जलसंपदाचे पत्र मुळा-मुठेत बुडवले
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
पावसाळ्याचा अंदाज घेत राज्याच्या जलसंपदा विभागाने मेट्रोला नदीपात्रातील आपले बांधकाम साहित्य काढून घेण्याची सूचना पत्राद्वारे केली होती. त्यासाठी १५ जुनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत उलटून गेल्यावरही नदीपात्रातील मेट्रोचे बांधकाम साहित्य हलवण्यात आलेले नाही. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या पत्राकडे मेट्रोने हेतुपूर्वक कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पावसाळा सुरू झाला असून शहरातील रस्त्यांवरच नव्हे तर नदीपात्रातील राडारोडाही तसाच असल्याचे वास्तव समोर येत आहे. मुळा-मुठा नदी पात्रांतील मेट्रोच्या कामांचा राडारोडा अद्याप तसाच पडून आहे. आजही नदीपात्रात राडारोडा, रॅम्प, पिलर्स अशा साहित्याचा ढीग नदीपात्रात पडलेला आहे. हे साहित्य असेच राहिल्यास शहराला मानवनिर्मित पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
गेले काही वर्षे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा-मुठेतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या परिसराला पुराचा फटका बसला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये शहरातील आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे १३ जणांना जीव गमवावा लागला होता. तर, सप्टेंबर-२०१९ मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल ४० अब्ज घनफूट पाणी (टीएमसी) मुठेतून वाहिले होते. या अगदी अलीकडील काळातील दुर्घटना आहेत.
राजाराम पूल, म्हात्रे पूल, पूना हॉस्पिटल लगतचा पूल, काकासाहेब गाडगीळ पूल, मुठा नदीच्या पात्राला समांतर असणारा भिडे पूल, महापालिकेजवळील जयंतराव टिळक पूल, शनिवार वाड्यासमोरील पूल, कसबा पेठेतील कुंभारवेस जवळील पूल, संगम ब्रिज, बंडगार्डन अशा अनेक पुलांची मालिका या नदीवर आहे. त्यामुळे नदीची वहन क्षमता आधीच कमी झाली आहे. त्याचबरोबर जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते नारायण पेठेतील वर्तक बागेतील मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी भलामोठा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या उभारणीसाठी लोखंडी आधाराचे खांब नदीपात्रात रोवलेले आहेत. मेट्रो स्थानक आणि इतर कामांसाठी लागणारे लोखंडी साहित्य मोठ्य़ा प्रमाणावर नदीपात्रातच आहे.
शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरूवात होते. तर, जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढतो. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत शहरात संततधार पाऊस असतो. यापूर्वीचा पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता पावसाच्या आगमनापूर्वी हे सर्व साहित्य इतरत्र हवण्यात येणे अपेक्षित आहे. विविध कामांसाठी पिलर्स, रॅम्प उभारण्यात आले आहेत. या वस्तू देखील नदीपात्रातच आहेत. या वस्तू हलवल्या न गेल्यास प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा अडथळ्यांमुळे ओढ्यातून येणारे पाणी आणि नदीपात्रात जमा होणारे पाणी सहज वाहून जाणार नाही. त्यामुळे कृत्रिम पुराचा धोका उद्भवू शकतो.
जलसंपदा विभागाने दिलाय इशारा..
मेट्रोने बांधकामासाठी मुळा-मुठा नदीपात्रात डेक्कन, संगमपूल व बंडगार्डन येथे मुरूम टाकून भराव केला आहे. वाहने आत जावे यासाठी तात्पुरते रॅम्प-प्लॅटफॉर्म केले आहेत. हे रॅम्प काढण्याबाबत यापूर्वी आपल्याला कळवले होते. मात्र ते अद्याप काढलेले नाहीत. भराव, राडारोडा न काढल्यास नदीच्या नैसर्गिक वहन क्षमतेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे बांधकामासाठी केलेला भराव-प्लॅटफॉर्म तातडीने काढून टाकावेत. जर आपणे हे साहित्य वेळेत काढले नाहीत, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मेट्रोरेल कॉर्परेशनची असेल, असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी मेट्रोरेल कॉर्पोरेशनला २० मे २०२३ रोजी दिले होते. मात्र, बुधवारपर्यंत (दि.२८) हा राडारोडा काढून टाकण्यात आला नव्हता.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, मेट्रो प्रकल्पाचे नदीपात्रात काम सुरू झाल्यापासून दरवर्षी आम्ही त्यांना पात्रातील राडारोडा आणि साहित्य हटवण्याबाबत पत्रव्यवहार करत असतो. यंदाही त्यांना पत्र दिलेले आहे. आता पुन्हा पाहणी करून त्यांना स्मरणपत्र दिले जाईल.
काय आहे मेट्रोचे स्पष्टीकरण ?
मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, नदीपात्रात मेट्रोचे फारसे साहित्य नाही. बरेचसे साहित्य काढण्यात आले आहे. थोडेफार साहित्य असले तरी ते तातडीने काढता येईल, असेच आहे. लवकरच ते साहित्यही नदीपात्रातून काढले जाईल. छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते वर्तक उद्यान दरम्यान करण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचा आधार पक्का आहे. जाळीदार रचनेमुळे प्रवाहास अडथळा होणार नाही. तसेच, जोरदार प्रवाहात त्याला हानीही पोहोचणार नाही, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे.