. आगीच्या भडक्यात भाजल्याने वाचण्यासाठी टाहो फोडत असताना उज्ज्वला मात्र तेथून निघून गेली.

मुकेश यांनी जीव वाचवण्यासाठी अंगावर असलेले जळते कपडे काढून फेकले. जवळच असलेल्या टाकीतील पाणी पेटत्या अंगावर ओतून घेतले. मात्र  तेथे असलेले उज्ज्वला कांबळे व राजेश जगताप हे दोघे रिक्षामध्ये बसून पळून गेले. सोबत सम्राज्ञीलाही घेऊन गेले.  मुकेश यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी मुकेश यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपी उज्ज्वला दत्तात्रय कांबळे (वय ४४ वर्षे, शास्त्रीनगर येरवडा आणि  राजेश जगताप (वय ५५ वर्ष, रा. गणपती मंदिराजवळ शास्त्रीनगर, येरवडा यांच्यावर भारतीय दंड विधान कलम  ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयदीप गायकवाड करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story