न्यायालयातील पिण्याच्या पाण्यात अळ्या

पिंपरी-चिंचवडच्या नेहरुनगरमधील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दूषित आणि अळ्यासदृश कीटक असलेले पाणी येत आहे. त्यामुळे येथील वकील आणि पक्षकारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील वकिलांनी तक्रारी केल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 17 Jun 2023
  • 01:24 am
न्यायालयातील पिण्याच्या पाण्यात अळ्या

न्यायालयातील पिण्याच्या पाण्यात अळ्या

पिंपरी-चिंचवडच्या न्यायालयात कचरा, अळ्या असलेले पाणी; 'सारथी'वर तक्रार देऊनही कारवाई शून्य, नागरिकांच्या जिवाशी खेळ

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पिंपरी-चिंचवडच्या नेहरुनगरमधील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दूषित आणि अळ्यासदृश कीटक असलेले पाणी येत आहे. त्यामुळे येथील वकील आणि पक्षकारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील वकिलांनी तक्रारी केल्या आहेत.  

पिंपरी-चिंचवड भागातील मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतींची जागा कामकाजासाठी अपुरी पडत होती. तेथे पार्किंगचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना कुठेही वाहने उभी करावी लागत होती. यामुळे ते  गैरसोयीचे होते. त्यामुळे नवीन प्रशस्त इमारतीत न्यायालयाचे स्थलांतर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यामुळे नेहरुनगरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून न्यायालय स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय घेताना खूपच घाई-गडबड झाली असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्याचे वकील सांगत आहेत.

नेहरुनगरमध्ये न्यायालयासाठी नुकतीच नवीन इमारत सुसज्य करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी तिचे उद्घाटन करण्यात आले. ५ जूनपासून या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाचे स्थलांतरण करताना नवीन ठिकाणी सगळ्या सोयी-सुविधा झाल्या आहेत का, याचा विचार न करताच घाई-गडबडीत स्थलांतरण करण्यात आले. तेथील पाण्याच्या टाकीची स्वच्छताही करण्यात आली नाही. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवले आहे. त्या विभागातील एक कर्मचारी येऊन पाहणी करून गेला आणि दुसऱ्या दिवशी पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करतो, असेही त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर तो फिरकलाच नाही. त्यामुळे येथील वकील आणि पक्षकारांना दूषित पाणी प्यावे लागत आहे, तसेच पाण्याच्या टाकीला झाकणही नाही ती उघडीच असते, अशी माहिती वकील मोनिका सचवाणी पंडित यांनी दिली.

'न्यायालयावर पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. त्यातून खाली असलेल्या छोट्या टाकीत पाणी येते आणि त्याचा वापर नागरिक, वकील वगैरे पिण्यासाठी करतात. मात्र, हे पाणी दूषित आहे. मुख्य टाकीची स्वच्छता केली जात नसल्याने त्यामध्ये कचरा, माती, अळ्यासदृश किडे आहेत. त्यामुळे छोट्या टाकीतून पाणी पिण्यासाठी पेल्यात घेतल्यावर त्यात जिवंत अळ्या आढळून येत आहेत. दूषित पाण्याची 'सारथी'मध्ये १२ जूनला तक्रार केली आहे. मात्र, त्यांनी काहीच उपाय केले नाहीत', असे वकील सागर चरण यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.  

सारथीमध्ये तक्रारी केल्यानंतर त्यांनी तोंडी आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात शून्य कृती केल्याचे वकिलांनी सांगितले. त्यामुळे वकील घरून येताना पाण्याची बाट ली सोबत घेऊन येतात. परंतु, पक्षकारांना याची माहिती नसल्याने त्यांना तेच दूषित पाणी प्यावे लागत आहे. घरून पाणी आणण्यासाठीही मर्यादा असल्याचे वकिलांनी सांगितले. आता आम्ही सोबत हंडा घेऊन न्यायालयात यायचे का की, स्वतः टाक्या साफ करायच्या? असा संतप्त सवाल येथील वकील आणि बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोरक्षनाथ झोळ करत आहेत. वकिलीच्या धंद्यात दिवसभर बोलावे लागते त्यामुळे अधिकच पाण्याची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन तत्काळ पाण्याची टाकी स्वच्छ करावी, अशी मागणी झोळ यांनी केली आहे.

बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय दातीर-पाटील यांनी सांगितले की, '१७ मे रोजी येथील न्यायालयात स्थलांतरण करण्यात आले आहे, तेव्हापासून टाकी स्वच्छ केलेली नाही. नवीन इमारत असूनही येथे दूषित पाणी येत आहे. पाणी मूलभूत गरज आहे. ते दूषित असल्यावर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. दूषित पाणी पाजून येथील नागरिकांच्या आरोग्याशीच प्रशासनाने खेळ चालवला आहे, तो तत्काळ थांबला पाहिजे. येथील वकिलांनी स्वच्छ पाण्याच्या सोयीसाठी स्वतःच्या खर्चाने अॅक्वा गार्ड आणले आहे. मात्र, टाकीतूनच दूषित पाणी येत असल्याने त्याचाही काहीच उपयोग होत नाही.' 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story