कात्रज वाहनतळ ठेका रद्द

कात्रज येथील वाहनतळावर महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा नागरिकांकडून अवाच्या सवा पैसे घेऊन लूट करणाऱ्या ठेकेदाराचे काम काढून घेण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे. त्यानुसार ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. महात्मा फुले मंडईतील ठेकेदाराने जास्त पैसे घेतल्याची पहिली तक्रार आल्याने त्यास तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 01:51 pm
कात्रज वाहनतळ ठेका रद्द

कात्रज वाहनतळ ठेका रद्द

शुल्कापेक्षा जास्तीचे पैसे घेणाऱ्या ठेकेदाराचे काम काढून घेत महापालिकेने दिला दणका

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

कात्रज येथील वाहनतळावर महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा नागरिकांकडून अवाच्या सवा पैसे घेऊन लूट करणाऱ्या ठेकेदाराचे काम काढून घेण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे. त्यानुसार ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. महात्मा फुले मंडईतील ठेकेदाराने जास्त पैसे घेतल्याची पहिली तक्रार आल्याने त्यास तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वाहनतळात गेल्या आठवड्यात नागरिकांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेण्यात आले. शिवाय वाहनतळाच्या बाहेर पादचारी मार्गावर गाडी लावली तरीही नागरिकांकडून ठेकेदाराने पैसे घेतल्याच्या तक्रारी प्रकल्प विभागाकडे आल्या होत्या.

महात्मा फुले मंडईतील आर्यन वाहनतळ ठेकेदाराला चालविण्यास देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात ठेकेदाराने ४५ मिनिटांसाठी १० रुपये ऑनलाइन शुल्क घेतल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली. तसेच तक्रारदाराने लूट सुरू असल्याचा प्रकार नुकताच निदर्शनास आणून दिला होता. याबाबत महापालिकेच्या प्रकल्प विभाग अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता या ठेकेदारास पहिली नोटीस आणि ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे सांगितले.

चौदा लाख रुपये होणार जप्त

या ठेकेदाराकडे १० वाहनतळांचे काम आहे. त्यासाठी वर्षाला सुमारे ७३ लाख रुपये रक्कम महापालिकेकडे भरावी लागते. या रकमेच्या २० टक्के रक्कम ही बँक गॅरंटी ठेवावी लागते. महापालिकेने केलेल्या करारानुसार ठेकेदाराने कराराचे उल्लंघन केल्यास निविदा रद्द केल्यानंतर गॅरंटीही जप्त केली जाते. त्यानुसार या ठेकेदाराची १४ लाख रुपयांची रक्कम जप्त केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ‘‘कात्रज येथील वाहनतळाच्या ठेकेदाराविरोधात यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. यामध्ये कराराचे उल्लंघन झाल्याने निविदा रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली जाईल.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story