लेखिकेने शिकवला पार्किंग ठेकेदाराला धडा!

लेखिका शेफाली वैद्य यांनी पुणे रेल्वे स्थानकात कार पार्क केल्यावर त्यांना दुचाकीसाठीची पावती देण्यात आली होती. याची तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

पार्किंग

पार्किंग

पुणे रेल्वे स्थानकातील घटना, शेफाली वैद्य यांच्या तक्रारीनंतर तीस हजारांचा दंड

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

लेखिका शेफाली वैद्य यांनी पुणे रेल्वे स्थानकात कार पार्क केल्यावर त्यांना दुचाकीसाठीची पावती देण्यात आली होती. याची तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

शेफाली वैद्य

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहन पार्किंगबाबत नागरिकांकडून सातत्याने अनेक तक्रारी असतात. पावती न देताच वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सातत्याने घडतो. तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पार्किंग ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर वसुली सुरूच असते. याचा अनुभव थेट लेखिका तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीच्या सदस्य असलेल्या शेफाली वैद्य यांनाही आला. त्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि संबंधित ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पार्किंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाला पावती देण्यासही बजावले.

शेफाली वैद्य यांच्या वाहनचालकाने सोमवारी सकाळी पाच ते सात मिनिटांसाठी पार्किंगमध्ये कार उभी केली होती. त्यासाठी ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे ४० रुपयांची मागणी केली, पण त्याची पावती दिली नाही. वैद्य यांनी स्वत:हून पावती मागितल्यानंतर त्याने पावती दिली, पण ही पावती दुचाकीची होती. त्यावर गाडी बाहेर पडतानाची वेळ नव्हती. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर वैद्य यांनी हा अनुभव ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर रेल्वेची यंत्रणा हलली.

पार्किंग

याबाबत ‘सीविक मिरर’शी बोलताना शेफाली वैद्य म्हणाल्या, ‘‘बाहेर पडत असताना आमच्यापुढे जवळपास दहा गाड्या होत्या. सकाळी सर्वांनाच बाहेर पडण्याची घाई होती, पण त्यातील एकालाही पार्किंगची पावती दिली नाही. मी ४० रुपये दिल्यानंतर पावती मागितली. त्यावेळी त्यांनी दुचाकीची पावती दिली. त्यावर ‘इन टाईम’ची वेळ होती. गाडी बाहेर पडतानाची वेळ तसेच शुल्काचाही उल्लेख नव्हता. गाडी आत आल्यानंतरच पावती देऊन मग त्यानुसार बाहेर पडताना पैसे आकारायला हवेत. पण इथे प्रत्येकाकडून पावती न देता ४० रुपये घेतले जातात. ही बाब चुकीची असल्याने मी याबाबत ट्विट केले. त्यानंतर लगेच रेल्वेच्या कार्यालयातून फोन आला आणि त्यांनी तक्रारही दाखल करून घेतली.’’

रेल्वे स्थानकाच्या आवारात सुमारे तीन हजार चौरस मीटर आकाराचे वाहनतळ आहे. या जागेमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा आहे. खासगी ठेकेदारामार्फत पार्किंगमध्ये शुल्क वसुली केली जाते. रेल्वेने त्याच्याशी तीन वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार वर्षाला संबंधित ठेकेदाराने रेल्वेला जवळपास दीड कोटींहून अधिक रक्कम देणे अपेक्षित आहे. त्यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. दररोज हजारो वाहने या पार्किंगचा वापर करत असल्याने ठेकेदाराकडे रोजचा मोठा गल्ला जमतो, पण प्रत्यक्षात त्याच्याकडून अनेक चारचाकी वाहनचालकांना पावतीच दिली जात नसल्याने रेल्वेचीही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

दरम्यान, वैद्य यांच्या तक्रारीनंतर सोमवारीच रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड केला आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे यांनीही दुजोरा दिला. संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी बैठकीत बोलावून घेत तक्रारीबाबत खुलासा मागविल्याचेही समजते. पार्किंगच्या पावत्यांबाबत पारदर्शकता ठेवून प्रत्येकाला पावती देण्यास सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदाच ठेकेदाराला एवढा दंड केल्याचे 

समजते. आता रेल्वे अधिकाऱ्यांकडून पार्किंगबाबत आलेल्या तक्रारी तातडीने सोडवून त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story