जेवणासाठी हॉटेलात गेला आणि मार खाऊन आला

प्रजासत्ताक दिनी काम संपवून हिंजवडीमधील हॉटेल मेझा-९ मध्ये जेवणासाठी गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला जेवण सुरू असताना हॉटेलमधून बाहेर काढत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभिजित जी.(वय ४०, रा. हिंजवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, हॉटेलचे कर्मचारी देवाशिष आणि राजेश जेना या दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीमधील हॉटेल मेझा-९

जेवताना अंधार करून अभियंत्याला बेदम मारहाण; दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

प्रजासत्ताक दिनी काम संपवून हिंजवडीमधील हॉटेल मेझा-९ मध्ये जेवणासाठी गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला जेवण सुरू असताना हॉटेलमधून बाहेर काढत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभिजित जी.(वय ४०, रा. हिंजवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, हॉटेलचे कर्मचारी देवाशिष आणि राजेश जेना या दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित हे हिंजवडीमधील एका बड्या सॉफ्टवेअर कंपनीत सिनियर इंजिनिअर म्हणून काम करतात. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला त्यांचे ऑफिसचे काम संपवून ते जेवणासाठी साडे अकराच्या सुमारास हॉटेल मेझा ९ मध्ये गेले होते. जेवणाची ऑर्डर देऊन ते येईपर्यंत काही वेळ गेला. जेवण आल्यावर ते खात असताना १२ वाजले. 

त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्याने अभिजित यांना प्रथम बील देण्यास सांगितले. त्यामुळे अभिजित यांनी बील देऊन जेवण सुरू केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हॉटेलमधील सगळे लाईट बंद करण्यात आले. पण टेबलवर मेणबत्ती असल्याने अभिजित त्या मेणबत्तीच्या उजेडात जेवण करीत होते. दरम्यान, हॉटेल मधील वेटरने येऊन अभिजित यांच्या टेबलवरील मेणबत्ती उचलून विझवली. यावरून वेटरला थांबवत अभिजित यांनी जेवण सुरू असताना, लाईट कसे बंद करता असे विचारले असता, त्यावरून वाद होऊन हॉटेलमधील दोन कामगारांनी त्यांना हाताने मारहाण केली. अंधार असल्याने आणि रक्तदाबाचा त्रास आल्याने माझे डोके खूप दुखू लागल्याने कितीजणांनी मारले हे समजत नव्हते, असे अभिजित यांनी "सीविक मिरर" शी बोलताना सांगितले. याच दरम्यान हॉटेलमधील कामगाराने तोंडावर खुर्ची फेकून मारल्याने अभिजित यांना जबर मार लागला. यामुळे गोंधळून गेलेल्या अभिजित यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली.

हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हॉटेलमधील दोन कामगारांना ताब्यात घेतले. तसेच अभिजित यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. फिर्यादीच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेबलवरील मेणबत्ती संपल्याने ती बदलत असताना हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्यांच्या सविस्तर चौकशीनंतर नेमका प्रकार समजू शकेल. आमचा तपास सुरू आहे.

-अजितकुमार खताळ, सहायक पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story