चुकीची वाहन उचलेगिरी, तरीही निर्ढावलेपणा

पार्किंगमध्ये लावलेले चारचाकी वाहन सोडविण्यासाठी १,७०० रुपये देण्यास नकार दिल्यानंतर दंडाचे दिलेले हजार रुपये घेऊन वाहन उचलणाऱ्या पोऱ्याने पोबारा केला. याची तक्रार केल्यानंतर वाहतूक पोलीस प्रशासनाने वाहन उचलून पोलीस ठाण्यात नेल्याचा एसएमएस पाठवला. प्रत्यक्षात वाहन उचलून नेले नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वाहतूक पोलीस यंत्रणेने केवळ ‘नोटेड’ असा मेसेज पाठवून आपला निर्ढावलेपणा दाखवून दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 4 Jul 2023
  • 06:27 am
चुकीची वाहन उचलेगिरी, तरीही निर्ढावलेपणा

चुकीची वाहन उचलेगिरी, तरीही निर्ढावलेपणा

वाहतूक पोलीस यंत्रणेचा प्रताप; पावती न देताच एक हजार रुपये घेऊन वाहन उचलणाऱ्याचा पोबारा, तक्रारीनंतर न उचललेली गाडी पोलीस ठाण्यात नेल्याचा मेसेज

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पार्किंगमध्ये लावलेले चारचाकी वाहन सोडविण्यासाठी १,७०० रुपये देण्यास नकार दिल्यानंतर दंडाचे दिलेले हजार रुपये घेऊन वाहन उचलणाऱ्या पोऱ्याने पोबारा केला. याची तक्रार केल्यानंतर वाहतूक पोलीस प्रशासनाने वाहन उचलून पोलीस ठाण्यात नेल्याचा एसएमएस पाठवला. प्रत्यक्षात वाहन उचलून नेले नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वाहतूक पोलीस यंत्रणेने केवळ ‘नोटेड’ असा मेसेज पाठवून आपला निर्ढावलेपणा दाखवून दिला.

पावती न देताच तो पटकन निघून गेला. त्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे याबाबत ऑनलाईन तक्रार केली. त्यानंतर वाहतूक पोलीस प्रशासनाने उचलून न नेलेले चारचाकी वाहन उचलून पोलीस ठाण्यात नेल्याचा एसएमएस पाठवला. त्यात शिवाजीनगर येथून आपले वाहन दंड भरून नेण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी केवळ नोटेड असा मेसेज पाठवला.

क्षितिजा सागर या महिलेला रविवारी सायंकाळी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) रस्त्यावर हा अनुभव आला. पेशाने शिक्षिका असलेल्या क्षितिजा कामानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर आल्या होत्या. त्यांनी तिथे त्यांची चारचाकी गाडी पार्क केली. काम संपवून त्या दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी पुन्हा गाडीजवळ आल्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला जॅमर लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीला चिठ्ठी अडकवली होती. त्यावर एक मोबाईल नंबर होता. मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर दोन कर्मचारी तिथे आले. त्यांनी क्षितिजा यांना अव्वाच्या सव्वा रक्कम मागायला सुरुवात केली. त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी दंडाचे एक हजार रुपये सांगितले. रक्कम हाती पडताच ते तडक निघून गेले.

क्षितिजा यांचे वडील विजय सागर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. क्षितिजा यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. विजय सागर यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. याबाबत ‘सीविक मिरर’शी बोलताना क्षितिजा म्हणाल्या, ‘‘मी गेली पाच वर्षे बंगळुरूला शिक्षिका म्हणून काम करीत होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पुण्यात स्थायिक झाले आहे. काही कामानिमित्त फर्ग्युसन रस्त्यावर आले होते. फर्ग्युसन रस्त्याकडून बीएमसीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जोशी वडेवाले येथी मी गाडी पार्क केली होती. काम करून आल्यानंतर गाडीला जॅमर दिसला. तसेच, एक चिठ्ठी अडकवलेली दिसली. त्यावर फोन केल्यानंतर दोनजण आले. एकाने आल्या आल्या ‘कार्ड द्या,’ अशी थेट विचारणा केली. ‘कसले कार्ड आणि कशासाठी,’ विचारल्यावर एकाने पेमेंटसाठी, असे उत्तर दिले. ‘‘कार्ड नसल्यास रोख रक्कम द्यावी लागेल,’’ असेही त्यांनी सांगितले. किती रक्कम, असे विचारल्यावर १७०० रुपयांची मागणी केली. इतके पैसे कसे अशी विचारणा केल्यानंतर १ हजार ७१ रुपये सांगितले. नंतर ‘एक हजार रुपये लागतील,’ असे सांगून गाडीत बसायला लावले. त्यानंतर संवाद साधणारी व्यक्ती बाजूला गेली. त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गाडीजवळ आली. तिने हातात पैसे पडल्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आत धूम ठोकली.

विजय सागर म्हणाले, ‘‘मुलीने घरी आल्यावर सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मी गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार केली. त्यानंतर माझ्या मुलीला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास एक मेसेज आला की ‘तुमची गाडी टोइंग करून माॅडर्न कॉम्पलेक्स पोलीस स्टेशन येथे नेली आहे. त्याचा दंड १,०७१ रुपये होतो. दंड भरून गाडी घेऊन जा.’ घटना रविवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी पाच या वेळेत घडली. संबंधित कर्मचाऱ्याने पावती न देता पैसे घेऊन जॅमर काढले. गाडी माझ्या मुलीच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये होती. तरीही गाडी उचलून नेल्याचा मेसेज सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पाठवण्यात आला. हा कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार आहे? असे प्रकार कधी थांबणार, असा सवाल गृहमंत्र्यांसह पोलिसांसमोर उपस्थित केला आहे.’’ या ऑनलाईन तक्रारीला पोलिसांनी ‘नोटेड’ एवढेच उत्तर दिले आहे, असे सांगत विजय सागर यांनी या प्रकाराबद्दल उद्विग्नता व्यक्त केली.    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story