‘आयटी’त बनावट नोकरी देणाऱ्या चौघांना अटक

आयटी कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांस फसवणाऱ्या चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुमार हरिश्चंद्र कोळी (रा. सोमवार पेठ, पुणे) अनोदीप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा (रा. वाघोली ), श्रावण एकनाथ शिंदे (रा. वाघोली), कल्पना मारुती बखाळ (रा. दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 9 Jul 2023
  • 09:29 am
‘आयटी’त बनावट नोकरी देणाऱ्या चौघांना अटक

‘आयटी’त बनावट नोकरी देणाऱ्या चौघांना अटक

इंटरनेटवर जाहिरात देऊन साधला जात असे संपर्क, ७०हून अधिक तरुण-तरुणींना लाखोंना फसविले

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

आयटी कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांस फसवणाऱ्या चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुमार हरिश्चंद्र कोळी (रा. सोमवार पेठ, पुणे) अनोदीप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा (रा. वाघोली ), श्रावण एकनाथ शिंदे (रा. वाघोली), कल्पना मारुती बखाळ (रा. दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महेश कुमार हा टेक्नॉलॉजी एस ए पी, एम एम आणि  एम के मॅनेजमेंट सर्विस नावाने एजंसी चालवत होता. त्याने विमाननगर, खराडीतील आयटी कंपन्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ७० तरुण-तरुणींची फसवणूक केली आहे. आरोपी इंटरनेटवर जाहिरात देत. त्याच्याशी संपर्कात आलेल्या तरुणांकडून पैशाची मागणी करून नोकरी देण्याचे आश्वासन देत. अनेकांकडून लाखो रुपये घेऊन नोकरीचे बनावट नेमणूक पत्र दिले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात कमलेश गंगावणे याने २६ जून २०२३ रोजी फिर्याद दिली होती.

संपर्क केल्यावर तुम्हाला मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी देतो असे आश्वासन दिले जाई. पहिले तीन महिने ट्रेनिंग आणि या काळात १५ हजार पगार आणि नंतर लाखात पॅकेज दिले जाईल असे सांगितले जाई. यातील फिर्यादीकडे आरोपीने १ लाख ८० हजाराची मागणी केली असता त्याने १ लाख ६८ हजार दिले होते. त्यानंतर आरोपी महेश कुमारने ईमेलवर नियुक्ती पत्र पाठवले. ही घटना १२ ऑगस्ट २०२२ ते २२ नोव्हेंबर २०२२ दरम्यान घडली. नियुक्ती पत्रात खराडीतील कंपनीत नोकरी मिळाल्याची माहिती होती. परंतु कंपनीत कोणतेही काम चालत नव्हते, कोणताही प्रोजेक्ट नव्हता असे  फिर्यादीत म्हटले आहे. कंपनीचे मालक नवीन प्रोजेक्ट आणत असल्याचे सांगतिले जाई. सुरुवातीचे काही दिवस वेतन वेळेवर दिले. नंतर कंपनी तोट्यात असल्याचे सांगून पैसे देण्याचे टाळल्याने फिर्यादीने पोलिसांत तक्रार केली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा ४ ने आरोपींना अटक करून तपास केला असता त्यात आरोपी अनोदीप शर्मा याने ई पवेलियन कंपनी खराडी, आणि बेंक्यू सॉफ्टवेअर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपन्या बनवल्याचे स्पष्ट झाले. त्याचे तो नेमणूक पत्र देत होता. त्यावेळी तरुणांकडून फोन पे, गुगल पे, चेक द्वारे पैसे घेत होता. मात्र प्रत्यक्षात या कंपन्या अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे या प्रकरणी तपास करत आहेत. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी-चिंचवडशी संपर्क करावा.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story