कसब्यात बहुरंगी लढत?

कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुबीयांना उमेदवारी नाकारल्यानंतर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी कसब्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या शिवाय बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही कसब्याच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 03:03 pm
PuneMirror

कसब्यात बहुरंगी लढत?

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in 

कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुबीयांना उमेदवारी नाकारल्यानंतर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी कसब्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या शिवाय बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही कसब्याच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

चिंचवड आणि कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात टिळक कुटुंबातील सदस्यास उमेदवारी देण्याची मागणी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी केली होती. ही मागणी डावलत माजी नगरसेवक हेमंत रासने यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर टिळक कुटुंबीयांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, टिळक कुटुंबातील सदस्यांनी अर्ज भरला नसल्याने त्यांची नाराजी तूर्तास दूर झाली असल्याचे मानण्यात येत आहे. महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे.   

चिंचवड विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने कसब्यात तो न्याय का लावला नाही अशी विचारणा करत हिंदू महासंघाच्या दवे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार त्यांनी मंगळवारी (दि. ७) अर्ज भरला. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही कसब्याच्या निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या अविनाश अरविंद मोहिते यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांनी पक्षाचे नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असे नमूद केले आहे. काँग्रेसने यापूर्वीच धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दाभेकर अर्ज माघारी घेतील अशी दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (दि. ८) होणार असून, १० फेब्रुवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी किती उमेदवार रिंगणात असतील हे स्पष्ट होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story