कोंडीत गुदमरला आयटी हबचा श्वास

पुण्यातील 'आयटी हब' असा नावलौकिक असलेल्या हिंजवडीतून प्रवास करत असाल तर वाहतूक कोंडीत तासभर बसून राहण्याची मानसिक तयारी करून घ्या. कारण इथे काही मीटरचा प्रवास करण्यासाठी अर्धा ते एक तास लागू शकतो. हिंजवडी परिसरातील अभियंते रोज हा अनुभव घेत आहेत. कारण सिग्नल यंत्रणा बंद असल्याने अवघ्या काही मीटर अंतरावर जाण्यासाठी त्यांना अर्ध्या तासांहून अधिक काळ लागतो आहे, या अभियंत्यांना रोज न चुकता या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

हिंजवडीतून प्रवास करताना ट्राफिकला समोरे जावे लागते

मेट्रोच्या कामामुळे ठेवली हिंजवडीतील सिग्नल यंत्रणा बंद; वॉर्डनही दिले नाहीत

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पुण्यातील 'आयटी हब' असा नावलौकिक असलेल्या हिंजवडीतून प्रवास करत असाल तर वाहतूक कोंडीत तासभर बसून राहण्याची मानसिक तयारी करून घ्या. कारण इथे काही मीटरचा प्रवास करण्यासाठी अर्धा ते एक तास लागू शकतो. हिंजवडी परिसरातील अभियंते रोज हा अनुभव घेत आहेत. कारण सिग्नल यंत्रणा बंद असल्याने अवघ्या काही मीटर अंतरावर जाण्यासाठी त्यांना अर्ध्या तासांहून अधिक काळ लागतो आहे, या अभियंत्यांना रोज न चुकता या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.    

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि येथील विकासकामांमुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. हिंजवडीतील सिग्नल यंत्रणा काही ठिकाणी बंद असल्याने वाहतूक कोडींत भर पडत असून, पोलीस तसेच वॉर्डन जागेवर हजर नसल्याने वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत आयटी पार्क परिसरातील अभियंत्यांनी ट्वीटरवर आपली खदखद व्यक्त करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. हिंजवडी भागातील बऱ्याच कंपन्या कोविड नंतर पुन्हा सुरू झाल्या असून, वर्क फ्रॉम होमची पद्धत जवळपास बंद करण्यात आली आहे. संगणक अभियंते दररोज कंपनीत येऊन काम करू लागले असून, मेट्रोचे काम सुरू असल्याने या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच आता सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. हिंजवडी आयटी पार्कमधून बाहेर पडण्यासाठी असलेल्या पर्यायी रस्त्याचे काम सध्या ठप्प पडले आहे. बालेवाडी ते हिंजवडी फेज वनला जोडणारा रस्ता (नाल्यावरील पूल) सुरू नसल्याने वाहनांना एकाच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. हिंजवडीच्या श्री शिवछत्रपती चौकातून पुढे लक्ष्मी चौकाच्या दिशेने गेल्यास दोन सिग्नलला थांबावे लागते. या चौकातून पुढे भूमकर चौकाकडे जाताना वॉर्डन आणि वाहतूक पोलीस असल्याने ही कोंडी सोडवण्यास काही अंशी मदत होत आहे. परंतु, रस्त्याचे सुरू असलेले काम आणि मेट्रोच्या कामामुळे हिंजवडीतून पुणे-बंगळुरू महामार्गावर जाण्यासाठी मुख्य रस्त्याने गेल्यास वाहनांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.

 

मेट्रोच्या कामामुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. सिग्नल यंत्रणा बंद ठेवून अपुऱ्या मनुष्यबळाकरवी वाहतूक नियमन करावे लागत आहे. सिग्नल यंत्रणा सुरू ठेवल्यास कोंडीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉर्डन वाढवून देण्याबरोबरीनेच साईन बोर्ड वाढविण्यासाठी मेट्रोला यापूर्वी पत्रव्यवहार केला असून, मेट्रोकडून वॉर्डनची संख्या वाढताच येथील कोंडी कमी करण्यास नक्कीच मदत होणार आहे.

- सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड

 

पोलिसांना यापूर्वी हिंजवडी भागासाठी १६ वॉर्डन दिले आहेत. त्यांनी अधिक वॉर्डन मिळावेत म्हणून मागणी केली असून, हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याबरोबर या प्रश्नासंदर्भात दोनच दिवसांपूर्वी बैठक झाली आहे. अतिरिक्त वॉर्डन तसेच आवश्यक साधनसामग्री आमच्याकडून पुरविण्यात येणार आहे.

- नागनाथ वाकुडे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त तथा वाहतूक सल्लागार, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो

 

गेल्या महिनाभरापासून येथील सिग्नल यंत्रणा ठप्प आहे. हिंजवडी फेज वन मधील पद्मभूषण चौकात सर्वाधिक कोंडीचा सामना सध्या करावा लागत असून, या भागात सुरू असलेल्या कामांमुळे कोंडीत भर पडत असतानाच पोलिसांनी येथे अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याची आवश्यकता आहे.

- विक्रम खोपडे, संगणक अभियंता

 

कोविडनंतर आयटी कंपन्या पुन्हा सुरू झाल्या असल्याने पोलिसांनी या ठिकाणी वॉर्डन आणि कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मेट्रोचे काम करताना सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्याची आवश्यकता असून, आता कंपन्या पुन्हा पूर्वपदावर आल्याने तत्काळ या उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे.

– महेश पराडकर, संगणक अभियंता

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story