God is scared, but not police : ‘नंगे को खुदा डरता है लेकिन पुिलस नही’

पोलीस चौकीत जाऊन महिलेने स्वतःचे कपडे काढत पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 14 May 2023
  • 02:31 am
‘नंगे को खुदा डरता है लेकिन पुिलस नही’

‘नंगे को खुदा डरता है लेकिन पुिलस नही’

विनयभंगाची धमकी देत तक्रार मागे घेण्यासाठी ठाण्यात घातला गोंधळ; तीन महिलांसह पाच जणांना अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पोलीस चौकीत जाऊन महिलेने स्वतःचे कपडे काढत पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. 

मुंढवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत श्रावस्तीनगर परिसरातील घोरपडी पोलीस चौकीमध्ये गुरुवारी (िद. ११) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस चौकीत फक्त पुरुष कर्मचारी असल्याचा गैरफायदा घेत तीन महिलांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत, धमकावत येथे गोंधळ घातला. या प्रकरणी तीन महिला आणि दोन पुरुषांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात कपडे काढत गोंधळ घालणाऱ्या महिलेच्या मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन एका मुलासोबत प्रेमविवाह केला होता. तो मुलगा खूप वाईट आहे, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून यापूर्वी त्याचा विवाह होऊन घटस्फोट झाला असल्यामुळे त्याच्या सोबतच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता.

फेब्रुवारी २०२३ मध्ये हा प्रेमविवाह झाला होता. ही बाब तिच्या कुटुंबीयांना समजल्यावर ते मुलीच्या पतीला धमक्या देत होते. मुलीच्या घरचे थेट मुलाच्या घरी जाऊन त्याला तुला सोडणार नाही, कापून टाकीन, अशा धमक्या देत होते. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी घोरपडी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. तक्रार आल्यावर पोलिसांनी संबंधित मुलीच्या पालकांना चौकीत बोलावले होते. मात्र यावेळी चौकीत तीन महिलाही त्यांच्या सोबत आल्या होत्या. आल्याबरोबर या सर्वांनी आमच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी केली. आम्हाला हे लग्न मान्य नसल्याचे सांगत त्यांनी चौकीतच गोंधळ घालायला सुरुवात केली.  त्यावेळी पोलिसांनी त्यांना शांत राहायला सांगितले. तसेच त्यांचे वर्तन पाहून चौकीतून जाण्यास सांगितले. त्यावेळी महिलांनी अजूनच गोंधळ करायला सुरुवात केली.

दरम्यान मुलीच्या आईने चौकीतच स्वतःचे कपडे काढत पोलिसांना धमकी दिली. मीच तुमच्यावर विनयभंगाची केस दाखल करते, तुम्हाला दाखवते, अशी धमकी देत गोंधळ घालायला सुरुवात केली. सोबतच्या महिलांनी पोलिसांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धाव घेतली. पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या ठिकाणी दोघेही पोलीस कर्मचारी पुरुष असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. शेवटी त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मुंढवा पोलीस ठाण्यातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घ्यावे लागले. महिला कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या गोंधळ घालणाऱ्या महिलांना आवर घातला. चौकीतील पोलीस अंमलदार तुळशीराम रासकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात या महिलांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

तीन महिला आणि दोन पुरुषांवर भारतीय दंड संहितामधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story