कुणीही यावे; उडी मारून जावे

देशातील सर्वांत संवेदनशील शहर असलेल्या पुणे शहरातील रेल्वे स्थानक हजारो प्रवाशांमुळे सतत गर्दीने फुललेले असते. पुण्याला दहशतवादी हल्ल्यांची पार्श्वभूमी असल्याने गजबजलेले पुणे रेल्वे स्थानक संवेदनशील क्षेत्रात मोडते. गुप्तचर विभागाने अनेकदा त्याबाबतचा अलर्ट दिला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुख्यद्वारावर मेटल डिटेक्टर लावले आहे. तेही अनेकदा बंद असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. या स्थानकात भिंतीवरून उड्या मारून सहजच प्रवेश करता येत असल्याचे `सीविक मिरर`च्या पाहणीत उघड झाले आहे. असल्या घुसखोरांना कोणता डिटेक्टर हुडकून काढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रेल्वेची भिंत सहज पार करता यावी यासाठी पेव्हिंग ब्लॉकचे तुकडे रचले आहेत. त्यावर पाय ठेवून उडी मारून अनेकांची ये-जा सुरू असते.

रेल्वेची सुरक्षा रामभरोसे, विनासायास भिंतीवर उड्या मारून आगंतुकांची ये-जा

विजय चव्हाण- महेंद्र कोल्हे

feedback@civicmirror.in

देशातील सर्वांत संवेदनशील शहर असलेल्या पुणे शहरातील रेल्वे स्थानक हजारो प्रवाशांमुळे सतत गर्दीने फुललेले असते. पुण्याला दहशतवादी हल्ल्यांची पार्श्वभूमी असल्याने गजबजलेले पुणे रेल्वे स्थानक संवेदनशील क्षेत्रात मोडते. गुप्तचर विभागाने अनेकदा त्याबाबतचा अलर्ट दिला आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुख्यद्वारावर मेटल डिटेक्टर लावले आहे. तेही अनेकदा बंद असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. या स्थानकात भिंतीवरून उड्या मारून सहजच प्रवेश करता येत असल्याचे `सीविक मिरर`च्या पाहणीत उघड झाले आहे. असल्या घुसखोरांना कोणता डिटेक्टर हुडकून काढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

पुणे रेल्वे स्थानक संवेदनशील असूनही, रेल्वे प्रशासन त्याकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातील एकमेव मेटल डिटेक्‍टर सतत बंद असते असा अनेक प्रवाशांचा अनुभव आहे. मात्र, जेव्हा ते सुरू असते तेव्हाही त्याचा वापर फारसा केला जात नाही.  

यानंतर यापेक्षा गंभीर म्हणता येईल असा प्रकार समोर आला आहे. आरटीओ रस्त्याच्या बाजूने असलेल्या सीमाभिंतीवरून कुणीही आणि केव्हाही प्रवेश करू शकतो. अगदी फेरीवाले, भिकारी, प्रवासी आणि आगंतुकही भिंतीवरून उड्या मारून येऊ शकतात. हीच परिस्थिती अन्य सीमाभिंतीचीही आहे. येथील स्थानकामध्ये प्रवेश करण्यासाठी १५ हून अधिक मार्ग आहेत. तरीही रेल्वे प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात कोणतेही उपाय योजले नाहीत.

पुणे रेल्वे स्थानकावरून दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त रेल्वे धावतात. मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी पुणे हे सर्वांत महत्त्वाचे स्थानक असून, येथून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा होत असते. रेल्वे स्थानक परिसरात वर्षाकाठी दोनशे ते अडीचशे गुन्हे घडत असून, लहान मुलांच्या अपहरणाचे प्रकारही वारंवार घडले आहेत. रेल्वे स्थानकावर थेट पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या परिसरात २०१५ मध्ये ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या सीसीटीव्हींची क्षमता आता कमी झाली असून, त्यावर दिसणारे चित्र अस्पष्ट आणि पुसट झाले आहे. संपूर्ण स्टेशनच्या परिसरासाठी ६१ सीसीटीव्हींची संख्याही पुरेशी नसल्याने लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा पथकाला तपास करताना अडचणी उद्भवत आहेत. या दोन्ही यंत्रणांनी रेल्वे प्रशासनाकडे नवीन सीसीटीव्ही बसविण्यासह त्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. या मागणीला मान्यता मिळाली असली, तरी पुणे रेल्वे स्टेशनवर नवीन सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसलेले नाहीत.

लोणावळासारख्या स्टेशनवर ९० सीसीटीव्ही कॅमेरे असताना पुण्यात फक्त ६१ कॅमेरे आहेत. त्यामुळे पुणे स्टेशन येथे नवे अद्ययावत सीसीटीव्ही तातडीने बसविण्याची मागणी केली जात आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे आरक्षित रेल्वे कोचेसमध्ये तिकिट तपासणी केली जाते. मात्र, पॅसेंजर किंवा जनरल डब्यातून तिकीट तपासणी होत नाही. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान चोरीला जाणे, किंवा पाकीट चोरीला जाणे ही नित्याचीच बाब बनली आहे.

रेल्वेचे अधिकारी म्हणाले, "आम्ही या संदर्भात रेल्वे पोलिसांना सूचना केल्या असून योग्य ती कार्यवाही केली जाईल. असा प्रकार करणे हा गुन्हा असून त्या संदर्भात अटकेची, दंडाची आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते."

अलीकडील काही संवेदनशील घटना

जानेवारी २०२३ : पुणे रेल्वे स्टेशनवरून पिस्तुल ६ काडतुसांसह गुजरातमधील एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली.

डिसेंबर २०२२ : पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बाळाचे अपहरण झाल्यानंतर १२ दिवसांनी पोलिसांना बाळाचा शोध लागला. त्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

एप्रिल २०२२ : अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला होता. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story