बेघर तृतीयपंथींना मिळणार हक्काचा आसरा

रस्त्यावर उभे राहून हात पसरण्याऐवजी कष्टाची तयारी असलेल्या तृतीयपंथींना आता हक्काचा आसरा मिळणार आहे. दत्तवाडीमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र हॉस्टेल उभारले जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले जीवन बदलू इच्छिणाऱ्या निर्व्यसनी तृतीयपंथींना या हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 26 Jun 2023
  • 08:53 am
बेघर तृतीयपंथींना िमळणार हक्काचा आसरा

बेघर तृतीयपंथींना मिळणार हक्काचा आसरा

दत्तवाडीत साकारतेय शहरातील पहिले निवारा केंद्र; भिकेची वाट सोडणाऱ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

रस्त्यावर उभे राहून हात पसरण्याऐवजी कष्टाची तयारी असलेल्या तृतीयपंथींना आता हक्काचा आसरा मिळणार आहे. दत्तवाडीमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र  हॉस्टेल उभारले  जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले जीवन बदलू इच्छिणाऱ्या निर्व्यसनी तृतीयपंथींना या हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

'फ्लाईंग वूमन फाऊंडेशन' च्या वतीने दत्तवाडीतील आनंदीबाई गाडगीळ दवाखान्याजवळील शंकर मंदिराच्या शेजारी हॉस्टेलची तीन मजली इमारत साकारली जात आहे. जुलै अखेरीस हॉस्टेलचे बांधकाम पूर्ण होईल. या हॉस्टेलमध्ये सुरुवातीस २५ तृतीयपंथींना प्रवेश दिला जाणार आहे. या हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी वयाची अट नाही. केवळ कष्ट करण्याची तयारी आणि निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रस्त्यावर भीक मागण्यास मनाई असणार आहे. केवळ याच अटींवर हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हॉस्टेलमध्ये वास्तव्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यांच्या जेवणाची सोय देखील संस्थेच्या वतीने केली जाणार आहे.

शिक्षणाचा अभाव, घरच्यांकडून मिळणारी सापत्न वागणूक, समाजाकडून स्वीकारले न जाणे यामुळे बरेच तृतीयपंथी रस्त्यावर भीक मागताना दिसतात. प्रमुख रस्त्यावरील सिग्नल, हॉटेल आणि दुकानांमध्ये जाऊन तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या संस्था आणि काही शिकलेल्या तृतीयपंथींनी 'भीक मागणारे' ही ओळख पुसण्याचा निश्चय केला आहे. पोलीस भरती आणि सरकारी परीक्षांमध्ये तृतीयपंथींसाठी वेगळा रकाना करण्यासाठी काही तृतीयपंथींनी झगडा दिला. महापालिकेच्या कंत्राटी भरतीतही त्यांनी स्थान मिळवले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांना सुरक्षारक्षक म्हणून भरती केले आहे. पुणे महापालिकेने तर तृतीयपंथींना अतिक्रमण विभागात फिल्डवर्क देऊ केले आहे. काही तृतीयपंथी स्पर्धा परीक्षांचीही तयारी करीत आहेत. त्यामुळे भिकेची वाट सोडून कष्टाने कमावण्याची तयारी असलेल्या तृतीयपंथींना आसरा देण्यासाठी फ्लाईंग वूमन संघटनेने हॉस्टेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या हॉस्टेलला 'निराकार भवन' असे नाव देण्यात येणार आहे.

फ्लाईंग वूमन फाऊंडेशनच्या संस्थापिका छायावती देसले म्हणाल्या, संघटनेत काम करणाऱ्या योगेश साडवे यांनी हॉस्टेलसाठी त्यांची जागा देऊ केली आहे. साडवे स्वतः तृतीयपंथी असल्याने त्यांना त्यांच्या अडचणी माहीत आहेत. ते स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. इतर तृतीयपंथींना कष्टाने काम करून सन्मानाने जगण्याची संधी मिळावी यासाठी हॉस्टेल बांधण्याचा निर्णय घेतला. येथे फक्त कष्टाने काम करणाऱ्यांनाच आसरा दिला जाईल. त्यात विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार, पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तृतीयपंथींना प्राधान्य असेल. याशिवाय इच्छुक तृतीयपंथींना सहा महिने कालावधीचे ब्यूटी पार्लरचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यानंतर इतर कौशल्य अभ्यासक्रमही हळूहळू सुरू केले जातील. कौशल्य अभ्यासक्रमासाठी नाममात्र शुल्क घेतले जाईल. हॉस्टेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत केली जाणार आहे.

याच हॉस्टेलच्या तळ मजल्यावर संघटनेचे कार्यालय उभारण्यात येईल. महापालिकेच्या वतीने तृतीयपंथींसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांना दिली जाईल. महापालिकेचे कौशल्य अभ्यासक्रम आणि स्वयंरोजगार योजनांचा फायदा कसा घेता येईल, याचीही माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. या शिवाय तृतीयपंथींना पथारी व्यावसायिकांचा परवाना मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे देसले म्हणाल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story