Bharat Gaurav Yatra : रेल्वेकडून राज्यावर अन्याय सुरूच, ‘भारत गौरव यात्रे’त महाराष्ट्रातील स्थळांचा समावेश नाही

देशांतर्गत धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून ‘भारत गौरव यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून उत्तरेतील तसेच दक्षिणेतील राज्यात गौरव यात्रेच्या ट्रेन सोडण्यात येत आहेत. मात्र, परराज्यातील पर्यटकांना महाराष्ट्रातील अष्टविनायक, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग, संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध लेणी, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा समृद्ध वारशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Wed, 10 May 2023
  • 12:14 am
रेल्वेकडून राज्यावर अन्याय सुरूच, ‘भारत गौरव यात्रे’त महाराष्ट्रातील स्थळांचा समावेश नाही

रेल्वेकडून राज्यावर अन्याय सुरूच, ‘भारत गौरव यात्रे’त महाराष्ट्रातील स्थळांचा समावेश नाही

म्हणे, महाराष्ट्रात नाही गौरवस्थळे; शक्तिपीठ, अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, बौद्ध लेण्यांकडे दुर्लक्ष

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

देशांतर्गत धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून ‘भारत गौरव यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून उत्तरेतील तसेच दक्षिणेतील राज्यात गौरव यात्रेच्या ट्रेन सोडण्यात येत आहेत. मात्र, परराज्यातील पर्यटकांना महाराष्ट्रातील अष्टविनायक, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग, संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध लेणी, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा समृद्ध वारशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

देशातील सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना पाहता यावा, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या स्थळांना भेटी देणे सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वेने ‘भारत गौरव यात्रा’ सुरू केली आहे. मात्र, या यात्रेत महाराष्ट्राला स्थान देण्यात आले नाही. या यात्रेत सगळा भर उत्तर आणि दक्षिणेतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे-पाटील केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असूनही परराज्यातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या समृद्ध वारसास्थळांना अशा ट्रेन का सुरू करण्यात आल्या नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुणे आणि मुंबईतून मात्र परराज्यांसाठी गौरव यात्रेअंतर्गत अशा ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत ‘भारत गौरव यात्रा’ सुरू केली आहे. देशातील अनेक ठिकाणांहून अशा धार्मिक पर्यटनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ‘भारत गौरव यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा पुण्यातून २८ एप्रिलला सुरू झाली. यात उत्तर भारतातील पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. दुसरी यात्रा गुरुवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यात उत्तर भारतातील आग्रा, अमृतसर, हरिद्वार, मथुरा, ऋषिकेश, उज्जैन आणि वैष्णोदेवी या स्थळांचा समावेश आहे.

मुंबईतून २३ मे रोजी सुरू होणाऱ्या ‘भारत गौरव यात्रे’त बंगळुरू, कन्याकुमारी, मदुराई, म्हैसूर, रामेश्वरम, तिरुअनंतपूरम, तिरुपती या दक्षिणेतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचा समावेश असलेली केवळ एकच ‘भारत गौरव यात्रा’ आहे. तिरुअनंतपूरममधून सुरू होणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर, शिर्डी या फक्त तीन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. हा अपवाद वगळता इतर महत्त्वाच्या स्थानांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री येथे अष्टविनायकातील पाच गणपती आहेत. रायगडमधील महाड आणि पाली येथे दोन गणपती असून, अहमदनगरमध्ये सिद्धटेक आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक शक्तिस्थळ आहे. त्यासाठी काही सोय केल्याचे दिसत नाही.

‘‘महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, महालक्ष्मी, अक्कलकोट, तुळजापूर, गानगापूर यांसारखी अनेक ठिकाणे आहेत. त्याचबरोबर पुरातन लेण्यांचाही महाराष्ट्राला वारसा आहे. राज्यात अनेक तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे तसेच गड-किल्ले आहेत. त्यामुळे या स्थळांचादेखील समावेश गौरव यात्रेत झाला पाहिजे,’’ अशी मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निखिल काची यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story