RTO License : वीस सेकंदात 'परवाना'ही

वाहन चालवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार तब्बल २४ निकषांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, या सर्व निकषांना वाचण्यासाठी जितका वेळ लागेल त्यापेक्षाही कमी कालावधीत शिकाऊ उमेदवार पक्क्या परवान्यासाठी चाचणी परीक्षा देत असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. दुचाकीसाठी १६ ते वीस सेकंदात, तर कार आणि रिक्षासाठी सुमारे एक मिनिटाच्या आतच वाहनकौशल्य चाचणी पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 'सीविक मिररच्या' प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Thu, 11 May 2023
  • 01:07 pm
वीस सेकंदात 'परवाना'ही

वीस सेकंदात 'परवाना'ही

वाहनाच्या पक्का परवाना कौशल्य चाचणीचा 'सूपरस्पीड' नागरिकांच्या जिवावर बेतणार; दुचाकीसाठी २० ते ६० सेकंद, तर कार, रिक्षासाठी फक्त एक मिनिटाचा कालावधी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

वाहन चालवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार तब्बल २४ निकषांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, या सर्व निकषांना वाचण्यासाठी जितका वेळ लागेल त्यापेक्षाही कमी कालावधीत शिकाऊ उमेदवार पक्क्या परवान्यासाठी चाचणी परीक्षा देत असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. दुचाकीसाठी १६ ते वीस सेकंदात, तर कार आणि रिक्षासाठी सुमारे एक मिनिटाच्या आतच वाहनकौशल्य चाचणी पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 'सीविक मिररच्या' प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. 

 

वाहनाच्या नोंदणीपासून ते परवाना वितरित करण्या पर्यंतची विविध कामे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) केली जातात. वाहन परवाना मिळवण्यासाठी सुरुवातील शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) आणि नंतर पक्क्या परवान्यासाठी प्रत्यक्ष वाहन कौशल्य चाचणी घेतली जाते. भोसरीतील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) या संस्थेतील 'ट्रॅक'वर कारचा वाहन परवाना प्रथमच घेत असल्यास कौशल्य चाचणी केली जाते. तर, आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथे दुचाकी, तीन चाकी आणि इतर जड वाहनांची कौशल्य चाचणी होते. एखाद्या व्यक्तीच्या कारच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा परवाना मिळवण्यासाठीदेखील आळंदीतील 'ट्रॅक'वरच परत कौशल्य सिद्ध करावे लागते.

दुचाकी, कार या वाहनांचा पक्का परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य चाचणी अनुक्रमे १६ ते ६० सेकंदात पूर्ण केली जात आहे. 'सीविक मिररच्या' प्रतिनिधीने फुलेनगर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात दुचाकी चालकाची वाहन चाचणी केवळ आठ आकड्याच्या आकारातील ट्रॅक पार केल्यानंतर पूर्ण झाली. त्यासाठी अवघे २० सेकंद लागले. संबंधित वाहनचालकाला विचारल्यानंतर केवळ माझ्या रहिवासी पत्त्याची कागदपत्रे तपासली. नंतर आठच्या वळणदार आकड्याचा ट्रॅक पार करण्यास सांगितले. त्यानंतर माझी कौशल्य चाचणी पूर्ण झाली, असे त्याने सांगितले. 

मोटर वाहन कायद्यानुसार पक्का परवाना मिळवण्यासाठी २४ प्रकारच्या निकषांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यात अगदी वाहनाचा आरसा व्यवस्थित पाहिला जातो की नाही, वळणे कशी घेतली जातात, इंडिकेटर कसे दाखवितात, लेन कटिंग करत नाही ना, यू टर्न कसा घेतला जातो, वाहनाला रिव्हर्स गिअर असल्यास तो कशा पद्धतीने टाकला जातो, क्लच, गिअर, ब्रेकचा वापर कसा केला जातो, पादचारी आणि इतर वाहनचालक लक्षात घेऊन वाहन चालवता येते की, नाही अशा विविध बाबी पडताळणे आवश्यक आहे. मात्र, या निकषांची कोणतीही पडताळणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक अभ्यासक के. डी. पवार म्हणाले, 'शहरासह राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होण्याची संख्या लक्षणीय आहे. याला जबाबदार आपली प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. तिथे वाहन कौशल्यांची योग्य तपासणीच केली जात नाही. असे अकुशल वाहनचालक रस्त्यावर आल्यास अपघात होतीलच. मोटर वाहन कायद्यानुसार किमान २४ निकषांची तपासणी वाहन कौशल्याची चाचणी घेताना करायला हवी. मात्र, चार प्रकारच्या निकषांचीदेखील तपासणी होत नाही. नवले पुलाजवळ गेल्या वर्षी ४८ वाहने एकमेकांना धडकली होती. त्यानंतर मी पक्का परवाना देताना वाहन कौशल्य चाचणी कशी घेतली जाते याची पाहणी केली. आरटीओच्या चाचणी मैदानावर जाऊन स्टॉप वॉचच्या साहाय्याने वेळेचीही तपासणी केली आहे. त्यात दुचाकीला १६ ते २२ सेकंद लागतात. रिक्षा आणि कारला सरासरी एक मिनिट आणि जड वाहनांची चाचणी सरासरी तीन मिनिटांत संपवली जाते. राज्याच्या परिवहन आयुक्तांची भेट घेऊन त्यांना याबाबत स्पष्ट माहिती दिली. त्यांना तसे निवेदनही दिले आहे. जर, मोटरवाहन कायद्यानुसार वाहन परवाना देताना निकषांची पूर्तता केली जात नसेल, तर आरटीओ बंद करावीत, अशी मागणीही त्यांच्याकडे केली आहे.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story