‘लिबर्टी’ सोसायटी पारतंत्र्यात
प्रिन्स चौधरी
कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रस्त्यावरील लिबर्टी हाउसिंग सोसायटीमधील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. अनेकदा त्यांनी अहुरा बिल्डर यांच्याकडे सुविधा मिळण्यासाठी अर्ज-विनंत्या केल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने रहिवाशांच्या वाट्याला निराशाच आली आहे. अनेक ठिकाणी दाद मागितल्यावर त्यांनी आता पोलिसांकडून तरी न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
कोरेगाव पार्कमधील लिबर्टी हाउसिंग सोसायटीतील रहिवाशांना मूलभूत सुविधाच मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सोसायटीमध्ये पार्किंग सुविधा अपुरी आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अडचण येत आहे. तसेच लिफ्ट नेहमी बंद असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप होत असून त्यातील अनेक जण वैतागून सोसायटी सोडून गेले आहेत. येथील इंटरनेट सुविधाही बंद आहे. रात्रीच्या वेळी बाहेरून येणारे लोक येथे गोंधळ करून शांतता भंग करत आहेत. शांततेसाठी सुरक्षा रक्षकांची गरज आहे. रहिवाशांना किमान मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्या मिळाव्या यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र अहुरा बिल्डरने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्याची झळ येथील १५० फ्लॅट, २० दुकाने आणि कार्यालयांना बसत आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि येथील रहिवासी शिवम नश्ते यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले की, “ पार्किंगसाठीच्या जागेत साखळ्यांनी बॅरिकेड करण्यात आले असून त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे आकारले. ज्यांनी ते दिले त्यांच्यासाठीच ही पार्किंग सुविधा देण्यात आली आहे. मागील सात वर्षांपासून येथील लिफ्ट सुरळीत चालू नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने या त्रासाला वैतागून अनेकजण सोसायटी सोडून दुसरीकडे राहण्यासाठी गेले आहेत. सोसायटीमधील मसाज सेंटरमध्ये येणारे ग्राहक रात्रीच्या वेळी सोसायटीमधील शांतता भंग करत असतात.
“येथील व्यवस्थापक कय्युम हे महिलांसोबत अत्यंत उद्धटपणे बोलतात. या ठिकाणी पार्किंगमध्ये उभारलेले अनधिकृत बॅरिकेडजवळ सोसायटीमधील वाहने लावली तर पंक्चर करण्याची धमकी देतात. येथील रहिवासी पूनम गुप्ता यांनी सांगितले की, येथील इंटरनेट सुविधा अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. ती सुरू करण्यासाठी मागणी केली मात्र काहीही केले गेले नाही. मयंक पटेल म्हणाले की, सोसायटीला वीज पुरवठा करण्यासाठी एक जनरेटर आहे मात्र त्यातून दुसऱ्याच सोसायटींना वीज पुरवठा केला जातो.
मनीष बनकर यांनी मिररशी बोलताना सांगितले की “३० वर्षे जुन्या सोसायटीचे व्यवस्थापन बिल्डरच्या लोकांच्या हातात आहे. आजपर्यंत सोसायटीचा कोणताही लेखापरीक्षण अहवाल नाही. सोसायटीची एकही एजीएम झाली नाही. येथील रहिवाशांच्या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. १८ वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्यासाठी आमच्याकडून आता शुल्क आकारले जात आहे. याबाबतीत आम्ही रजिस्ट्रार कार्यालयात तक्रार दाखल केली असून अंतिम सुनावणी ८ जून रोजी आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाणे आणि आयुक्त कार्यालयातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सुरेश भोमावत यांनी मिररला सांगितले की, आम्हाला जवळपास दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा नाही. पाण्याच्या टँकरसाठी रहिवाशांना ४० हजार रुपये मोजावे लागले आहेत. येथील मेंटेनन्स बिले हे अहुरा बिल्डर्स घेत आहे. लिबर्टी सोसायटी नाही. “आजपर्यंत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नाही. नोंदणीकृत विक्री करार असूनही, केवळ ५ % रहिवाशांना शेअर सर्टिफिकेट दिले गेले आहे," डॉ फुलफगर यांनी टिप्पणी केली.
सोसायटीचे व्यवस्थापक कय्युम यांनी पुणे मिररशी बोलताना सांगितले की, “येथे पाण्याची कसलीही टंचाई नाही. आठवड्यातून सहा वेळा मेंटेनन्स केले जात आहे. महिनाभर पाणीपुरवठा झाला नसेल, तर अनेक सभासदांनी मेंटेनन्स शुल्क का दिले आहे.
अहुरा बिल्डर्सचे सीईओ पी. ए. इनामदार यांनी मिररशी बोलताना सांगितले की, “२५ वर्षांपासून पाणीपुरवठा होत आहे. सोसायटीत पाणी दाबाने येत नाही हा पाईपलाइनचा प्रश्न आहे आणि त्याची जबाबदारी महापालिकेची आहे. निवासी सोसायटीमध्ये व्यावसायिक गोष्टींसाठी परवानगी नाही. स्पा आणि रेस्टॉरंटला भेट देणारे बाहेरचे लोक सोसायटीमध्ये पार्किंग करतात. म्हणून आम्ही काही भाग बॅरिकेड केले आहेत. आम्ही पोलीस आयुक्तांकडे जाऊन येथील स्पा बंद करू.”
सोसायटीमधील पाणीपुरवठा आणि देखभाल समस्या या पोलिसांशी संबंधित नाहीत. त्याबाबतीत आम्ही अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याचे कोरेगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी सांगितले.