'हॅलो?' 'राँग नंबर...!'
नितीन गांगर्डे
आम्ही तुमच्या संरक्षणासाठी, मदतीसाठी सदैव तत्पर आहोत, हेच पोलिसांचे ब्रीद आहे. मात्र, असे असूनही नागरिकांना जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा पोलिसांशी संपर्क होत नाही किंवा दुसऱ्याच कोणाशी तरी संपर्क होतो, म्हणजेच 'राँग नंबर' लागतो. पुणे शहर पोलिसांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावरील संपर्क क्रमांकांची ही खरी वस्तुस्थिती आहे. संकेतस्थळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, संकेतस्थळ काही दिवसांपासून अद्ययावत करण्यात आले नसल्याचे आढळले आहे. त्यावरील बहुतांश अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद आहेत किंवा चुकीचे आहेत. त्यामुळे फोन लागला, तरी तो 'राँग नंबर' लागतो.
पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर पोलिसांशी संबंधित विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर वरिष्ठ अधिकारी कोण आहेत, त्यांचे नाव, पद, त्यांच्याकडे असलेला विभाग, खाते आदी माहिती आहे. पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त व त्यांचे झोन आणि विभाग, तसेच विभागीय साहायक पोलीस आयुक्त अशा विविध पदावरील अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यासोबतच त्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. मात्र, या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांच्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नंबर अस्तित्वातच नाहीत, असे समजते, तर काही वेळा संपर्क होतो, पण तो चुकीच्या व्यक्तीशी होतो.
शहरामध्ये बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून अनेक दिवस उलटले आहेत, परंतु पोलिसांच्या संकेतस्थळावर अजूनही जुन्याच अधिकाऱ्यांचे छायाचित्र, नाव आणि चुकीचे संपर्क क्रमांक दिसत आहेत. एकीकडे वेगाने सायबर गुन्ह्याचा निपटारा करण्याचा दावा करणारे पोलीस आपले संकेतस्थळच अद्ययावत ठेवण्यात मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे त्यावर चुकीची माहिती आणि सहज लक्षात याव्यात अशा उणिवा दिसत आहेत. पोलिसांच्या संकेतस्थळावर शहरातील ३३ पोलीस ठाण्यातील आणि तेथील पोलीस निरीक्षकांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील नंबर मागील अनेक दिवसांपासून सतत व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना नेहमी फोन येत असतात त्यामुळे त्यांचा फोन अनेकदा व्यस्त असतो हे गृहीत धरले तरीही दिवसभरात एकदाही फोन लागत नाही, हे आश्चर्य आहे. गेल्या महिनाभरापासून तो संपर्क क्रमांक बंद असल्याचे 'सीविक मिरर'च्या पाहणीत आढळून आले आहे.
कायदा-सुव्यवस्था, शांतता राखण्याचे काम पोलीस करत असतात. त्यासाठी नागरिकांशी त्यांचा संपर्क असायला हवा. नागरिकांशी जवळून संपर्क यावा यासाठी पोलीस विविध योजनाही राबवत असतात.
त्याचाच एक भाग म्हणजे पोलिसांनी सायकल गस्त सुरू केली होती. तसेच, पायी गस्तही सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. गस्त घालताना लोकांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करता येते. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना वाढण्यास मदत होते. मात्र, दुसरीकडे पोलिसांनी दिलेले त्यांचे संपर्क क्रमांकच चुकीचे लागत आहेत.
संकेतस्थळावर दिलेल्या क्रमांकानुसार पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो राजूर येथील एका व्यक्तीशी होत आहे. तसेच, मागील तीन महिन्यांपासून आपल्याकडे हा नंबर असल्याचे ती व्यक्ती सांगत आहे. त्याचप्रमाणे स्मार्तना पाटील, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, सुहेल शर्मा यांचे नंबर बंद असून, ते अस्तित्वात नाहीत किंवा अवैध आहेत, असे सांगितले जात आहे. बाकी अधिकाऱ्यांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक देण्यात आलेच नसून त्यांच्या कार्यालयाचा क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, तोही बंद लागतो आहे.
साहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर फरासखाना विभाग यांच्याशी संपर्क केला असता, नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात येत आहे. नारायण शिरगावकर, स्वारगेट विभाग यांचा नंबर बंद असल्याचे समजते. आर. एन. राजे यांच्या नावाने असलेला नंबर अकोल्यातील एका व्यक्तीकडे आहे. मागील एक वर्षापासून आपल्याकडे हा नंबर असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण शिरगावकर, कोथरूड विभाग यांच्या नावावर असलेला नंबर नंदूरबारला लागतो आणि एक वर्षापासून हा नंबर मी वापरत असल्याचे संबंधित व्यक्ती सांगते. राजेंद्र गलांडे, सिंहगड रोड विभाग यांचा संपर्क क्रमांक खोलापुरी येथे लागतो. किशोरकुमार जाधव यांचा वाशीममध्ये लागत असून, गेल्या तीन महिन्यांपासून हा नंबर वापरत असल्याचे पलीकडची व्यक्ती सांगते. शाहूराव साळवी वानवडी विभाग बंद, अप्पासाहेब शेवाळे यांच्या नावाने असलेल्या नंबरवर संपर्क केला असता विजय पळसुले या अधिकाऱ्यांना तो फोन लागतो आहे. यातील संपर्क झालेला आणि बरोबर असलेला एकमेव नंबर हा मोटार परिवहन विभागाचे साहायक पोलीस आयुक्त परशू बावस्कर यांचा असल्याचे 'सीविक मिरर'च्या पाहणीत आढळून आले.
पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावरील जुनी माहिती कोणती आहे ते पाहून तत्काळ ती अद्ययावत केली जाईल.
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
प्रतिसाद न मिळालेले संपर्क क्रमांक
साहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे - विश्रामबाग विभाग, आरती बनसोडे - खडकी विभाग, बजरंग देसाई - हडपसर विभाग, विजयकुमार पळसुले - आस्थापना विभाग, राजेंद्र साळुंखे - विशेष शाखा, रुक्मिणी गलांडे यांच्या क्रमांकावर संपर्क साधला असता, रिंग वाजते, पण फोन उचलला जात नाही.
कायदा काय सांगतो?
माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ (१) (ब) (ix) नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांचे अधिकारी आणि कर्मचार्यांची माहिती असलेली एक निर्देशिका (डिरेक्टरी) प्रकाशित करणे बंधनकारक असते. माहिती अधिकार कायदा कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मिररशी बोलताना सांगितले की, या डिरेक्टरीमध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सर्व माहिती त्यांच्या संपर्क क्रमांकासह समाविष्ट असणे बंधनकारक आहे.