चोरट्यांमुळे अंत्यसंस्काराचे साहित्यही असुरक्षित

शनिवार पेठेतील मुळा नदीकाठावर ओंकारेश्वरजवळ असलेल्या महापालिकेच्या दशक्रिया घाटावरच्या खोलीतून दशक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील चोऱ्या, मंदिरातील दानपेटी, देवाच्या मूर्ती आदी गोष्टींची चोरी होत असतानाच आता भुरट्या चोरांनी दशक्रियेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचीही चोरी केल्याची घटना समोर आली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 10 Jul 2023
  • 12:27 am
चोरट्यांमुळे अंत्यसंस्काराचे साहित्यही असुरक्षित

चोरट्यांमुळे अंत्यसंस्काराचे साहित्यही असुरक्षित

ओंकारेश्वरच्या घाटावरून दशक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी; भुरट्यांकडून मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शनिवार पेठेतील मुळा नदीकाठावर ओंकारेश्वरजवळ असलेल्या महापालिकेच्या दशक्रिया घाटावरच्या खोलीतून दशक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील चोऱ्या, मंदिरातील दानपेटी, देवाच्या मूर्ती आदी गोष्टींची चोरी होत असतानाच आता भुरट्या चोरांनी दशक्रियेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचीही चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अथर्व मोघे (वय २०, रा. सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शनिवार पेठेत मुळा नदीकाठी दशक्रियाविधीसाठी पुणे महानगरपालिकेने ओंकारेश्वर घाट बांधला आहे. शहरातील सर्वांत जुना घाट म्हणून तो ओळखला जातो. त्याच्या जवळच पालिकेने साहित्य ठेवण्यासाठी एक खोली बांधली आहे. येथील खोलीत दशक्रियेसाठीचे साहित्य ठेवलेले असते. त्याची किल्ली विधी करणारे, पौराेहित्य करणाऱ्यांजवळ असते. यातील फिर्यादी अथर्व मोघे यांनी नेहमीप्रमाणे खोली कुलूप लावून बंद केली होती. मात्र, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडले. चोरट्यांनी इमारतीचे शटर उचकटून खोलीत घुसखोरी केली.

अज्ञात चोरट्याने कपाट उघडून त्यातील साहित्याची चोरी केली. चोरी झालेल्या साहित्यात तांब्याचे १० मोठे ताम्हण, १० छोटे ताम्हण, १९ पळ्या आणि २ तांबे या भांड्यांची चोरी केली आहे. चोरी झालेल्या भांड्यांची किंमत ६ हजार सहाशे रुपये आहे. हा प्रकार ७ जुलै सायंकाळी ४ ते ८ जुलैच्या सकाळी ८ च्या दरम्यान घडला आहे. या घाटाच्या जवळच शनिवार पेठ पोलीस चौकी आहे. मात्र, असे असूनही चोरट्यांनी खोलीचे शटर उचकटून, कुलूप तोडून चोरी केली आहे. त्यामुळे परिसरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. भुरट्या चोरांनी दशक्रियेच्या साहित्याची चोरी केल्याने मृताच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक मयूर भोसले या प्रकरणी तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story