चहापेक्षा किटली गरम!

शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर मोठा ताण येत आहे. वाहतूक पोलिसांवरील ताण कमी व्हावा आणि त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांच्या मदतीला 'ट्रॅफिक वॉर्डन'ची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, हे वॉर्डन वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनात मदत करण्याऐवजी अगदी रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाड्या अडवत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Fri, 2 Jun 2023
  • 08:59 am
चहापेक्षा किटली गरम!

चहापेक्षा किटली गरम!

वाहतूक पोलिसांना मदत करण्याऐवजी नागरिकांच्या गाड्या अडवण्याकडे 'ट्रॅफिक वॉर्डन'चा कल; रस्त्यावरील वाहतूक कोंडी मात्र 'जैसे थे'

नितीन गांगर्डे / महेंद्र कोल्हे

feedback@civicmirror.in

शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर मोठा ताण येत आहे. वाहतूक पोलिसांवरील ताण कमी व्हावा आणि त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांच्या मदतीला 'ट्रॅफिक वॉर्डन'ची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, हे वॉर्डन वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनात मदत करण्याऐवजी अगदी रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाड्या अडवत आहेत. यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, अपघात होण्याचीदेखील शक्यता निर्माण होत आहे. 

चांदणी चौकाजवळील एनडीए-पाषाण रस्त्याच्या सुरवातीला सहा-सात ट्रॅफिक वॉर्डन एकत्रितपणे एकाच ठिकाणी थांबतात आणि येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या अडवून चालकांकडे वाहन परवाना आहे का, याची तपासणी करतात. चांदणी चौकातील हे चित्र प्रातिनिधिक असले, तरी संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे कारवाई केली जात आहे. 

वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्यातर्फे वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी वॉर्डनची नेमणूक केली जाते. मात्र, ज्या उद्देशाने त्यांची नेमणूक करण्यात आली आहे, ते सोडून गाड्या अडवण्यातच त्यांना अधिक स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मदत होण्याऐवजी अडचणच होत असल्याचे चित्र दिसते आहे.

चांदणी चौकामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यासाठी या चौकात वाहतूक पोलीस आणि त्यांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन नेमलेले आहेत. वॉर्डनने हा चौक वर्दळीचा असल्याने तेथे वेगवेगळ्या ठिकाणी थांबून वाहतूक नियमन करणे अपेक्षित आहे, तसेच वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, याउलट ट्रॅफिक वॉर्डन वागत असल्याचे 'सीविक मिरर'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. सात -सात ट्रॅफिक वॉर्डन हे एकाच ठिकाणी थांबत आहेत. चौकात अनेक ठिकाणी थांबून वाहतूक नियमन करणे आवश्यक असतानाही ते मात्र केवळ गाड्या अडवत आहेत.

वॉर्डन वाहतुकीचे त्यांच्या सोयीने नियमन करतात. गाडी अडवणे, लायसन विचाराने आदी कामेच ते मोठ्या प्रमाणावर करतात. याचा नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे काही वाहनचालकांनी 'सीविक मिरर'ला सांगितले. काही वॉर्डन नागरिकांना दमदाटीची भाषा वापरतात. रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून गाडी अडवतात. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही काही वाहनचालकांनी केली. 

'ट्रॅफिक वॉर्डनने प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियमन केले, तरी बरीच कोंडी कमी होईल आणि कोंडीत अडकलेले नागरिक लवकर घरी पोहचू शकतील. मात्र, असे होताना दिसत नाही. ते पोलिसांना फक्त दंड वसुलीसाठीच मदत करतात.  जनतेचा पैसा खर्च करून त्यांना दिला जातो, मात्र ते जनतेसाठी काम करत नाहीत. त्या ऐवजी सेवानिवृत्त सैनिक, पोलीस यांनाच हे काम दिले तर त्यांच्या अंगी असलेल्या स्वयंशिस्तीमुळे ते अधिक प्रामाणिक आणि योग्य रीतीने वाहतूक नियमन करतील', असे प्रशांत कनोजिया यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.

ट्रॅफिक वॉर्डन यांना गाड्या अडवण्याचा अधिकार नाही. ते असे करत असतील, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. 

- विठ्ठल कुबडे, 

साहाय्यक पोलीस आयुक्त

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story