कात्रज 'चेक पोस्ट' कधी बंद, कधी सुरू

कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यानचा रस्ता हा अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथील गंभीर अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. त्यावर उपाय म्हणून नवीन बोगद्यातून वाहन बाहेर पडल्यानंतर नवले ब्रिजच्या दिशेने जाताना दरी पुलाच्या अलीकडेच पोलिसांचा तपासणी नाका उभारला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 10 Jul 2023
  • 12:26 am
कात्रज 'चेक पोस्ट' कधी बंद, कधी सुरू

कात्रज 'चेक पोस्ट' कधी बंद, कधी सुरू

कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यानचे अपघात टाळण्यासाठी उभारलेले 'चेक पोस्ट' सोयीनुसार असतो सुरू

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यानचा रस्ता हा अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथील गंभीर अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. त्यावर उपाय म्हणून नवीन बोगद्यातून वाहन बाहेर पडल्यानंतर नवले ब्रिजच्या दिशेने जाताना दरी पुलाच्या अलीकडेच पोलिसांचा तपासणी नाका उभारला आहे.  ७ मे रोजी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.  सकाळी आणि रात्री अशा दोन शिफ्टमध्ये चार पोलीस कर्मचारी येथे उपस्थित असतील असे सांगण्यात आले होते. पोलिसांची आपल्यावर नजर असल्याचे त्यातून वाहनचालकांना समजावे हा या मागचा हेतू होता. मात्र, अनेक वेळा हा नाका बंद असल्याचे पाहावयास मिळते.

नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अजूनही काही उपाययोजना करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या अवजड वाहनांसाठी असलेल्या साठ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेत घट करण्यात येणार आहे. नवीन बोगदा ते नवले ब्रिज या साडेआठ किलोमीटर अंतरावरील जड वाहनांचा वेग ४० आणि इतर वाहनांसाठी ६० किलोमीटर प्रतितास ठेवायचा प्रस्ताव असून यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.    

नवीन बोगद्यातून वाहन बाहेर पडल्यानंतर तीव्र स्वरूपाचा उतार सुरू होतो. त्यानंतर दरी पूल येतो. हा पूल ओलांडताना तीव्र वळण आहे. त्यानंतर पुन्हा उतार सुरू होतो. रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर जड आणि लांब पल्ल्याची खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. अनेकदा जड वाहतूक करणारे आपले वाहन न्यूट्रल करतात. काही प्रमाणात इंधन वाचवण्यासाठी असे प्रकार केले जातात. साहजिकच त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. यावर उपाय म्हणून पोलिसांनी येथे तपासणी नाका उभारला आहे. मात्र तो अनेकदा बंद असल्याचे पाहावयास मिळते, अशी नागरिकांची तक्रार आहे.

याविषयी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या नाक्यावर दोन कर्मचारी दिवसा आणि दोन रात्रीच्या वेळी असतात. 

येथील सुरक्षितता पाहण्यासाठी ते सतत फिरत असतात. येथील परिसर निर्मनुष्य असल्यामुळे पोलीस कर्मचारी रस्त्यावरील उभी वाहने काढण्यासाठी गेलेले असतात. कधी चौकात उभे असतात, वेगमर्यादा ओलांडून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वेगवेगळ्या ठिकाणी थांबून कारवाई करत असतात. त्यामुळे नाक्यावर कोणी नसते अशावेळी नाका बंद ठेवला जातो. येथे नाका उभारल्यापासून नियमभंग करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आता नियमभंग करण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story