खुनाच्या प्रयत्नाचे निमित्त ठरली शिडी, आरोपींच्या हातात बेडी
नितीन गांगर्डे
बांधकामासाठी भाडेतत्त्वावर दिलेली शिडी आणि तिचे भाडे मागितले म्हणून धारदार शस्त्राने वार करत खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
वाघोलीत शनिवारी (दि. ५) ही घटना घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अंकिता गजानन वानखेडे (वय २३, गायरानवस्ती, पाचपीरबाबा मशिदच्या मागे, वाघोली) यांनी तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत विनोद सुनील पाथरे आणि त्यांचा अमर सुनील पाथरे या भावांना अटक केली.
फिर्यादी अंकिता यांचे पती गजानन भीमराव वानखेडे (वय ३५) हे पुणे महापालिकेच्या कचरागाडीवर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या घराजवळ विनोद पाथरे आणि त्याचा भाऊ अमर राहतात. पाथरे यांना घराचे काम करण्यासाठी बांधकामाच्या साहित्याची आवश्यकता होती. त्यासाठी वानखेडे यांनी आरोपींना मागील आठवडयात भाडेतत्त्वावर बांधकामाचे साहित्य दिले होते.
गजानन वानखेडे यांनी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी विनोदला ‘‘भाडेतत्त्वावर घेतलेले आमचे बांधकामाचे साहित्य परत कधी करणार,’’ अशी विचारणा केली. बांधकामासाठी शिडी दिली होती, ती यावेळी परत मागितली. ठरल्याप्रमाणे भाडे कधी देणार, याबाबत विचारणा केली. याचा विनोदला राग आला. त्याने ‘‘कसली शिडी, कशाचे भाडे मागतो, असे प्रश्न विचारत वानखेडे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढत जाऊन आरोपी शिवीगाळ करू लागला. “तुला माहिती नाही का, मी वाघोलीतील सातव पाटील यांच्याकडे काम करतो. तू माझ्याकडे पुन्हा शिडी आणि त्याचे पैसे मागितले तर तुला बघून घेईन,’’ अशी धमकी देऊन फिर्यादीच्या पतीस लाथा-बुक्क्याने मारहाण केली.
ही मारामारी होत असताना दुसरा आरोपी अमर तेथे आला. त्याने घरातील धारधार शस्त्र आणले. फिर्यादीच्या पतीस शिवीगाळ करत ‘‘थांब, तू आमच्याशी पंगा घेतोस काय? तुला आता जिवंतच ठेवत नाही,’’ असे म्हणत गजानन वानखेडे यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडाओरड करत आजूबाजूच्या रहिवाशांना मदतीसाठी बोलावले. त्यावेळी आलेली एक महिला आणि फिर्यादी मध्ये पडून मारामारी थांबवू लागल्या. त्यावर आरोपी विनोदने त्यांना अडवले. यावेळी अमरने त्याच्या हातातील धारधार शस्त्राने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार केला. मारहाणीत वानखेडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी रिक्षातून वाघोली येथील केअर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यावर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वानखेडे यांना खासगी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. झालेल्या घटनेची माहिती फिर्यादी अंकिता गजानन वानखेडे यांनी त्यांचा भाऊ सुनील लिंबाजी चव्हाण (रा. चंदननगर) यांना फोनवरून कळविली. त्यांच्या मदतीने फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.