अधिकाऱ्यांच्या ‘आयडी’ने बनावट प्रमाणपत्र

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) महिला वाहन निरीक्षकांचाच 'लॉग इन आयडी' आणि पासवर्ड वापरून नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत मोटार वाहन निरीक्षक रेणुका राधाकिसन राठोड (वय ४५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 17 Jun 2023
  • 11:45 pm
अधिकाऱ्यांच्या ‘आयडी’ने बनावट प्रमाणपत्र

अधिकाऱ्यांच्या ‘आयडी’ने बनावट प्रमाणपत्र

'आरटीओ'च्या महिला निरीक्षकांचा आयडी, पासवर्ड वापरून ९ वाहनांना बनावट प्रमाणपत्र; गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) महिला वाहन निरीक्षकांचाच 'लॉग इन आयडी' आणि पासवर्ड वापरून नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत मोटार वाहन निरीक्षक रेणुका राधाकिसन राठोड (वय ४५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार संगमपूल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात १७ नोव्हेबर २०२२ रोजी घडला होता. त्यानुसार एका आयपी ॲड्रेसधारकाविरुद्ध (४५. ८८. १९०. १५७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. वाहन निरीक्षकांना सिटिझन पोर्टलच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र द्यावे लागते. हे पोर्टल सुरू करण्यासाठी रोज सकाळी वाहन निरीक्षकांना लॉग इन करावे लागते. लॉग इननंतर संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावरच पासवर्ड येतो. त्यानंतर पासवर्ड टाकावा लागतो. तो टाकल्यानंतर सिटिझन पोर्टल कार्यान्वित होते. आरोपीने फिर्यादीचे लॉगइन आयडी आणि पासवर्डद्वारे पोर्टल कार्यान्वित केले होते. त्यावरून परस्पर नऊ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. फिर्यादी निरीक्षकांनी पाहणी केल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चक्क आरटीओच्या सिटिझन पोर्टल अ‍ॅपमध्येच बेकायदा प्रवेश करून एका एजंटने नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिले. मात्र, हा प्रकार उघडकीस यायला तब्बल सात महिन्यांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मोटार वाहन निरीक्षक म्हणून काम करत असताना त्यांच्या लॉग इन आयडीचा पासवर्ड प्राप्त करून चोरट्याने वाहन या सिटिझन पोर्टल अ‍ॅपमध्ये बेकायदा प्रवेश केला. त्यामध्ये एन्ट्री, अ‍ॅप्रूव्हल आणि व्हेरिफाय या 'स्टेप्स' त्याने पार केल्या आणि प्रिंट काढून नऊ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले. जवळपास तीन तास फिर्यादीच्या पासवर्डचा गैरवापर आरोपीने केला होता. कालांतराने पाहणी करत असताना आपण हे नऊ अर्ज पास केले नाहीत, मात्र तरीही ते पास झाले कसे याची पाहणी करताना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर खात्याअंतर्गत चौकशी झाल्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.

पोलिसांनी याबाबत आरटीओतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तेव्हा वाहन निरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. आरटीओ कार्यालयातील एका कक्षात कामकाज चालते. कामकाज सुरू असताना फिर्यादी यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवून फसवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फसवणूक करणाऱ्याने सरकारी कार्यालयातच फसवणूक केल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. चोरट्यांच्या या कृत्यामुळे परिवहन विभागातील अधिकारी चांगलेच हादरले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story