Chandni Chowk Pune : चौक चांदण्यांचा झाकोळला परी तो !

पुण्यातील खुले आकाश आणि त्यांना आव्हान देणाऱ्या होर्डिंगचा प्रश्न काही संपेल अशी चिन्हे दिसत नाहीत. नव्याने उभारलेल्या चांदणी चौक पुलाच्या आसपास उभारलेल्या भव्य होर्डिंगमुळे या परिसराचे सौंदर्य काळवंडत असून त्याचा येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार चांदणी चौक आणि बावधनचे नागरिक आणि येथून ये-जा करणारे हजारो पुणेकर करत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Tue, 8 Aug 2023
  • 11:34 am
चौक चांदण्यांचा झाकोळला परी तो !

चौक चांदण्यांचा झाकोळला परी तो !

दक्षिण-पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेला चांदणी चौक अडकला होर्डिंगच्या विळख्यात, प्रसन्न, शांततेचा अनुभव देणाऱ्या चौकाचे सौंदर्य सांगाड्यांमुळे झाकोळले...

साहिर शेख / महेंद्र कोल्हे 

feedback@civicmirror.in

TWEET @mahendrakmirror

पुण्यातील खुले आकाश आणि त्यांना आव्हान देणाऱ्या होर्डिंगचा प्रश्न काही संपेल अशी चिन्हे दिसत नाहीत. नव्याने उभारलेल्या चांदणी चौक पुलाच्या आसपास उभारलेल्या भव्य होर्डिंगमुळे या परिसराचे सौंदर्य काळवंडत असून त्याचा येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार चांदणी चौक आणि बावधनचे नागरिक आणि येथून ये-जा करणारे हजारो पुणेकर करत आहेत.  

चांदणी चौक हा पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा चौक आहे. मुंबई, तसेच दक्षिण आणि पश्चिम दिशेकडून पुण्यामध्ये येणाऱ्या नागरिकांचे हे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणावे लागेल. या परिसरातील हिरवीगार झाडी  प्रसन्न आणि शांततेची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करते. येथील नैसर्गिक वातावरणामुळे चांदणी चौक बाकीच्या पुण्याच्या तुलनेत हटके आहे. या भागातील नागरिकांच्या मतांनुसार आकाशाशी स्पर्धा करणारे भव्य आणि अक्राळ-विक्राळ होर्डिंग, जाहिरात फलकांमुळे या भागाचे नैसर्गिक सौंदर्य हरवत चालले आहे. चांदणी चौक आणि बावधनच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे येथील होर्डिंग कधी कोसळतील आणि वाहनधारक, नागरिकांच्या जिवावर कधी भीषण संकट कोसळेल हे सांगता येत नाही.         

 या नागरिकांच्या मतांमध्ये तथ्य आहे. कारण, होर्डिंग कोसळून अनेक दुर्घटना झाल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निवृत्ती झुरांगे याबाबत ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, नव्याने बांधलेल्या चांदणी चौकातील पुलाच्या आसपास होर्डिंग उभारण्याची मुळातच गरज नाही. हा विषय प्रशासनाकडे उपस्थित करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. मात्र, हे सारे प्रयत्न अपयशी ठरले. पुणे महापालिका प्रशासनाशी दूरध्वनी आणि व्हॉट्सॲप माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाने तातडीने होर्डिंगविरुद्ध कारवाई करण्याची गरज असून नव्या होर्डिंगना परवानगी देणेही तत्काळ थांबवावे.    

होर्डिंगमुळे होणारे अपघात पुणे आणि पिंपरी-चिंचवडला काही नवे नाहीत. ऑक्टोबर २०१८ मध्ये रेल्वे स्टेशनजवळच्या शाहीर अमर शेख चौकातील सिग्नलजवळ होर्डिंगचा ४० फुटाचा लोखंडी सांगाडा जोरदार वाऱ्याने कोसळला. त्यामुळे चार पुणेकरांना प्राण गमवावे लागले तर अकराजण जखमी झाले होते. पाच रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारचेही मोठे नुकसान झाले होते. अशाच पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रावेत-किवळे भागात एप्रिल २०२३ मध्ये होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळला होता.  

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि उपायुक्त माधव जगताप यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पत्र लिहून होर्डिंगच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. चांदणी चौक परिसरात उभारलेल्या होर्डिंगमुळे नागरिकांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे याची सविस्तर कल्पना देण्यात आली आहे. तसेच चांदणी चौकात होर्डिंगना दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

‘सीविक मिरर’शी बोलताना कनोजिया म्हणाले की, या पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वी होर्डिंग उभारले गेले आहेत. हा एक गंभीर प्रश्न असून महापालिकेने यांचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिका हद्दीत होर्डिंग दुर्घटना झाल्या असून त्यात काही सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा प्रकारच्या भीषण दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आताच दक्षता म्हणून पावले टाकली पाहिजेत. चांदणी चौकाचा परिसर आजही त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्यांमुळे चौकाचे विद्रुपीकरण होत आहे. पुणे पालिका आयुक्त आणि उपायुक्तांना याबाबत मी पत्र दिले आहे. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे आणि चांदणी चौकासाठी होर्डिंगबाबत नवे धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चौकात उभारलेल्या होर्डिंगच्या परवान्यांचा फेरविचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

बावधनचे रहिवासी असलेले सतीश शिंदे ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, नव्याने उभारलेल्या चांदणी चौक पुलाजवळ चार-पाच होर्डिंगचे सांगाडे उभारलेले आहेत. या भागात वेगवान वारे वाहात असल्याने तेथून जाताना हे सांगाडे अंगावर पडतील की काय अशी भीती वाटत असते. अशा होर्डिंगना परवानगी देण्यापेक्षा प्रशासनाने या भागात झाडे लावण्याची गरज आहे. आम्ही याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून लेखी तक्रार देणार आहोत.  कोथरूड-बावधन वॉर्ड ऑफिसचे अतुल ब्राम्हणकर याबाबत म्हणाले की,  आम्ही संबंधित होर्डिंग मालकांना नोटीस बजावणार असून त्यांना कामे तातडीने थांबविण्याचे आदेश देणार आहोत. अशा आशयाचे आदेश आम्हाला आजच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story