लग्नाचा बनाव करून नवरदेवांना फसवले

लग्न जमण्यास अडचण येणाऱ्यांना हेरून त्यांच्याकडून पैसे उकळणारी एक कथित वधू फरार झाली असून तिला या कामी मदत करणारे तीन आरोपीही गायब आहेत. या प्रकरणातील वराकडून १ लाख ३० हजार रुपये उकळले असून त्याने नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 4 Jun 2023
  • 12:04 pm
लग्नाचा बनाव करून नवरदेवांना फसवले

लग्नाचा बनाव करून नवरदेवांना फसवले

नारायणगावमधील घटनेत वधू सव्वा लाखांसह गायब, मध्यस्थ महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

लग्न जमण्यास अडचण येणाऱ्यांना हेरून त्यांच्याकडून पैसे उकळणारी एक कथित वधू फरार झाली असून तिला या कामी मदत करणारे तीन आरोपीही गायब आहेत. या प्रकरणातील वराकडून १ लाख ३० हजार रुपये उकळले असून त्याने नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे. या कथित वधूने चार-पाच मुलांशी लग्न करून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी मीरा बन्सी विसलकर (रा. घोटी, नाशिक), बाळू गुलाब सरवदे (रा. नारायणगाव), शिवाजी कुरकुटे (रा. बोटा कुरकुटवाडी, संगमनेर) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.   

पोलिसांच्या माहितीनुसार लग्न न जमणाऱ्या तरुणांना हेरून त्यांचे लग्न जमविण्याचा बनाव करायचा आणि वेगवेगळी कारणे सांगून विवाहापूर्वी किंवा त्यानंतर दोन-तीन दिवसातच पैसे उकळून पळून जायचे अशी आरोपींची कार्यपद्धती आहे. तक्रार देणारा तरुण हा ३३ वर्षाचा असून तो नारायणगाव येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. बरेच दिवस त्याचे लग्न जमत नव्हते. आरोपी बाळू सरवदे याने फिर्यादीशी संपर्क साधला आणि तुझ्या लग्नासाठी मुलगी पाहिली असल्याचे सांगितले. त्याने मीरा विसलकर हिचा नंबर फिर्यादीला दिला. फिर्यादीचे मीराशी बोलणे झाले. त्यानंतर मीराने त्याला एका तरुणीचा फोटो पाठविला होता. त्यासोबतच मुलीचे आधार कार्ड पाठवले होते. पाठवलेल्या आधार कार्डवर संध्या विलास बदादे (रा. दिंडोरी, जि. नाशिक) असे मुलीचे नाव आणि पत्ता होता. त्यानंतर काही दिवसांनी बोलणी होऊन लग्न ठरले. लग्न  ठरल्यावर मीराने फिर्यादीशी बोलता-बोलता मुलीची परिस्थिती हलाखीची असल्याचे संगितले. तिला वडील, बहीण, भाऊ कोणीही नाहीत. तिची आई सतत आजारी असते. तिच्या उपचारासाठी १ लाख ३० हजार रुपयांचा खर्च आहे. मुलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना पैशांची गरज असल्याचे मीरा आणि बाळू सरवदे यांनी सांगितले. आता लग्न झाल्यानंतर उपचारासाठी पैसे दे असेही त्यांनी सांगितले.

ठरल्यानुसार जुन्नरमधील शिवपार्वती विवाह सोहळा केंद्रात त्यांचे वैदिक पद्धतीने लग्न लावण्यात आले होते. लग्नाला मुलगी, तिची आई आणि इतर पाच-सहा मंडळी मुलीच्या बाजूने उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर ते जुन्नर येथील न्यायालयामध्ये विवाह नोंदणी करण्यासाठी गेले. त्यावेळी विवाह नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे एका वकिलाकडून याबाबतीत नोटरी करून घेण्यात आले. 

नोंदणी झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे फिर्यादीने वधूच्या आईसाठी १ लाख ३० हजार रुपये दिले. मीरा हिने त्यातील काही रक्कम बाळू सरवदे याला दिली होती. त्यानंतर संध्या ही फिर्यादीच्या घरी आली. घरी आल्यानंतर ती वारंवार मीरा हिला फोन करत असे. १७ मे रोजी मीरा विसलकर ही संध्या हिला घेऊन गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. तेव्हा फिर्यादीने मीराला संध्या परत घरी कधी येणार असे विचारल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मीराने संध्या कुठेतरी पळून गेल्याचे फिर्यादीला सांगितले. कथित वधू संध्या बदादे हिचे या अगोदर एका तरुणाबरोबर २३ मार्च रोजी आळंदीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात लग्न झाल्याची माहिती फिर्यादीला समजली. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या मुलीने चार-पाच मुलांशी लग्न करून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नात वेगवेगळी  कारणे सांगून घरातील सोने, पैसे घेऊन यापूर्वी तिने अनेकदा पोबारा केला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story