बॅगही गमावली अन् नोकरीही
नितीन गांगर्डे
नोकरीच्या मुलाखतीसाठी अकोल्याहून पुण्यात आलेल्या तरुणाची बॅग पुणे रेल्वे स्थानकावरील 'वेटिंग रूम' मधून चोरीला गेली. शुक्रवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. याच बॅगेत मुलाखतीसाठी आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे होती, परंतु बॅगच चोरीला गेल्याने पुढील मुलाखत रद्द करत तरुणाची मोठी निराशा झाली व त्याला गावी परतावे लागले. तरुणाने या प्रकरणी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नागरे (वय ३१, रा. लहान उमरी, उत्तरा कॉलनी, अकोला) या तरुणाची बॅग चोरीला गेली आहे. नागरे नोकरीच्या मुलाखतीसाठी एक ऑगस्टला अकोल्याहून पुण्यात आला होता. काही कंपन्यांमध्ये त्याने मुलाखती दिल्या होत्या. आणखी एका कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जायचे असल्याने तो पुणे रेल्वे स्थानकातील वेटिंग रूममध्ये विश्रांतीसाठी थांबला होता. त्या वेळी त्याच्या कागदपत्रांची बॅग चोरट्याने लंपास केली. बॅग नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने शोधाशोध केली, परंतु बॅग सापडली नाही. त्यामुळे त्याने याबाबत पोलिसात तक्रार केली. या बॅगेत कागदपत्रांसह त्याचे कपडे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू होत्या.
सचिनला शुक्रवारी गावी निघत असतानाच एका नामांकित कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला होता. ही मुलाखत शनिवारी असल्याने त्याने गावी जाण्याचा निर्णय रद्द करत पुणे रेल्वे स्थानकावर थांबण्याचे ठरवले. शनिवारची मुलाखत झाल्यानंतर तो गावी जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच बॅग चोरीला गेल्याने त्याला मुलाखतीला जाता आले नाही.
सचिन नागरे म्हणाला, 'माझी सर्व मूळ कागदपत्रे बॅगमध्ये होती. मात्र, ती बॅगच चोरीला गेल्याने यापुढील मुलाखतींनाही मला जाता येणार नाही. मी गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहे. सर्व नवीन कागदपत्रे काढण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. त्यामुळे तोपर्यंत काय करावे, असा प्रश्न पडला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्याला पकडून माझी बॅग मिळवून द्यावी.'