'पायाला गँगरिन, तरीही शूज खरेदीची हौस'
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
नदीच्या पाण्याची असह्य दुर्गंधी आणि मुळा-मुठेला आलेले गटाराचे स्वरूप याकडे तद्दन दुर्लक्ष करून महापालिकेने बंडगार्डनच्या नदीकाठ सुशोभिकरणावर खर्च केला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांद्वारे केला. मात्र, त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. पुणेकरांनी नदीकाठ सुधारण्याऐवजी नदी सुधारा.. पायाला गँगरीन झाले असताना शूज काय खरेदी करता?... मरायला टेकलेल्या रूग्णाला डिझायनर कपडे शिवा लेकहो... अशा शेलक्या शब्दांत बोचरी टीका करून नदीकाठ सुधारणेचा यथेच्छ समाचार घेतला आहे.
नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत महापालिकेने बंडगार्डन पुलाजवळील काठ सुशोभित केला आहे. या कामाचे श्रेय घेण्यासाठी मुरलीधर मोहोळ सरसावले. भाजपने मोहोळ यांच्या खांद्यावर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाची धुरा दिली आहे. मोहोळ यांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी बंडगार्डन पुलाजवळील नदीकाठाचे फोटो ट्वीट केले. त्याला 'कॅप्शन' देताना, 'भारतीय जनता पार्टी केवळ वायदेच करत नाही, तर केलेले वायदे पूर्ण करते...याचाच हा आणखी एक पुरावा ! मुळा-मुठा नदीकाठ सुधारअंतर्गत बंडगार्डन परिसरात साकारलेला नदीकाठ', असे त्यांनी म्हटले.
त्यावर पुणेकरांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे. 'माजी महापौरसाहेब तुमचा पाच वर्षांचा कालावधी संपून आणि सत्ता जाऊन दीड वर्ष झाले. त्यानंतर तुम्ही एक छोटासा पॅच दाखवताय, तोही नदीच्या कडेचा. नदीच्या पाण्याचे काय?' असा सवाल अभिषेक सोमवंशी यांनी विचारला आहे. 'पायाला गँगरीन झाले असताना त्याचा इलाज करायचा सोडून त्यासाठी नवीन शूज आणण्यावर खर्च केला जात आहे. तितका खर्च नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी केला असता तर ?' असा सवाल डीसी सिग्मा या खात्यावरून करण्यात आला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रतिक्रिया टॅग केली आहे. यामुळे नदीत काय सुधार झाला? नदीच्या पात्राची खोली वाढवणे, गाळ काढणे, जलपर्णी निर्मूलन, राडारोडा, कचरा व अतिक्रमण हटवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, नागरिकांना कोणत्याही प्रकारे नदीत कचरा करण्यास मनाई करण्याचे काय झाले ते लिहावे. तेही नदी सुधार प्रकल्पात येते ना? ,असा सवाल इरावती यांनी उपस्थित केला आहे.
'मरायला टेकलेल्या रुग्णाला डिझायनर कपडे अन् मेकअप करून तो आता बघा कसा ठणठणीत बरा केला असं कोण्या डॉक्टरने जाहीर केले, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल मोहोळ साहेब ?' असा खोचक प्रश्न 'एलियन फ्रॉम द अर्थ' या ट्विटर हँड़लवरून विचारण्यात आला आहे. विनोद गोलांडे म्हणतात, 'अण्णा इथे खूप घाण वास येतो...याचा काय उपयोग...त्या ऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया करा..' डॉ. नितीन कुमार यांनीही 'नदीत स्वच्छ पाणी कुठे आहे? गटारगंगा झाली आहे...त्यावर उपाय करा', असा सल्ला दिला आहे.
अजिंक्य बापट म्हणतात, 'रोग भलतीकडे औषध दुसरीकडे. नाला स्वच्छ करा...मग दिवे लावा...मूर्खपणा, अतिशहाण्या लोकांचा. प्रशांत भोसले यांनी, 'टोटल किती फूट काम केले मोहोळसाहेब? पुण्याचे क्षेत्रफळ विरुद्ध उदबत्ती, कसं होणार?' अशा शब्दांत टोमणा मारला आहे. मोहोळ यांनी वापरलेल्या वायदा या शब्दावरूनही पुणेकरांनी भाषेचा योग्य वापर करण्याची सूचना केली आहे. सुपर फॅक्ट या ट्विटर हँडलने पेट्रोल-डिझेल आणि सिलिंडरचे दर कमी करण्याच्या वायद्याची आठवण करून दिली आहे. अमेय कुलकर्णी यांनी यात (नदीकाठ सुधार) सुधारणा शोधूनही सापडत नाही... बरं, ते मेट्रोचं काय झालं, काय चार स्टेशनचा वायदा होता? अशा शब्दांत खिल्ली उडवली आहे.