फुकटच्या पेट्रोलसाठी ‘भाई’चा पंपावर राडा

मोफत पेट्रोल मिळावे यासाठी एकाने पेट्रोल पंपावर राडा घालत, 'मी इथला भाई आहे माहीत नाही का?' अशी दमदाटी करत पेट्रोल पंपाची आणि तेथील उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली आहे. गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान फुरसुंगी येथील जय शंभो पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. या प्रकरणी पंपावरील एका कामगाराने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:29 am
फुकटच्या पेट्रोलसाठी  ‘भाई’चा पंपावर राडा

फुकटच्या पेट्रोलसाठी ‘भाई’चा पंपावर राडा

दमदाटी करत वाहनांची तोडफोड; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मोफत पेट्रोल मिळावे यासाठी एकाने पेट्रोल पंपावर राडा घालत, 'मी इथला भाई आहे माहीत नाही का?' अशी दमदाटी करत पेट्रोल पंपाची आणि तेथील उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली आहे. गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान फुरसुंगी येथील जय शंभो पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. या प्रकरणी पंपावरील एका कामगाराने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

वैभव अंकुश भगत  (वय ३०, रा. काळे बोराटेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर अमोल भागवत देवकर (२७, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फुरसुंगी येथील जय शंभो पेट्रोल पंप २४ तास सुरू असतो. गुरुवारी पहाटे दुचाकीवर दोघेजण पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी १०० रुपयांचे पेट्रोल भरले. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि थेट पंपावरील मशीनची तोडफोड करायला सुरुवात केली. ऑफिसच्या दरवाजावर जोरदार धक्के देऊन दरवाजा उघडला. आत शिरून झोपलेल्या कामगाराच्या दिशेने दगड भिरकावला. त्यानंतर दुचाकीत आणखी पेट्रोल भरून तेथील एमपीडी मशीनची तोडफोड केली. एका मशीनचा डिस्प्ले फोडला, दोन उभ्या असलेल्या नवीन मशीन खाली पाडल्या. या मशीन नवीनच असल्याने मोठे नुकसान झाल्याचे पंपाच्या मालकांनी सांगितले. 

पंपावर तोडफोड केल्यावर आरोपीने जवळच उभ्या असलेल्या एका चारचाकी कारचेही नुकसान केले. तेवढ्यात पेट्रोल पंपाच्या मालकांना कामगारांनी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. 'दोन मुलं आम्हाला शिवीगाळ करत आहेत', असे कामगारांनी मालकाला सांगितले. त्यावर मालकाने पेट्रोल देण्यास सांगितले. पंपावर आरोपी वैभवने पेट्रोल भरले. पैसे मागितल्यावर 'वैभव भगत माझे नाव आहे. माझे कोणी वाकडे करू शकत नाही, पोलीस येऊ दे नाही, तर कोणी पण येऊ दे. मी इथला भाई आहे. टाकी फुल्ल कर', असा दम त्याने दिला. फिर्यादी यांनी त्याच्या दुचाकीची टाकी पूर्ण भरली व त्यास जाण्यास सांगितले. तरीही त्याने दगड उचलून मशीनची तोडफोड केली. हा सर्व उपद्रव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, कामगारांनी पोलिसांना फोन केल्यावर काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याचे दिसताच त्या दोघांपैकी एकाने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी चपळाईने दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story